भोंडला आठवण.....
घाल घाल पिंगा वार्या,
माझ्या परसात;
माहेरी जा सुवासाची,
कर बरसात……
पुणे आकाशवाणीवर मायेने ओथंबलेले हे बोल ऐकता ऐकता चहाच्या वाफे बरोबर रमेची स्वारी थेट माहेरी जाऊन पोहोचली.
किती समृद्ध बालपण मिळालं होतं तिला आणि तिच्या भावंडांना !! आजच्यासारखी भौतिक सुखांची रेलचेल नसेलही कदाचित पण सांस्कृतिक वारसा आणि मायेचा ओलावा भरभरून मिळाला होता त्यांना !! याचमुळे पुढे जरासे रटाळ वाटणारे क्षण आले तरीही ते या ओल्याचिंब रस्त्यावरून कधी निसटून जात ते कळतही नसे.
नागपंचमीचे झोके असो किंवा नवरात्रीचा भोंडला सगळे सणवार खूप आनंदाने साजरे होत असत. भोंडला तर रमेच्या खास आवडीचा ! खिरापतीचं अॅट्रॅक्शन तर असायचंच पण हा एकच सण असा होता जो आई, आजी त्यांच्यासोबत हसत-खेळत साजरा करता यायचा. घरी या, आता बास म्हणून टुमणं नसायचं मागे. फेर धरून, भोंडल्याची गाणी गात, प्रत्येकीचं मन केव्हा त्यांच्या बालपणात जाऊन पिंगा घालायचं ते कळायचं ही नाही. खरया अर्थाने एका पातळीवर येऊन बाल मैत्रिणी होऊन जात तिन्ही पिढ्या.
पुढे लग्न होऊन रमा शहरात आली तर इथे एवढं वातावरण नव्हतं सणासुदीचं. प्रत्येक जण आपला घाण्याचा बैल - आपापल्या आसाभोवती रात्रंदिन फिरणारा. रमेला जडंच गेलं थोड सुरुवातीला! पण नंतर तिनेच पुढाकार घेउन शेजारपाजारयांना आमंत्रण देऊन तिच्या छोटेखानी अंगणात सासूबाईंच्या परवानगीने भोंडला अरेंज केला. घरी सगळ्यांना वाटलं हिने घाट घातलाय खरा पण एरवी घराची कवाडं बंद करून स्वतःतच दंग असलेली मंडळी आली, तरी येताना आपल्या मनाची कवाडं सताड उघडी ठेवून येतील का ? शंकाच होती रमेच्या मनातही. जरा धडधडत होतं. पण तिची नणंद जाम एक्साइटेड होती. होईल गं वहिनी सगळं ठीक , चीअर अप म्हणत तिच्या भोवती पिंगा घालत होती छान तयार होऊन. सासूबाई आणि रमाही तयार झाल्या होत्या मस्तपैकी.
एकेक करून सर्वजणी जमल्या. भोंडला म्हणजे काय असतो? कसा खेळायचा असं प्रश्नचिन्ह मुखवट्यावर घेऊन आलेल्या प्रत्येकीला खेळता खेळताच त्यांचं उत्तर मिळालं होतं.
भोंडला म्हणजे निखळ आनंद !! भोंडला म्हणजे बालपणात हरवणं !!
झिम्मा, फुगडी, फेर, भुलाबाई ची गाणी, बस-फुगडी, लाटणे-भांडण, सासुराच्या लटक्या तक्रारी, माहेराला बडेजाव अन् नवरोबावरंचं प्रेम व्यक्त करता करता खिरापतीचं कोडं सोडवायचा सगळ्यांचा आवडता क्षण कधी यायचा ते कळलंच नाही. जीभेवर रेंगाळणारया खिरापतीच्या गोडव्याबरोबर खूप सारया निखळ आनंदाचं दान घेऊन गेल्या सगळ्याजणी! पुढल्या वर्षी हे दान परत लुटायचंच असं मनोमन ठरवून.
लहानग्या रेवाच्या जन्मानंतर तर धमालंच यायची. शेजार पाजारच्या साळकाया माळकायांबरोबर आता रमेची जाऊ, नणंद अन् परीवारातल्या नविन सदस्यांचीही भर पडली होती. रेवा आणि तिच्या बालमैत्रीणींनी बोबड्या सर्वात म्हणलेली भोंडल्याची गाणी, त्यांचा खेळ, नाच हे सगळं रमेने कॅमेरयाबरोबर हृदयाच्या कप्प्यातही खोलवर जपून ठेवलं होतं. तो चोर कप्पा उघडून आठवणींमध्ये रमा कधी हरवली ते तिला कळलंच नाही. तीची तंद्री भंगली ती आकाशवाणीवरील “कोरोना अपडेटस्” या वार्तांकनामुळे. पावसानेही धुमाकूळ घातला होता. एरवी त्याला जुमानलंही नसतं सगळ्यांनी पण सोशल डिस्टंसिंग पाळायलाच हवं होतं. पण रेवासाठी रमेला गोड आठवणींचा शेला विणायचाच होता कुठलाही खंड न पडू देता थेट तीच्या आई-आजीने तीच्यासाठी विणला होता तसा… मग काय झूम बाबांना मदतीला घेऊन ऑनलाइन भोंडला साजरा केला तिने लेकी सोबत. यावेळी भोंडल्याचं गाणं जरा बदललं होतं रमेच्या मनातलं इतकंच …👇
ऐलमा पैलमा गणेश देवा,
खेळ माझा मांडीयला, करीन तुझी सेवा...
खेळ माझा मांडीला पुण्यनगरी,
भरून घेते ज्ञानाच्या घागरी;
फुंकीत घागरी दिवे ते लावू,
घरा-दाराला उजळून ठेवू...
एक पाय घरी माझा, दुजा कचेरीत,
पती देवा, लेकरा बाळा ठेव सुरक्षित;
राहू दे रे डोईवरी थोरामोठ्यांचे हात,
येऊ दे रे नंदा जावा घरी, हशा पिकवित...
एक मन सासुरा रे दुजे, धावे माहेराला,
आई-बाबा थकले रे, धावी त्यांच्या रक्षणाला;
भाऊ वहिनी झटती रे भावे, देई त्यांना तुझे दान,
नको ढगफुटी आता, हिरवंच राहू दे ना रे रान...
पिल्लं माझी गोजिरे रे, सुखी ठेव बाप्पा त्यांना,
ओत पंखांमध्ये बळ, उंच आकाशी उडण्या;
दाव वाट घरट्याची थके-भागल्या लेकरा,
बळ देई मायबापा, द्याया त्यांना मायेचा चिमणचारा...
गाव देश अन् जगती लेकुरे तुझी, सुखी ठेव रे सगळी,
देऊनी शोधूनी तू लस, टाक तुझी की रे गुगली;
अनादी-अनंत शक्ती तू रे, राक्षसासी दे सहजेची मात,
नको हस्तक्षेप निसर्गीचक्री आता, फिरे मंत्र हाच माणूस तो गात...
ऐलम्मा पैलम्मा गणेश देवा,
खेळ माझा मांडियला, करीत तुझी सेवा....
- अर्चना खिस्ती-गोरकर. ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा