शिदोरी संस्कारांची
धमन्याधमन्यामधून वाहे संस्कारांची सरिता ।
काळासंगे चला, प्रवाही तिला ठेवण्याकरिता ।।
राष्ट्रबांधणी सकस कराया परिश्रमाने मळे फुलवू या ।
प्रत्येकाने काम स्वतःचे शंभर टक्के चोख करू या ।।
नुसते बोलून शून्य फायदा, 'कृतितून उक्ती' हाच कायदा ।
'आधी केले मग सांगितले' तर किंमत येईल शब्दा ।।
इथे न काही जाई वाया, निसर्गाकडे हेही शिकू या ।
साक्षीभावे कर्म करू या, बीज पेरता पुढे निघू या ।।
माणुसकीचे उदक शिंपता, पृथ्वीइतुके मोती पिकता ।
संस्कारांची ओंजळ भरता, खजिना होई कधी ना रिता ।।
अश्या शिदोरीसवे प्रवासा, कधी न टाकू घेतला वसा ।
आपुल्यासरिसा करू तया, जो भेटे मार्ग क्रमिता ।।
--©आसावरी गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा