“फुटबॉली” ज्वर आणि “मेस्सी” नावाचं गारुड
शीर्षक वाचून पटकन असं मनात येईल की किती गुळगुळीत वाक्य आहे आणि अगदीच चावूनचावून चोथा झालेले हे शब्द आहेत !! बरं मग? असू देत की, आणि काही फरक पडत नसतो ... परवा कतारमध्ये जे नाट्य घडलं, त्यासाठी समर्पक आहेत. ...
धन्य जाहलो, असं म्हणावं किती क्षण/अनुभव आपल्यासारख्या किडूकमिडूक माणसांच्या आयुष्यात येतात? अगदी
दुर्मिळच खरंतर, पण जे असे क्षण येतात, ते मात्र जरूर भरभरून जगावेत ! आणि
परवा जगभरातल्या असंख्य जनतेला “त्या” क्षणाची अनुभूती देण्याचं काम फुटबॉल
वर्ल्डकपच्या फायनलने केलं. हिरव्याकंच गालिच्यावर फुटबॉलचं नव्हे पदलालित्याचं विलक्षण
नाट्य रंगलं होतं. काय नव्हतं त्यात? नाट्य तर होतंच, वेग होता, थरार
होता, उत्सुकता होती, उत्कटता होती, निराशा
होती, जिद्द
होती, विजिगीषु
वृत्ती होती. रात्र सरत गेली, आणि
हा नाटकाचा अंतिम अंक अधिकाधिक उत्कंठा वाढवतच गेला. सर्वसाधारणपणे लाथ मारणे ह्या
क्रियेला कौंटुंबिक किंवा सामाजिक गुणवत्तायादीत शेवटाकडलं स्थान असतं. पण परवाची
रात्र मात्र केवळ आणि केवळ त्या पळणाऱ्या पायांसाठी चिरंतन स्मरणात राहील. जगभरातल्या
अब्जावधी फुटबॉल रसिकांना,
'य' काळपर्यंत स्मरणात राहील अशी, सर्वोत्तम
फुटबॉलची जंगी मेजवानी मेस्सी-एम्बापे प्रभुतींनी काल दिली. चित्तथरारक,
nail-biting,
श्वास रोखून धरणारी वगैरे वगैरे विशेषणांनी सुविख्यात झालेली फिफा विश्वचषकाची
अंतिम फेरी आणि “मी आणि फुटबॉल” ह्याला जोडणारा एक दुवा असं काहीसं ह्या
लेखनप्रपंचाला म्हणता येईल.
थोडं मागे जातोय... तमाम एत्तदेशीय मंडळींसाठी १९८३ हे वर्ष हिंदुस्थानने जिंकलेला क्रिकेट विश्वचषक ह्या एका कारणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आणि आमच्यासारख्या “born and brought up” मुंबईकरांसाठी तर जरा जास्तच … माझ्यासारखी ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस जन्म झालेली मंडळी तेव्हा पाच-सात वर्षांची, म्हणजे कळत्या-नकळत्या अश्या अडनिडी वयातील... पण ही घटना त्यावेळेस इतकी मनावर कोरली गेली, की क्रिकेट हा एकमेव मैदानी खेळ म्हणून आम्हाला माहीत होता. थोडं पुढे जाऊन सांगायचं तर, पुल म्हणतात त्याप्रमाणे मुंबईत चाळींच्या गॅलरीत टेस्ट मॅचेस चालत असत, आणि ह्यात कुठलीही अतिशयोक्ती नाहीये. तेव्हाच्या शालेय मेंदूत पक्कं बसलेलं समीकरण म्हणजे “मैदानी खेळ = क्रिकेट” ... गावस्कर, वेंगसरकर, संदीप पाटीलसारखे मुंबईकर किंवा कपिल पाजी सारखे उत्तरेतील क्रिकेटर, ही मंडळी आमचे सर्वस्व होती, आणि अगदी सचिन-द्रविडच्या आगमनापर्यंत क्रिकेट कायमच नंबर एक होता.
हे सगळं सांगायचं निमित्त इतकंच की फुटबॉल ह्या प्रकरणाची तोंडओळख व्हायला किमान माध्यमिक इयत्ता उजाडली. तेव्हाच्या दूरदर्शनवर विम्बल्डनचे सामने दाखवले जात असत, त्यामुळे टेनिस थोडंफार माहीत होतं. बेकर-एडबर्ग ही जोडगोळी आणि वन अँड ओन्ली स्टेफी ग्राफ, ह्या मंडळींनी घरी पुस्तकांच्या किंवा कपड्यांच्या कपाटांच्या दारावर जागा पटकावली होती. परंतु, नाही म्हणायला सुट्टीत चौपाटीवर वाळूत (घरापासून चौपाटी जेमतेम हाकेच्या अंतरावर) खेळायचा उत्तम खेळ; कारण आडव्यातिडव्या उड्या मारल्या तरी वाळूमुळे लागत नाही, ही खरी गंमत आणि थोडा स्वार्थ सुद्धा... आणि त्यानिमित्ताने तरी का होईना, थोडाफार फुटबॉल खेळला जाऊ लागला, पण तरीही तो “सीझनल” खेळ होता.... मात्र, दूरदर्शनवर पाहिलेला मॅराडोना नक्कीच आठवतोय, त्याचं ते पायात-पायात बॉलला घुटमळवत जोरदार मुसंडी मारणं आठवतंय. त्याचा hand of god गोल आठवतोय, अंधुकसाच!
नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभीच डिजिटल क्रांती का काय ते म्हणतात, ते झालं आणि सॅटेलाइट वाहिन्या घरोघरी पोहोचल्या आणि खऱ्या अर्थाने फुटबॉल बघायला सुरुवात झाली. आणि तोवर शालेय शिक्षण संपून कॉलेज सुरू झाले होते. ज्याला win-win म्हणतो, तसं काहीसं घडलं. कॉलेजमध्ये असणारी जनता वेगवेगळ्या भागातील आणि वेगवेगळ्या शाळांमधील असल्याने क्रिकेटखेरीज बाकीच्या खेळांचीही अधिक माहिती झाली. त्याच दरम्यान आला तो १९९४ सालचा फुटबॉल विश्वचषक.. आणि त्यावेळेस मात्र ह्या खेळाने मनाचा जो काही ताबा घेतला, तो आजतागायत तितकाच, किंबहुना क्रिकेटपेक्षाही काकणभर वरचढ टिकून आहे...
रॉबर्टो बॅजिओ, रोमारीओ, बेबेटो, क्लिन्समन, मालडिनी, मार्सिओ सँटोस अशी सगळी मंडळी अगदी गळ्यातील ताईत होऊन बसली, कॅरमच्या चकत्या सटासट माराव्यात, तशी ही नावे आम्ही उच्चारू लागलो. आणि त्यातून निष्पन्न झालेली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने फुटबॉल खेळू लागलो, त्यातले बारकावे समजून खेळू लागलो. मग यथावकाश लीग किंवा क्लब फुटबॉल हा प्रकार कळला आणि EPL, Champions League किंवा Laliga सारखे सामने आवडीने बघू लागलो, अमुक एका खेळाडूवर (तितकसं माहीत नसतानाही) अधिकारवाणीने मतप्रदर्शन करू लागलो, त्यांना मिळणारे मानधनाचे आकडे आणि बाकी सुविधा, हे सगळं वाचून थिजून जाऊ लागलो. क्रिकेट वर्ल्डकप चार वर्षांनी येतो, पण इथे तर सतत काही ना काही चालूच असते , हे ही कळलं. चार वर्षांनी येणारा फुटबॉल वर्ल्डकप, Euro cup किंवा Copa America सारख्या टूर्नामेंट्स हे तर होतेच पण दरवर्षीच्या ह्या league matches वेड लावू लागल्या.
हलकंसं विषयांतर.. म्हणजे बघा हं ,की विषुववृत्त आणि भूमध्यरेखा जिथे कुठे अटलांटिक महागरात एकमेकांना छेदतात, त्या बिंदुला केंद्र मानून जर चतुर्थांश केले, तर त्यातील डावीकडचा खालचा चतुर्थांश मला कायमच संभ्रमात टाकत आलाय. त्यामुळे शाळेत असताना दक्षिण अमेरिका ह्या खंडाबद्दल कायमच कुतूहल असायचं, “पेरू” किंवा “चिली” ही नावे देशांची आहेत, हे त्या बालमनाला झेपायचंच नाही, अशी नावे देशांची कशी असू शकतात? आणि त्यातही शालेय भूगोलातून कळलेली अॅमेझॉन नदी, तो वर्षभर पडणाऱ्या पावसाचा प्रदेश आणि मुख्य म्हणजे तिथले अॅनाकोंडा हयाविषयी कायमच एक आश्चर्यमिश्रीत भय असायचं. परंतु, पुढे जेव्हा कळलं की ह्या भागातील प्रमुख खेळ फुटबॉल आहे, आणि मग जी काही कौतूहलदरी होती, ती एकदमच मिटली. अर्जेंटिना, ब्राझिल, इक्वेडोर, उरूग्वे, पॅराग्वे असे देश एकदमच “दोस्त” झाले.
Returning to original … १९९८ किंवा २००२ चे फुटबॉल वर्ल्डकप्स एका “तंदुरुस्त” दृष्टिकोनातून बघितले. रोनाल्डो, रिवाल्डो, झिडान, डेशचॅंप, रोन्हाल्डिनो, कार्लोस, काका, काफू ह्या मंडळींवर जोरदार “चर्चासत्रे” झडू लागली, आणि प्रसंगी एकदम शाब्दिक हमरीतुमरी सुद्धा व्हायची. पुढे नोकरीच्या निमित्ताने युरोपात जाणे झाले आणि मग तिथल्या ह्या अनेक पंढरींचे ह्याची देही, ह्याची डोळा दर्शनही झाले. जो भाव Lords स्टेडियम बघताना होता, त्याच्या तसूभरही कमी विम्बल्डन किंवा चेल्सी/आर्सेनल/लिवरपूल बघताना नव्हता. दरम्यानच्या काळात बाकी व्यस्ततेमुळे फुटबॉल बघणं थोडं कमी झालं, तरीही मुख्य स्पर्धा, किमान फायनल्स तरी बघितल्या जायच्याच.
वैयक्तिक मला दक्षिण अमेरिकन फुटबॉल जास्त आवडतो. ते पदलालित्य, तो वेग, बिनधास्तपणे समोरच्या D line मध्ये धडक मारण्याची हिम्मत, हे सगळं फारच भावतं. अगदी स्ट्रीट फुटबॉल खेळावा, इतक्या सहजतेने हे अर्जेंटाईन किंवा ब्राझिलियन मैदानात बागडतात. खेळाची मजा घेणे आणि त्याचबरोबर गोलही करणे, असे दोन्ही सहज साधले जाते. त्याउलट युरोपातील फुटबॉल आहे. काहीश्या यंत्रवत हालचाली करतात, पूर्वीच्या काळात टेलीफोन ऑपरेटर्स कसे एक line काढून दुसरीकडे जोडून देत, थोडं त्याचप्रकारे ह्यांचा खेळ चालतो, छोटे छोटे पासेस देत समोरच्याला जेरीस आणतात. ते पासेस अचूक असतात, ह्यावर दुमत नव्हेच पण त्यामुळे overall किंचित थंडपणा येतो. मी काही फुटबॉलतज्ञ नव्हे, पण अल्पमतीप्रमाणे केलेलं हे विश्लेषण आहे.
खरं सांगायचं , तर ह्या सगळ्याकडे परत actively वळलो ते चिरंजीवांमुळे. आपली पिढी ज्याप्रकारे क्रिकेट बघायची, तोच प्रकार ह्या नवीन पिढीत फुटबॉलविषयी आहे. एक मेस्सी किंवा रोनाल्डोसारखा खेळाडू घेतला, तर त्याची सगळी, इत्यंभूत माहिती ह्या नवीन जनतेकडे असते. दिमतीला गुगल आहे, समोर नानाविध स्पोर्ट्स वाहिन्या आहेत, त्यामुळे एकदम updated.
Backward short leg, Covers-point किंवा Deep Mid-Wicket वर आपण ज्या अधिकाराने बोलायचो, त्याच अधिकारवाणीने ही जनता Centre Midfielder, Right Winger, Full Back ह्यावर टिप्पणी करते. थोडी गंमत सांगतो, काल जेव्हा पदके बहाल होत होती, तेव्हा जर्सीच्या अनुक्रमांकाने खेळाडूंना बोलावले जाते, आमच्या चिरंजीवांना सगळे जर्सी नंबर्स आणि त्याचे “मालक” तोंडपाठ; कधी पाढेसुद्धा इतके तोंडपाठ नव्हते.
मेस्सी हा काय प्रकार आहे हो?
काय कप्पाळ उत्तर देणार? गेली अठरा-वीस वर्षे हा गृहस्थ मैदानावर पळतोय, जिथे कुठे संधी मिळेल, ते अचूक हेरून बॉल गोलपोस्टमध्ये लीलया ढकलतोय, कधी अचानक-भयानक “टपकून” आपल्याच attacker ला पास देतोय, आपण किती महान आहोत, हे विसरून कॉर्नर किक मारतोय, आपल्या संघाला सगळ्या प्रकारची ऊर्जा पुरवतोय, मग तो देशाचा संघ असो वा क्लबचा, आपल्या धसमुसळ्या खेळामुळे फाउल झालाय तर त्यात वाद न घालता, प्रतिस्पर्धी खेळाडूला हात देऊन उठवतोय, रेफ्रीशी वाद घालणं दूरच, किंबहुना रेफ्रीच्या निर्णयाविषयी आदरच दाखवतोय. स्वत:च्या निरागस हास्यात मैदानावरचा ताण क्षणात दूर करतोय. प्रसिद्धी, संपत्ती, प्रतिष्ठा ह्या सगळ्याच्या उच्च स्थानावर असूनही जमिनीवरचे पाय घट्ट रोवून उभा राहतोय.
ह्या सगळ्या आणि अजून अनेक विशेषणांना एका शब्दात उत्तर कसं द्यायचं ?
कालच्या खेळातून ह्या सद्गृहस्थाने काय दिलं नाही ?
पंधरा मिनिटे स्पॉटजॉगिंग करून थकणारे आपण, आणि अविश्रांत अडीच तास पळणारा “तो”... मानवी कान झेलू शकणाऱ्या डेसीबल्सच्या पुढे मैदानात आवाज असतो, त्यातही शांतपणे पेनल्टी किक्स मारणारा “तो”... एम्बापेसारखा वयाने खूप लहान पण अतिशय तुल्यबळ प्रतिस्पर्धी असूनही मन शांत ठेवून खेळणारा “तो”... सांघिक खेळाचा वस्तूपाठ दर्शवणारा “तो”... जिंकल्यावर संघसहकाऱ्यांना कडकडून मिठी मारणारा “तो”... आपल्या चिमुरड्यांना जवळ घेऊन आनंद व्यक्त करणारा “तो”... गोल्डन बॉलचा पुरस्कार मिळाल्यावर खाली उतरताना वर्ल्डकपला हलकेच कुरवाळून जाणारा “तो” ... वर्ल्डकप हातात आल्यावर बेधुंद नाचणारा “तो” ... शब्द अपुरे पडतात “त्या”च्या वर्णनाला.
फ्रान्स मागे पडतोय असं बघून परवा सत्तराव्या मिनिटाच्या आसपास एम्बापेने गियरच बदलला. तो अगदी सुसाट , जणू फॉर्म्युला-वनच्या वेगाने कोसळतोय, त्याच्या गतीमान चाली सरळ गोलपोस्टकडेच आदळत आहेत, आजूबाजूला दोनतीन प्रतिस्पर्धी खेळाडूंनी आपल्याला जाणूनबजून जखडून ठेवायचा प्रयत्न नेटाने चालवलाय, अश्या परिस्थितीत हा गृहस्थ शेवटच्या काही मिनिटांत अनाकलनीय चाल रचून बरोबरी साधतोय... हे नक्की काय आहे?
सहज जाताजाता - सहावी-सातवीत घेतलेली “दहा” नंबरची “मेस्सी” जर्सी चिरंजीवांनी जीवापाड अजूनही जपली आहे, त्याला छान background करून तो मेस्सी चिरंजीवांच्या खोलीत भिंतीवर स्थानापन्न आहे.
असो, तर फ्रान्सचा परवाचा खेळ म्हणजे दीर्घ आलापीनंतरची एकदम द्रुतलय किंवा तराणा. पण त्याच वेळेस अर्जेंटिना आणि मेस्सी ह्यांचा खेळ म्हणजे रागमाला होती. सुरुवातीला अगदी बसंत किंवा सोहोनीसारखा, दणादण चालींचा वर्षाव करणारा, मध्येच त्याला दरबारी कानड्यातील एखाद्या मध्यलयीतल्या बंदिशीपर्यंत उतरणारा. आणि शेवटची पेनल्टी शूटआउट म्हणजे सदासर्वकाळ आठवणीत राहणारी भैरवी !!
अर्जेंटिनाला नवचैतन्य लाभले आहेच, मॅराडोनासुद्धा स्वर्गात निवांत “धूर” ओढत बसला असेल… ह्या जादूगाराने अजून काय द्यावे, अशी अपेक्षा आहे? मानवी क्षमतेच्या पलीकडे ऑलरेडी देऊन झालंच आहे की. नकळतच सचिनची आठवण होते. मेस्सी आणि सचिन; दोघेही तितकेच थोर, देशासाठी/खेळासाठी सर्वस्व वाहणारे. निवृत्तीनंतर सचिन विस्मृतीत गेला का? वर्ल्डकप जिंकला म्हणून मेस्सी आत्तापुरेसा प्रसिद्धीच्या झोकात आणि नंतर अज्ञातवासात, असं थोडंच होणार आहे का? ही मंडळी तुमच्या-आमच्या मनावर कायमच अधिराज्य करत राहणार ही खात्री आहेच !!!
Ü मिलिंद फडके (२०-डिसेंबर-२०२२)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा