लेबल

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

प्रवासवर्णन

 भोरगिरी ते भिमाशंकर-तेजाची न्यारी दुनिया



ट्रिनिटी अ‍ॅडव्हेंचरच्या भोरगिरी ते भिमाशंकर काजवा महोत्सवाच्या बऱ्याच बॅच होत होत्या आणि नुसत्या होत नव्हत्या तर भरभरून वहात होत्या. सतत त्या ट्रेकची माहिती ऐकत होते, एवढासा लहानसा जेमतेम 15 दिवसांचे आयुष्यमान असलेल्या स्वयंप्रकाशमान किटकांना बघण्याची  उत्सुकता होतीच आणि अचानक संधी आली; हिमालयाच्या कुशीतून परत येऊन 15 दिवस होतात न होतात तोच संदेश म्हटला की मी हा ट्रेक लीड करणार आहे, साचीला घेऊन जात आहे, तुझे काय? आता आली का पंचाईत …हो म्हटले तरी पंचाईत नाही म्हटले तरी पंचाईत. दोन्ही कडून माझी कोंडी (यासाठी माझा आधीचा लेख हिमालयीन ट्रेक बघा https://shalakamehta.blogspot.com/ ). पण अचानकच साचीची मैत्रीण आणि तीची आई दोघी येणार म्हटल्या (मुग्धा आणि प्रिती) मग मला सुध्दा परत फोर्स झाला आणि मी एकदाची निघाले (मनातून जायचे होतेच, पण थोडा भाव खावा लागतोच😉😏…)


जून महिन्याच्या 2 तारखेला रात्री आम्ही पुण्यातून निघालो. जुनावणे पार्किंग(कर्वेनगर डि.पी. रोड)वरून बस घेऊन पहिल्यांदा कात्रज झू जवळ गाडी थांबवून तेथे सगळ्या माकडांच्या टोळीला🐵 घेतले. आल्या आल्या त्यांची मजा मस्ती सुरू झाली होती. नंतर पुढे जाऊन जुनावणे पार्किंग येथे बाकीची बरीचशी मंडळी आली तेथे कल्याणी आणि ओंकार हे दोन लीडर्स सुध्दा बसमध्ये चढले, मग पुढे शिवाजीनगर, नाशिक फाटा येथे लोकांना घेऊन, बस मार्गस्थ झाली. बसमध्ये सगळी माकडांची टोळी गाणी म्हणत ,गप्पा मारत होती, बाकीची मंडळी पण गप्पा मारत होते, काही जण झोपली होती.


3 जूनला पौर्णिमा असल्याने आज चंद्राचा दिमाख काही औरच होता, कधी ढगांच्या आड लपत लपाछूपी खेळत होता तर कधी समोर येऊन त्याच्यातील ससे दाखवत होता. खूपच विलोभनीय असे दृश्य होते. बसमधून प्रवास करत असताना सतत आपल्या बरोबर असणाऱ्या चंद्राला बघून आपल्याला मोठ्या व्यक्तीचा आशिर्वाद मिळत आहे असेच वाटत होते. मजल दरमजल करत रात्रीच्या 2.30 वाजता आम्ही आमच्या डेस्टीनेशनला उतरलो. जून महिना असून अजून पावसाला सुरूवात झाली नव्हती त्यामुळे वातावरणात गरमी जाणवत होतीच; आणि अगदी हेच वातावरण काजव्याच्या विणीच्या हंगामाला अनुकूल असते त्यामुळे ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा…’ हे गाणे ओठावर तर मनात काजवे दिसावे हे स्वप्न बाळगत आम्ही निघालो. बस मधून उतरून सगळे फ्रेश झाले आणि थोड्यावेळात या किर्र अंधारालापण सारावले.


ट्रेक सुरू झाला तोच भोरगिरीच्या जंगलातून 🌳पण इथे सुरवातीला रस्ता मोठा होता आणि रात्रीची वेळ सगळीकडे निरव शांतता होती आमच्यामूळेच तिचा भंग झाला. सुरवातीलाच झाडांवर काजव्यांची विलोभनीय चमचम सुरू झाली होती. पण जसजसे आम्ही जंगलात आत जात होतो तसतसे जंगल 🌳अजून घनदाट होत होते आणि इथे आम्हांला मातीत बिबट्या,🐆 तरस यांसारख्या प्राण्यांच्या पायांचे ठसे सुध्दा दिसले. तिथल्या लोकल गाईडने आम्हांला हे सांगितले की हिरडा,आंबा,बेहडा,जांभूळ,उंबर इत्यादी निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा खेळ रंगत असतो; इथे त्यांची मायावी दुनिया अवतरली असते,त्यांचा शीत प्रकाश पसरलेला असतो. पण आपण पामर मानव, आपल्याला एवढ्या अंधारात दिसत नाही मग आपण टॉर्च लावून रस्ता बघताना त्यांच्यावर याचा प्रकाश टाकतो (आपल्याला जास्त चांगले दिसतील असे वाटून😕 )मग ते त्यांचा प्रकाश लुप्त करतात परत शांतता आणि काळोख झाल्यावर परत प्रकाशित होतात.


आमच्या ट्रेकच्या वेळी पण असे काही जण होते ज्यांना हे खूप वेळा समजावून सांगावे लागले पण त्यांना हे पटून जेंव्हा त्यांनी त्यांचा टॉर्च बंद केला त्यावेळी संपूर्ण अंधारात, पौर्णिमेच्या रात्री, मंद अशा चंद्रप्रकाशात काजव्यांच्या शीत प्रकाशाने भरलेल्या झाडाला बघताना देवळासमोरचा दिव्यांनी उजळलेला दिपस्तंभच आठवत होता अवर्णनीय असेच दृश्य होते ते!! जणू “लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया,झळाळती कोटी ज्योती या, हा हा!” 


काजवे बघत बघत पुढे जात होतोच पण आता ओढ होती ती भिमाशंकराच्या मंदिराची,जंगलातील आताची वाट ही खूपच अरूंद चढण असलेली पण काळोखातही तिची सुंदरता लपत नव्हतीच, नदीचे कोरडे पात्र, दगड, झाडे, वेली,झाडांची पडलेली सुकी पाने आणि याबरोबरच साप🐍, विंचू यांचे पण दर्शन झालेच तसेच रातकिड्यांचा किरकिर आवाज सुध्दा सोबतीला होताच आणि सकाळी देवाच्या कळसावरील सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर🌅 आणि धुक्याच्या शालीबरोबर आम्ही सुध्दा देवळात पाऊल ठेवले महदभाग्यच म्हणायचे!! बारा ज्योतिर्लिंगापैकी एकाचे दर्शन तेही शांतपणे, मनोभावे, गर्दीशिवाय अहो आश्चर्यम!!! पण खरच देवाचे दर्शन आणि देवानेच घडवलेल्या निसर्गाचे दर्शन दोन्हींचा संगम या ट्रेक मध्ये जुळून आला. रात्री लुकलुक होणारी काजव्यांची प्रकाशफुले डोळ्यांना सुखावून जातात; हे कुतूहलमिश्रित निसर्गवैभव पहातच रहावे असे दृश्य असते. काही ही म्हणा पण लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलेली ही रात्र बघण्याची मजाच काही न्यारी!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा