रानडुक्कर फॅमिली रस्ता क्रॉस करताना दिसली. अनेक सुंदर पक्षी बघितले. तेंदू पत्ता ची पानं आणि फळं पाहिली.वडाच्या पारंब्यांनी केलेली कमान, मधमाशांच्या पोळ्यांनी भरलेलं झाड अशा खूप गमतीजमती पाहिल्या. आता गाडी एका सपाट गवताळ जागेवर पोचली. तिथं अक्षरश: शेकडो हरणं दिसली.(तिथेच हत्तीचं कुटुंब पण होतं असं आम्हाला हॉटेल वर पोचल्यावर कळलं. आम्हाला ते दिसलं नाही पण त्यांनी आम्हाला नक्की पाहिलं असणार आहे. कोणीतरी कोणालातरी पाहिलं हे महत्वाचं नाही का 😀) एव्हाना सफारी संपत आली होती. निसर्गानं भरभरून आनंद दिला होता. आणि वाघ दिसल्यामुळे तो द्विगुणित झाला होता.
या दोन तासात इतकंच कळलं कि जंगल म्हणजे खरंतर फक्त वाघ नसतोच. झाडांचे हिरवे वास, पक्षांचे आवाज, पानांची सळसळ, धुळीचे रस्ते, रोज प्राण्यांची तहान भागवणारे पाणवठे, हिरवाईच्या हजारो छटा, झाडं, झुडुपं, वेली, मुंगीपासून ते हत्तीपर्यंत एकमेकांवर अवलंबून असणारे प्राणी हे सगळं म्हणजे जंगल. "जीवो जीवस्य जीवनम्" हे नुसतं इतके वर्ष पुस्तकात वाचलं होतं पण या ओळींचं जिवंत रूप म्हणजे जंगल. वाघ हा त्यातला महत्वाचा भाग असं कसं म्हणायचं ? कारण या साखळीतले बाकी काही प्राणी नसतील तर वाघाचं काय होईल ? जंगलातले दोन तास भुर्रकन उडून गेले. परत नक्की भेटायचंच असं मनाशी पक्कं केलं आणि तृप्त मनानं तिथून बाहेर पडलो.
कालचा दिवस वैतागाचा होता तर आजचा समाधानाचा.नित्य नवा दिवस नित्य नवा अनुभव. आज ट्रिप ची शेवटची रात्र. उद्या निरोप घ्यायचा होता.आज केसरी तर्फे “गिटार शो” होता. बुद्ध पौर्णिमेचा चंद्र, जंगलाचा सुरेख अनुभव आणि समोर कराओके वर एक स्थानिक कलाकार जुनी हिंदी गाणी गात होते. कराओके वर आम्ही सुद्धा जरा घसे मोकळे करून घेतले. शेवटी आपल्या महाराष्ट्र राज्याचं नृत्यगीत सैराट वर नाचून घेतलं. 10 वाजता कार्यक्रम संपवावा लागला तेव्हा लक्षात आलं कि त्या माणसाने गिटार आणून नुसतीच बाजूला 'शो' म्हणून उभी केली होती. गाणी तर सगळी कराओके वर गायली.(त्यातली अर्धी आम्हीच गायली 😜). पण एकंदरीत मजा आली. जेवण करून रूम वर जाऊन सामान बांधलं. उद्या परतीचा प्रवास असणार होता.
-©️स्मिता श्रीपाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा