लेबल

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

शब्दप्रभू शांताबाई

 🍁शब्दप्रभू शांताबाई 🍁


"मी तर कधीचीच शब्दांची

ते कधी होतील माझे ?

त्यांच्याशिवाय कुठे उतरू

हृदयावरचे अदृश्य ओझे ?"

      आज शांता शेळके यांचा जन्मदिन.त्यामुळे सकाळी मी एफ एम रेनबो मुंबई वर त्यांच्या गीतांच्या विशेष कार्यक्रमाचा आस्वाद घेतला...खरोखरच कान आणि मन तृप्त झाले .एकाच व्यक्तीकडे किती वैविध्यपूर्ण प्रतिभा असावी ! .बांबूचे घर बांबूचे दार ,...शारद सुंदर चंदेरी राती..जा जा जा रे नको येऊ जा ना... सारखी तरल गाणी लिहिणाऱ्या शांताबाई किती सहज किलबिल किलबिल पक्षी बोलती सारखी बालगीते लिहितात ! तर मी डोलकर म्हणत दर्यावर घेऊन जातात ..तितक्याच विशुध्द भावनेने जय शारदे वागेश्वरी लिहितात .सरस्वती देवीचे इतके सुंदर वर्णन फक्त त्याच लिहू  शकतात.

       या भावना मनात कल्लोळ माजवत आहेत तोवर काटा रुते कुणाला म्हणत मन भावना विवश झाले .तर जिवलगा राहिले दूर घर माझे म्हणत आपल्या जिवलगाला आर्त साद घालू लागल्या .

      त्यांच्या या विविधांगी प्रतिभेचा विचार करत असतानाच त्यांच्याच ओळींचा मतितार्थ आठवला की .."इतक्या विविधांगी प्रतिभा माझ्याठायी पसरल्या आहेत की प्रतिभा बहुअंगी होत माझ्याठायी एकरूप झाली आहे अगदी ओतप्रोत" ....

         आता शांता बाईंच्या या गीतांच्या धुंदीत राहूनच वाट पहायची नभात असलेल्या चंद्रमाची आणि त्याच यामिनीची.

         मराठी साहित्याची वागेश्वरी ...शब्दप्रभू ..चतुरस्त्र लेखिका आणि कवयित्री ला मनापासून मानाचा मुजरा 🙏


©® सौ . स्वाती गणेश माने

             सातारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा