रंग मनाचे
" रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा.....
या सुंदरश्या गीताचे शब्द कानी पडले आणि मी माझ्या मनीचे रंग उलगडून पाहायला सुरुवात केली. आपल्या मनाच्या सर्वच रंगात आपण समरसून जातो. मला तर वाटते माझ्या मनीचे रंग जणू सूर्योदय ते सूर्यास्त असा प्रवास करीत असतात. कधी हसून, कधी रडून, कधी उत्साह, कधी चिंता, कधी आनंद, कधी उदासिनता अशा अजुन किती तरी रंगात माझे मन चिंब चिंब भिजून निघत असते.
माझ्या मनात विचार आला मनाच्या रंगांचा जीवनाशी, जीवनातील प्रत्येक टप्प्याशी कसे जोडावे? आणि मला सुचले असे काही -
' लहानपण दे गा देवा.....' याप्रमाणे अगदी आनंदी आनंद असणारे बालपण आपल्या सगळ्यांच्याच मनाला प्रसन्न ठेवते. आपले मन हसा, हसा आणि आनंदी रहा! हेच तर आपल्याला शिकवते. आनंद आणि राग या दोन भावना आपल्याला जन्मापासून माहीत असतात. यापैकी कोणती भावना आपण जास्त धरून ठेवायची हे आपल्याला आपले अनुभव शिकवतात. या भावना म्हणजे आपल्या मनाचे रंगच नाही का.....
सूर्योदयाच्या वेळी असणारे कोवळे ऊन म्हणजे रंग पिवळा, हा आपल्या मनाचा सुरुवातीचा रंग म्हणजे आपले बालपण. यानंतर येते ती किशोरवस्था. जरासा गडद झालेला पिवळा रंग. मला तर हा जरासा गुलाबी भासतो. हा रंग घेऊन आपले मन एका वेगळ्याच जगात जाते. मैत्री, प्रेम यांची ओळख व्ह्यायची ही सुरुवात. खूप छान छान गोष्टी या काळात घडतात. आपले पुढचे भविष्य या काळावर अवलंबून असते. आपल्या मनाची उत्तमप्रकारे ओळख या काळात व्ह्यायला सुरुवात झालेली असते. मनाशी हितगुज वाढते. या मनाच्या रंगात रंगून आपण आपली स्वप्न पाहायला लागलेली असतो. मनातल्या गोष्टी ऐकून त्या पूर्ण कशा करायच्या याचा विचार सुरू असतो.
पुढच्या टप्प्यावर जाताना मनाचे रंग छान दिसू लागतात, जाणवू लागतात. तारुण्यात प्रवेश केल्यावर सर्वच रंग सकारात्मक वाटू लागतात.
"मनावर एक अनामिक भूल, हे माझे पहिले पहिले पाऊल...." मनाने पाहिलेली स्वप्ने डोक्याचा वापर करून पूर्णत्वास नेण्यात येतात. या काळात आपण मनापेक्षा जास्त डोक्याचा प्रभाव अनुभवतो. या काळात भावनांच्या जोडीने तारुण्याचा गुलाबी रंग, मेंदीचा रंग, लाजेची लाली, हळदीचा रंग या रंगांसोबतच कधी रागाचा, द्वेषाचा लाल रंग ही अनुभवायला येतो. आपल्या डोक्यावर, आकाशात मध्यभागी तळपणारा सूर्य प्रखरतेची, जबाबदारीची जाणीव मनाला सतत करून देत असतो. पुढे प्रौढत्व कडे झुकताना रंग गडद होऊन ठाम झालेले असतात. रंगांची प्रखरता असली तरी अनुभवाच्या जोडीने ते आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतात.
"माझिया मना जरा थांब ना, पाऊली तुझ्या माझिया खुणा.... "जराशी स्थिरतेकडील वाटचाल आपल्या मनाला शांततेची जोडही देत असते. प्रौढत्वाकडून पुढे झुकणारे वय त्यात अनुभवाने पांढरे झालेले केस दर्शवतात. कितीतरी उन्हाळे, पावसाळे, स्थिरता, शांतता, वादळे यामनाने आत्तापर्यंत पाहिलेली असतात. आयुष्यात येणारे चढ-उतार पाहिलेले, तसेच अनुभवलेले असतात, पहात असतात. म्हातारपणाकडे झुकतांना संधीप्रकाश आपल्या मनाला बरेच काही देऊन जातो. कधी शितलता, कधी प्रखरता, कधी कोमलता देत पुढे हे मन म्हातारपणात साथ द्यायला सज्ज झालेले असते. आत्तापर्यंत बरेच उन्हाळे, पावसाळे पाहिलेले असे हे आपले मन, आता एकदम शांत झालेली असते. आपल्या भगवंताच्या स्मरणाचा पांढराशुभ्र रंग ते अनुभवत असते. मनाची ओढ भगवंताच्या भेटीसाठी लागलेली असते, अतुरअसते. प्रत्येक टप्प्यावर विविध रंगांचा अनुभव व उधळण करीत असणारे मन कितीकिती कायकाय देत असते. आपण अख्ख जग या मनाने क्षणभरात फिरून येतो. हवं तिथं क्षणात पोहोचतो. हवं ते क्षणात करतो.
रंग मनाचे उमलून यावे भाव जीवनाचे,
पानापानात फुलत जावे गाणे मनाचे,
रंगात रंगुनी या उलगडावे रहस्य जीवनाचे,
रंगात रंगुनी या समजावे गीत मनाचे||
कधीतरी या मनाला विचारावे," रे मना सांग तुला काय हवे, रे मना सांग तुझ्या मनीचे भाव मला" मनाच्या गाभाऱ्यात शिरून मनातील भाव जाणून घ्यावे. बघा मग हे मन कसे शांत होते आणि मनातील सगळेच रंग फुलपाखरासारखे सुंदर होऊन आपल्याला दिसतात, जाणवतात, उमजतात. मनाचे रंग समजून घेताना त्या रंगात आपण समरसून जावे तरच ते रंग प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला आपल्याला मोहवून टाकतील हे नक्की.
©धनश्री केयूर कानडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा