झोका, झोपाळा, हिंदोळा काहीही म्हणाला तरी मन भूतकाळात, आपल्या लहानपणी अलगद जातं. असं म्हणतात, संगीत हे परमेश्वराशी तादात्म्य साधून देतं, तसंच झोका आपल्या बालपणाशी तादात्म्य साधून देतो. झोपाळ्यावर बसलं की मन आपोआप भूतकाळात जातं आणि मोरपीस होऊन आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलू लागतं.
झोपाळा म्हणालं की आठवतो, माझ्या आजोळच्या वाड्यात असलेला पाटाचा झोपाळा. आजोबांनी आम्हा नातवंडांसाठी, खास सागवानी, मोठा झोपाळा पडवीत बसवला होता. त्या झोपाळ्यावर ओव्या म्हणत बसलेली आज्जी आठवते , गोष्टी सांगणारे आजोबा, आमच्याबरोबरीनं लहान होऊन खेळणारे मामा, मामी, मावशी , आणि आठवतात झोपाळ्यासाठी भांडणारी आणि लहान आहे म्हणून जिंकणारी भावंडं. आणि बरोबरीनं आठवतात झोपाळयावर केलेल्या खोड्या, केलेला दंगा. त्यामुळं पडून झालेल्या जखमा तेंव्हा जरी दुखऱ्या होत्या पण आज त्या सुखद आठवणी आहेत. आमच्या घरात बाबांनी दोरी बांधून झोळी करून केलेला झोपाळा आठवतो. माझा आणि माझ्या धाकट्या भावाचा त्यावर बसण्यासाठी झालेलं भांडण आठवतं. आई शाळेतून काम संपवून दमून घरी आल्यावर २ मिनिटे झोपाळ्यावर का बसायची ते आता कळतं. खरंतर पूर्वीच्या काळी माहेरवाशीण आणि झोका यांचं खूप प्रेमळ नातं होतं. त्यांच्यासाठी तर तो माहेरचा सांगाती होता.
खूप खेळणी असूनही बागेत खेळायला गेल्यावर झोपाळ्यासाठी आम्हा मित्रांच्यात चढाओढ असायची. अगदी झोपाळा नाही मिळाला तर बागेत असणाऱ्या पारंब्या झोक्याचा आनंद द्यायच्या.आज ही कितीही अत्याधुनिक खेळ आले असले तरी आजच्या मुलांची झोपाळ्याची ओढ तेवढीच आहे. मुलेच काय मोठी माणसंही झोपाळ्यावर बसण्याचा मोह आवरू शकत नाहीत
झोपाळा हा जन्माला आल्यावर भेटणारा कदाचित पहिला मित्र. आईच्या कुशी नंतर समाधानानं बाळ पाळण्यातच झोपते. कदाचित देव त्याला सांगत असावा पुढचं जीवन असंच अस्थिर आहे, कधी पुढे तर कधी मागे. पण मागे आल्यावर मिळतील तुला झोका देणार्यांचे प्रेमळ स्पर्श तर पुढे कर्तृत्वाचा आनंद. तू जेवढा मागे येशील तेवढाच पुढे पण जाशील, म्हणून, मागे आलास म्हणून दुःखी होऊ नकोस. आणि जेवढा पुढे जाशील तेवढाच मागे, म्हणून पुढे गेल्याचा गर्व करू नकोस.
झोपाळ्यावर जसा कुठे हि असो, पुढे अथवा मागे, कायम आनंद असतो तसंच आयुष्यात कुठेही असलो तरी आनंदी राहण्याचं तत्वज्ञान झोपाळा शिकवतो. हे शिकून आपण आपला जीवन आनंदमय करायचा प्रयत्न करू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा