रोहिणी निरंजनी
ले.- वंदना बोकील-कुलकर्णी
राजहंस प्रकाशन
'रोहिणी निरंजनी' हे, ज्येष्ठ नृत्यांगना पंडिता रोहिणी भाटे यांचे, वंदना बोकील-कुलकर्णी यांनी लिहिलेले चरित्र वाचनीय आहे. हे चरित्र म्हणजे रोहिणीताईंच्या आयुष्यातील घटनांची केवळ जंत्री नव्हे, तर ध्येयमार्गापासून न ढळणारा कलाकार, कठोर साधनेने अढळस्थान कसे प्राप्त करतो, याचा उत्तम नमुना आहे.
सुविद्य, सुसंस्कृत आणि सुधारक विचारांचे वडील आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जगणारी तत्त्वनिष्ठ, खंबीर, पुरोगामी आई अशा कुटुंबातील रोहिणीताई या शेंडेफळ. वडिलांचे छत्र अचानक हरपल्यानंतर हे कुटुंब पुण्यात राहायला आले. विमलाबाई गरवारे हायस्कूलमध्ये रोहिणीताई दाखल झाल्या. शाळेतील अभ्यासाबरोबरच, रोहिणीताई आणि त्यांची भावंडे कलाविषयक छंदवर्गांना जात असत. संगीत, चित्रकला, योगासने, लाठीकाठी अशा अनेक कलांची ओळख त्यांना लहानपणीच झाली. शाळेतील काही शिक्षकांच्या शिकवणुकीचा ठसा त्यांच्यावर कायमचा उमटला. रोहिणीताईंना दोन नावे होती. पण "जिचा आलेख सतत चढणारा राहील, अशी महत्त्वाकांक्षी 'रोहिणी' तू हो" असे त्यांच्या संस्कृत शिकवणाऱ्या फणसे सरांनी त्यांना सांगितले आणि त्यांनाही ते पटले. तेव्हापासून त्या 'रोहिणी भाटे' असेच नाव लावू लागल्या. गाणी म्हणणे, नाटकात काम करणे, विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे, संस्कृत काव्याचे मराठीत भाषांतर करणे अशा विविध अंगांनी त्यांचे शालेय जीवन समृद्ध झाले होते. रोहिणीताईंना त्यांची आई आणि भावंडांचा विशेषतः बहिणींचा सहवास आणि पाठिंबा दीर्घकाळ लाभला. प्रवाहाविरुद्ध पोहत, खंबीरपणे स्वतःच्या विचारांवर ठाम राहत आपापल्या क्षेत्रात मोठा पल्ला गाठणारे आगळेवेगळे कुटुंब होते त्यांचे. १९४०च्या सुमारास, सुट्टीत जोपासण्याचा एक छंद अशा रूपात 'नृत्य' रोहिणीताईंच्या आयुष्यात आले आणि त्यांना व्यापून राहिले.
बीए झाल्यावर पुढे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा नृत्य हाच आपला प्राणछंद असल्याचा कौल रोहिणीताईंच्या मनाने दिला. तो स्वीकारून त्यांची पुढील वाटचाल सुरू झाली. नृत्य ही कला, व्यवसाय किंवा वृत्ती म्हणून स्वीकारणे म्हणजे नेमके काय, याची कल्पना त्या काळच्या महाराष्ट्राला नव्हतीच. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना संमती दिली आणि रोहिणीताईंनी आपल्या नृत्यध्यासाचं साकार रूप अर्थात 'नृत्यभारती' हा नृत्यवर्ग सुरू केला. 'नाचा'कडे तुच्छतेने बघणाऱ्या त्या काळच्या पुण्यातील तीन-चार पालकांनी आपल्या मुली या वर्गात दाखल केल्या आणि रोहिणीताई त्यांना मनापासून धडे देऊ लागल्या.
स्वतः नृत्य शिकवू लागल्या, तरी रोहिणीताईंना आपल्या अपुरेपणाची जाणीव होती. त्यामुळे त्यांचे नृत्यशिक्षणही जमेल तसे सुरू होते आणि योग्य गुरूचा शोधही! एकीकडे पुण्यात नृत्यवर्ग चालवत, पुणे-मुंबई, पुणे-लखनौ अशा वाऱ्या करत, विविध गुरूंकडून त्या ज्ञानकण वेचत होत्या. गायनाचेही शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतले. विद्यार्जनाच्या या काळात अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी प्रचंड परिश्रम केले. कथकचे शास्त्र स्वतःमध्ये मुरवून, त्यावर मनन करून, स्वतःचे संस्कार केले. त्यातून जणू त्यांचे 'रोहिणी घराणे' निर्माण झाले. त्या केवळ नृत्यांगना नव्हत्या, तर नृत्यकलेविषयी सतत चिंतन करणाऱ्या विदुषी होत्या. त्यांचे कित्येक लेख, निबंध प्रसिद्ध झाले आहेत. नृत्यासाठी एखादी संकल्पना सुचली आणि त्याला अनुरूप लिखित किंवा मौखिक साहित्य मिळाले नाही, तर रोहिणीताई स्वतःच मराठीत किंवा हिंदीत उत्कृष्ट रचना करीत असत. त्याला संगीतही देत. त्यांच्या कार्यक्रमाचे निवेदन त्या स्वतःच लिहीत किंवा इतर कोणी लिहिले तरी त्यावर त्यांचा हात फिरलेला असे. परदेशात अस्खलित इंग्रजीमध्ये त्या निवेदन करीत असत. नृत्यरचनांसाठी केवळ त्रिताल न वापरता रूपकासारखे आडमात्रांचे ताल किंवा अगदी साडेदहा मात्रांचा ताल यावरही त्यांनी नृत्य रचना केल्या आहेत. नाविन्याचा त्यांचा ध्यास हा ओढून-ताणून नव्हता, तर तो अगदी सहज त्यांच्या सृजनातून फुलून येत असे. कथक नृत्याला मर्यादित परिघातून बाहेर काढत त्यांनी वेदकालापर्यंत मागे नेले, तसेच आधुनिक काळाचे परिमाणही दिले. उषःसूक्त, समय, कठपुतली, उडान अशा त्यांच्या रचना याची साक्ष देतात.
स्वतः परिपूर्ण कलाकार असलेल्या रोहिणीताई गुरु म्हणूनही श्रेष्ठ होत्या, सहृदय होत्या. विद्यार्थिनींना नीट समजेपर्यंत, न थकता त्या छोट्या-मोठ्या गोष्टी समजावून सांगत, प्रात्यक्षिक करून दाखवत. त्यांचा उत्साह आणि उत्कटता कमी होत नसे. प्रत्येकीच्या क्षमतेनुसार त्या व्यक्तीसापेक्ष शिकवत. कथकचे तंत्र घोटून घेत, पण त्या पलीकडे पाहण्याची दृष्टी आणि जाण्याचे बळ देत असत. "Dance lies beyond perfection," असे त्या म्हणत असत. शिष्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जागरुकपणे झटणार्या गुरू तर त्या होत्याच, त्याबरोबरच विद्यापीठीय शिक्षणात नृत्यशास्त्राचा, नृत्यविचाराचा अंतर्भाव करणाऱ्या शिक्षणतज्ञही होत्या.
कोणतेही शासकीय किंवा अन्य खाजगी आस्थापनांचे आर्थिक पाठबळ नसूनही, एका व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वावर, गुणवत्ता आणि निष्ठा या गुणांच्या भक्कम पायावर उभी असलेली 'नृत्यभारती' ही रोहिणीताईंची पुण्यातील संस्था यावर्षी अमृत महोत्सव साजरा करीत आहे. पैसे कमावण्यासाठी, आपल्या नृत्यसंस्थेचा लौकिक वाढवण्यासाठी किंवा सरकारी कोट्यातून नृत्य वर्गांसाठी जागा मिळावी यासाठी रोहिणीताईंनी कधीही प्रयत्न केले नाहीत. नृत्य हा त्यांचा श्वास आणि ध्यास होता. नृत्याच्या माध्यमातून त्या सतत काही ना काही देत राहिल्या- आपल्या विद्यार्थिनींना आणि समाजालादेखील!
आपले कार्यक्षेत्र कोणतेही असो, रोहिणीताईंच्या जीवनचरित्रातून शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. संशोधक व चिकित्सक वृत्ती, कलात्मकता, सौंदर्यप्रियता, रसिकता, परिपूर्णतेचा ध्यास, मनाचा कणखरपणा, वेळेचे व्यवस्थापन, काटेकोर नियोजन, वक्तशीरपणा, नियमितपणा, टापटीप, साधेपणा, नम्र-शांत-संयमी वृत्ती, प्रगल्भता, सर्जनशीलता, निरलसता...काही स्वभावतःच असलेले आणि काही त्यांनी जाणीवपूर्वक अंगी बाणवलेले असे किती गुण सांगावे?
'स्वतः ठरवलेल्या तंत्रानं जगता येणं म्हणजे स्वातंत्र्य' या रोहिणीताईंनी केलेल्या स्वातंत्र्याच्या व्याख्येतून अधिकारापेक्षा जबाबदारीचे दर्शन प्रकर्षाने घडते. स्वातंत्र्याची किंमत त्यांना मोजावी लागली. मानसिक संघर्षाने कोलमडून जाण्याचे प्रसंगही आले. एकदा रोहिणीताईंना रडताना बघून त्यांचा लहानगा मुलगा सनत् त्यांना "रडू नकोस" असे म्हणाला. तेव्हा त्यांनी त्याला समोर चालू असलेले ताज्या बांधकामावर पाणी टाकण्याचे काम दाखवले आणि म्हणाल्या, "कच्च्या बांधकामावर पाणी टाकलं की ते पक्कं होतं, बळकट होतं. मीही तेच करते आहे. मी स्वतःला बळकट बनवते आहे," अशा निग्रहाने परिस्थितीला तोंड देत त्या तावूनसुलाखून नव्या झळाळीने नवी झेप घेत राहिल्या. स्वतःला घडवत राहिल्या. कमतरतांना मागे टाकत अंगी सद्गुण बाणवत राहिल्या. "Punctuality has nothing to do with time. It is a commitment to yourself" असे त्या म्हणत असत. जगण्याची तत्त्वे त्यांनी आयुष्यभर निष्ठेने जपली.
रोहिणीताईंच्या नृत्याला एक तात्विक आणि आध्यात्मिक अधिष्ठान असे. साधना ही शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अशा तिन्ही पातळ्यांवर करायची असते, अशी त्यांची धारणा होती. लोकानुनय करणारे स्वस्त मनोरंजन त्यांनी कधी केले नाही, उलट प्रेक्षकांनाच आपल्या उन्नत पातळीवर येण्यास त्या भाग पाडत असत. "Dance does not signify mere pleasure, nor it is just a fascinating physical activity. It awakens the soul and arouses a sense of elation rarely experienced otherwise. What is Dance then, if not a prayer?" या त्यांच्या उद्गारांमधूनच नृत्याविषयीची त्यांची उदात्त भावना प्रत्ययाला येते. त्यांचे अवघे जगणे म्हणजे जणू एक कलाकृती होती.
ज्या भूभागात यापूर्वी कधी नृत्य नव्हते, तिथे भगीरथ प्रयत्नांनी नृत्यविचार रुजवणार्या रोहिणीताईंच्या जीवनाचा समग्र धांडोळा लेखिका वंदना बोकील-कुलकर्णी यांनी त्याच निष्ठेने घेतला आहे. रोहिणीताईंचे अनेक लेख, कविता, पुस्तके, त्यांच्यावरील लघुपट असे संदर्भ तपासून घेतले. शिवाय रोहिणीताईंचे कुटुंबीय, सहकारी, त्यांच्या जगभर विखुरलेल्या विद्यार्थिनी, कलाक्षेत्रातील मान्यवर यांच्या मुलाखती घेतल्या, आठवणी जाणून घेतल्या आणि हा चरित्रग्रंथ सिद्ध केला. यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांचे वर्णन केले आहेच, पण त्यावर भर न देता, एक कलाकार म्हणून, गुरु म्हणून, लेखिका-विचारवंत-संगीतरचनाकार आणि माणूस म्हणून रोहिणीताई कशा होत्या, हे त्यांनी फार छान उलगडून दाखवले आहे. नृत्य ही खरे तर एक सादरीकरणाची कला(परफॉर्मिंग आर्ट), तरीही अनेक नृत्यरचनांना शब्दात बांधण्याचे कसब त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या ओघवत्या शब्दकळेमुळे हे तीनशे पानी पुस्तक वाचण्याचा मुळीसुद्धा कंटाळा येत नाही. या पुस्तकातली एकच बारीकशी गोष्ट खटकली. ती म्हणजे, आता हयात नसलेल्या काहीजणांच्या नावापूर्वी ते हयात असतानाच्या प्रसंगात कै. असे जोडले आहे आणि त्यातही संगती नाही.
या पुस्तकाला हिंदीतील श्रेष्ठ कवी आणि कलासमीक्षक डॉ. अशोक वाजपेयी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. रोहिणीताईंच्या भावपूर्ण नृत्यमुद्रांमुळे या पुस्तकाचे कलात्मक मूल्य वाढले आहे. श्री. चंद्रमोहन कुलकर्णींनी काढलेल्या अप्रतिम मुखपृष्ठाने व रेखाचित्रांनी ते सजले आहे.
कलेकडे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघणार्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे, असे मला वाटते.
-- ©आसावरी गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा