लेबल

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

जागतिक वडापाव दिवस

 काल जागतिक वडापाव दिवस झाला म्हणे!! थोडा रुक्ष झाला नई... आता वडापाव जागतिक आहे कि नाही हे माहित नाही, पण माझ्या भावनेच्या, आठवणींच्या आणि खाद्यसंस्काराच्या जगात तो अग्रणी आहे हे नक्की.लहानपणी बाहेर खाणं हा प्रकार फार नव्हता आणि फारशी पदार्थांची विविधता नव्हती तेंव्हा वडापाव , भजी, पुरी भाजी यांचं सगळ्यांच्या रसनेवर राज्य  होतं. वडापाव खरंतर बॅकबेंचर सारखा , सगळ्यांना मनातून हवाहवासा पण तोंडावर तेलकट, जंक असे टोमणे खाणारा.

            लहानपणी ट्रीपसाठी बाहेर पडलो कि मी माझ्या मामाच्या गाडीत बसण्याचा हट्ट करी, कारण त्याच्या गाडीचा वडापाव ब्रेक हमखास ठरलेला. तिथून सुरु झालेले वडापाव प्रेम कॉलेज पासून खूपच घट्ट झालं, नव्हे, तो अनेक घटनांचा महत्वाचा भागच बनला. सो कॉल्ड पॉकेट मनी मधून टपरीवर घेतलेल्या वडापावनेच मला कॉलेज बॉय झाल्याचा फील दिला होता हे चांगलंच आठवतंय . आणि याच दरम्यानच्या सगळ्या चांगल्या वाईट आठवणींचा हा अविभाज्य भाग बनला . ट्रेकिंग असो कि पावसाळी ट्रिप असो , मित्राचा वाढदिवस, सबमिशन झाल्याचा सेलेब्रेशन, पेपर झाल्यानंतरच डिस्कशन, क्रिकेट मॅच हरलो किंवा जिंकलो तरी वडापाव बरोबर आहेच. आणि त्यामुळेच बऱ्याचवेळी हा वडापाव आठवणींच्या हिंदोळ्यावर घेऊन जातो आणि बराच वेळ झुलवतो 

          त्याकाळात पिझ्झा बर्गर नसताना काय किंवा आज असताना काय, वडापाव, ८० आणि ९० च्या  पिढी साठी अढळ स्थानी आहे हे नक्की . मऊ लुसलुशीत चटणी लावलेला पाव, त्यात चुरचुरीत आवरणातून मसालेदार बटाट्याचा जिभेला बसणारा गरम आणि तिखट चटका आणि  तेंव्हा मिळणारी समाधानाची अनुभूती सारंच अवर्णनीय असते. अर्थात सगळी कडे ती मिळत नाही हं, त्यासाठी वडापाव वाल्याची साधना , तयारी आणि प्रेम असावं लागतं.

         डाएट वर आहे म्हणून अर्धा किंवा अजिबात वडापाव न खाणाऱ्या मित्रांबद्दल सहानभूती पूर्वक आदर व्यक्त करून मी चाललोय वडापाव खायला... आणि हो हे वाचून कुणाचं डाएट मोडत असेल तर त्याच्या पापात, अपराधी भावनेत भागीदार व्हायला मी अत्यंत आनंदाने तयार आहे


कौस्तुभ सांभारे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा