लेबल

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

मैत्री

 मैत्री .....

मैत्री , वाचायला बोलायला अगदीच छोटासा शब्द परंतु तो जगायला आणि निभवायला तितकाच मोठा आहे बर का !

मैत्री ही दोन व्यक्तींची, दोन मनांची..

इतकचं नाही तर मैत्री ही वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळ्या स्वभावांची आणि वेगवेगळ्या गुणांची असते. ज्याला मैत्रीचा अर्थ कळला तो या सगळ्याच साच्यात अगदी घट्ट बसला. 

मैत्री म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीचा हितचिंतक असते, म्हणजे एकमेकांच्या हिताची परस्पर इच्छा असणे आणि एकमेकांच्या आनंद, प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्न करणे ही मैत्री होय.

   कधी अगदी जवळच्या नात्यात असलेलं एक अवघडलेपण असतं किंवा 'तू तुझ्या घरी सुखी, मी माझ्या घरी' असं वरकरणी म्हणालो तरी आपण  मात्र आतून झुरत असतो कारण नात्यातल्या लोकांचे उपकार किंवा मदत हे  काहीवेळा  ओझ  बनून राहत . पण मित्रत्वाने होणारी मदत ही ओझ वाटत नाही.

      अत्यंत टोकाच्या वेदनेतून बाहेर आणणारे निष्णात हात, खरंतर काहीही साम्य नसताना असणारी गाढ मैत्री म्हणून होते .  जोडलेल्या नात्यांमधला उबदार जिव्हाळा हा न संपणारा असतो . मैत्री असं नातं आहे जे  इतर कोणत्याही नात्याने तोलता येत नाही. इतर नात्यांमध्ये आपण सौजन्याने वागतो पण मैत्रीत आपण मुक्त मनाने आयुष्य जगतो. या कारणास्तव मित्राला किंवा मैत्रिणीला अविभाज्य हृदय देखील म्हटले जाते.

आणखीन मैत्री म्हणजे काय ? हे सांगू इच्छिते, काहीवेळा  एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्याला पटत नाहीत ,स्वभाव पटत नाही .  मग ती व्यक्ती आपल्या कुटुंबातील असो किंवा आपल्या नातेवाईक मंडळीतील असो किंवा मग आपल्या कार्यक्षेत्रातील असो . तिथे पटलं नाही की मग खटके उडतात आणि मग विनाकारण वैमनस्य असेल किंवा कटुता  ही प्रखर पणे दिसते आणि मग ती दरी वाढत राहते. मला वाटतं की अशा वेळी त्या व्यक्तीला  विरोध करण्या पेक्षा त्याच्या विचारांना जाणून घ्या स्वभावाला जाणून घ्या काही वेळा आपण एकाच बाजूने विचार करत असतो आणि मग ती मतं किंवा स्वभाव पटेनासा होतो कारण अशी मतं , स्वभाव व्हायला काही वेळा  परिस्थिती कारणीभूत असते , ती स्वतः व्यक्ती नाही. आणि मग त्या व्यक्तीला ही आपण समजू लागतो थोडक्यात त्या व्यक्तीशी आपोआप मैत्री होते म्हणजेच त्या व्यकीच्या स्वभावाशी आणि विचारांशी आपण जोडले जातो.   म्हणजेच मैत्री होते ती त्या विचारांची स्वभावाची , आणि मग ती कटुता कमी होते . 

 जन्म आणि मृत्यू ह्या दोन बिंदूंच्या मध्ये असणारा हा प्रवास नेमलेल्या माणसांबरोबर होत असतोच, पण परिस्थितीनुसार हा  वेगळ्या माणसांबरोबर देखील  होतो. कधी न मागता, कधी मागून होत असतो. कधी न मागता होणारा प्रवास म्हणजेच एक निखळ मैत्री. मैत्री ही सांगून होत नसते .कितीतरी असे अनेक प्रसंग येतात अनेक घटना घडतात चांगल्या वाईट अशा प्रसंगी  किती माणसं भेटतात, ना नात्याची ना गोत्याची पण कुठलंतरी नातं जोडून जातात.  तेच तर आहे मैत्रीचं निखळ नातं.

      'Everything is planned' असं जर खरंच असेल तर ही कोणी जी आपल्या आयुष्यात येतात त्यांचं खरंच नातं असेल का कधी आपल्याशी, असं वाटत राहतं. आत्ताचं तर नाही मग आधी कधीचं ? कारण मैत्री हे असच नात असतं जे खर ,निस्वार्थी , त्यागाची भावना असलेलं, सतत दुसऱ्यासाठी झटणार, दुसऱ्याला आनंद देणार.   एखाद्या व्यक्तीबद्दल अपार माया, ममत्व, कणव दाटून येते ती अकारण असते का ? का खरंच आपलं काही थोडं त्या व्यक्तीकडे असतं ? का त्या व्यक्तीचं असतं काही आपल्याकडे ? पण याची उत्तरं कधीच मिळत नाहीत.कारण हे नात च मुळी  अकारण आहे. त्याला कुठेही अंत नाही आणि विसर तर नाहीच. 

मैत्री ला कुठलही बंधन नाही ना वयाच ना जाती धर्माचं . मैत्री सिध्द करावी लागत नाही कारण ती कृतीतून सिद्ध होत असते.  मैत्री हे नातं  एक आनंद देणार , सुखाच्या गुदगुल्या करणार नातं आहे, परमेश्वराने मैत्री हे नातं निर्माण केलं पण त्याची तुलना इतर कुठल्याही नात्याशी होऊ शकत नाही. विचारांचे आदान-प्रदान, एकमेकांची सुखदुःखं जाणून त्यावर केलेले चिंतन हेच मैत्रीचे भांडवल. मानवी आयुष्यातील सगळ्या नात्यांत कायम प्रफुल्लित राहील असं नातं म्हणजे मैत्री.

शेवटी एकच सांगेन की 

मैत्रीची नाती ही आपोआप सापडत जातात , कर्माचे सिद्धांत आत खोलवर जाणवत जातील, त्यासाठी  मनाची कवाडं उघडी ठेवायला पाहिजेत, ही अशी नाती अलगद जाणायला, त्यांच्याकडे डोळसपणे बघायला आणि त्यातला सुख दुःखाचा वाटा बिनतक्रार स्वीकारायला पाहिजे, नात्याला त्याच्या गुण दोषासकट स्वीकारायला पाहिजे   कारण...

*तेरा मुझसे है पहेले का नाता कोई 

युही नही दिलं लुभाता कोई*

धन्यवाद 

© सौ. स्मिता सचिन वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा