गेल्या आठवड्यात मैत्री हा विषय होता पण तेव्हा काही लिहू शकले नाही कारण आमचा एक जिवलग मित्र तेव्हा हॉस्पिटलमधे मृत्यूशी झुंज देत होता.
पक्षी आणि जंगलांचा अभ्यासक, पर्यावरण व जैव विविधता तज्ज्ञ, जीवितनदी, पुणे प्रकल्पातील एक संचालक, पुण्यातल्या सलीम अली Bird sanctuary साठी झटणारा आमचा मित्र धर्मराज पाटील याचं काल दुर्दैवाने निधन झालं. धर्मराजवर काही लिहीलं आहे ते इथे आज पोस्ट करते. Hope it's fine..
....असं मित्रांना कोणी अर्ध्यावर सोडून जातात का रे धर्म्या ?? कुठे गेलास तू असा मधेच.. तुझा मनस्वीपणा, तुझी जिंदादिली, तुझा संवेदनशील स्वभाव, तुझं निसर्गप्रेम, तुझ्या कविता, तुझं लोकांना जीव लावणं, तुझं भांडणं हे सगळं आता काय फक्त आठवणीतच का??
स्वतः प्रपंच केला नाहीस, पण आमच्या घरांत रमलास, आमच्या मुलांवर प्रेम केलंस, त्यांचा लाडका काका झालास, त्यांना कवितांची- गोष्टींची आवड लावलीस, त्यांना पक्षी बघायला शिकवलंस, त्यांना निसर्गात रमायला शिकवलंस, त्यांचाही मित्र झालास...
राधा मोठी होत असताना तू तिच्या आजूबाजूला असावंस असं वाटत असताना मधेच कुठे निघून गेलास तू??
आज मला तुझी एक कविता खूप आठवते..
एकदा मी हात उंचावून
आकाशाचा तुकडा काढला...
आणि म्हणालो,
“आता मार अनंताच्या गप्पा!"
आकाश थोडे काळवंडले...
पण पट्कन सावरले.
उत्तरले,
“अनादी अनंत वगैरेची चिंता नाही मला....
त्या तुकड्याबरोबर आलेल्या दोन चांदण्या तेवढ्या परत कर मला !!”
तू अनंताच्या प्रवासाला तर निघून गेलास..पण त्या दोन चांदण्यांचं काय??... पण मग लक्षात येतंय की दोन चांदण्या नेल्या असल्यास तरी आयुष्यभर पुरेल इतकं चांदणं देऊन गेलायस तू...
असं म्हणून आम्ही स्वतःची नुसती समजूत घालून घेतोय रे..
इतक्या कविता केल्यास...पण कधीही कुठेही वाच्यता नाही. ना कुठे कधी त्या प्रसिद्ध केल्यास.. पण तुझ्या धीरगंभीर आवाजात त्या कविता आयुष्यभर कानावर पडत राहतील, ऐकू येत राहतील..
अशीच तुझी अजून एक कविता...
भारलेला कवी..
एक कवी भारलेला
खोल गेला कवितेमध्ये
खोल खोल शब्दांपर्यंत
शब्दांच्या श्वासापर्यंत
जिथे काळ शून्य होतो
जिथे स्थळ नगण्य होते
तो तिथेच राहून गेला.
एक एक शब्द बाहेर आला..
आता तो असतो कागदावर,
कविता त्याला वाचत असते !...
कवी जरी आपल्यातून गेला तरी त्याच्या कवितेतून तो जिवंत असतो हे वाक्य तुझ्या रूपाने प्रत्ययाला यावं यासारखी दुसरी दुर्दैवी गोष्ट नाही..
धर्म्या, you will be missed Forever...
© अदिती जोगळेकर-हर्डीकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा