लेबल

शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

चरैवेति चरैवेति

 चरैवेति चरैवेति।


आज एका वेगळ्या विषयावर लेख लिहिण्याचा विचार आहे. आपण रस्त्यावरून जात असतो, तेव्हा कितीतरी रहदारी असते. बस, ट्रक, टेम्पो, कार, रिक्षा, स्कूटर, बाईक, सायकली, चालणारी माणसं... समजा, आपल्यासमोर एखादी भारी गाडी थांबली आणि त्यातल्या मालकाला उतरण्यासाठी शोफरने दार उघडले  आणि त्याचवेळी दुसरीकडे कचकच ब्रेक दाबत एक बस थांबली, त्यातून एखादा माणूस घाईघाईने खाली उतरला... त्या दोन माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखाच असतो का हो आपला? काय विचार येतात अशावेळी आपल्या मनात? अगदी लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या नजरेत शोफर्ड कार मधून उतरणाऱ्या माणसाबद्दल एक प्रकारचा आदर, एक अदब दिसते आणि बस मधून उतरणाऱ्या किंवा फूटपाथवरून चालत जाणाऱ्या माणसाची कोणी फारशी दखलसुद्धा घेत नाही... नैसर्गिक निवडीचा न्याय लावल्यास किंवा दीर्घकालीन विचार केल्यास, एका माणसासाठी सहा-सात सीटर गाडी वापरणारा माणूस जास्त फायदेशीर की चालत जाणारा, सायकलवर जाणारा किंवा बससारख्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा वापर करणारा माणूस जास्त फायदेशीर? गोंधळात पडलात ना तुम्ही, नक्की विषय काय आहे? 

तर विषय आहे 'निसर्गसुसंगत जीवनशैली.' त्यातल्या एका छोट्या भागाचा या लेखात विचार करू या. 

मला असे म्हणायचे आहे की, चालणाऱ्यांना सन्मान मिळावा. विचार करा, आज रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येक माणसाने एकेक गाडी वापरायला सुरुवात केली, तर काय अवस्था होईल वाहतुकीची? चालणारे, सायकल चालवणारे, सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करणारे यांच्याबद्दल इतरांनी कृतज्ञ राहायला हवे, कारण कळत-नकळत त्यांचे उपकार होत आहेत आपल्यावर. संख्येने असे लोक जितके जास्त, तितका आपला विनाश दूर जाणार आहे. हे जरा अतिशयोक्त वाटत आहे का? पण बारकाईने विचार केल्यास यात तथ्य असल्याचे जाणवेल. पुणे शहराचा विचार करता, चांदणी चौकातून रोज ये-जा करणाऱ्यांना, यातली सत्यता लगेच पटेल.

रस्त्यावरून चालताना एक गोष्ट कायम खटकते. ती म्हणजे, आपल्या देशात चालणाऱ्यांना मान दिला जात नाही. आपल्या प्रत्येक कृतीमधून हे दिसते. बहुतेक सगळी वाहने झेब्रा क्रॉसिंगवर येऊन थांबतात, चालणाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी जागा ठेवण्याची तसदी कोणीही घेत नाही. प्रत्येक चौकातल्या सिग्नलमध्ये रस्ता ओलांडणाऱ्यांसाठी काही क्षण वेळ ठेवलेला असतो, हे कोणाच्याही गावी नसते. जिथे वाहनांसाठीचा सिग्नलसुद्धा पाळला जात नाही, तिथे चालणाऱ्यांसाठी थांबण्याचा विचार कोणाच्या मनात येणार? चालणाऱ्यांसाठी म्हणून जे फूटपाथ ऊर्फ पादचारी मार्ग राखीव ठेवलेले असतात, त्यावरसुद्धा गर्दीच्या वेळी स्वयंचलित दुचाकीवाले अतिक्रमण करतात. अर्थात फूटपाथ मोकळे असले तरी सलग, सरळ, पुरेशा रुंदीचे, उंच-सखल नसलेले, मध्येच लाल रंगाचा डीपीचा खोका किंवा तत्सम अडथळा नसलेले असे- थोडक्यात ज्यावरून आबालवृद्धांना धडपणे चालत जाता येईल असे- फूटपाथ अस्तित्वात आहेत का? 

शिवाय फूटपाथ म्हणजे भिकारी, हातगाड्यावाले, फेरीवाले, छोटे दुकानदार यांचे हक्काचे ठिकाण. फुगे विकणाऱ्या किंवा चौकात उभे राहून पेन, खेळणी असे काहीतरी विकणाऱ्या कित्येक फेरीवाल्यांनी तर फुटपाथवर रात्रंदिवस मुक्काम ठोकलेला असतो. याशिवाय रस्त्याकडेच्या दुकानदारांना, त्यांच्या दुकानांचा विस्तार करण्यासाठी, जणू फूटपाथ हा आंदणच दिलेला असतो. क्वचित कधीतरी एखादा मोकळा फुटपाथ सापडलाच, तर तो स्वच्छ असतो का? कचरा टाकणे, थुंकणे, आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसाठी शौचालय म्हणून वापर करणे अशा प्रकारांमुळे चालत जाणाऱ्यांना अक्षरशः अडथळ्यांची शर्यत पार करत जावे लागते. रस्ता ओलांडायचा असेल, तर मग चालणार्‍यांची तारांबळ विचारायलाच नको. कुठल्या बाजूने एखादा बाईकवाला अचानक येईल आणि 'कट' मारून जाईल, ते काही सांगता येत नाही. अगदी जीव मुठीत धरून चालावे लागते. अशा प्रतिकूल परिस्थितीत चालत जाण्याचा विचार कोण करेल? अगदी नाइलाज असल्याशिवाय कोणीही कुठेही चालत जात नाही, अशीच आजची परिस्थिती आहे. लहान मुलांना किंवा निवृत्त लोकांना थोडेफार अंतर पायी जायला आवडते. मात्र, चालण्यासाठी गैरसोयीच्या असलेल्या या वातावरणात त्यांना पायी पाठवणे घरच्यांना सुरक्षित वाटत नाही. एकूण काय, रस्त्यावरून चालत जाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस 'रोडा'वत चालली आहे. 

चालण्याचे आरोग्यासाठीचे फायदे प्रत्येकालाच माहीत असतात. व्यायामशाळेत जाऊन, पैसे देऊन आपण ट्रेडमिलवर चालतो, सायकलिंग करतो. व्यायामशाळेपर्यंत जाण्यासाठी मात्र दुचाकी किंवा चारचाकी दिमतीला लागतेच. दिवसातला कितीतरी वेळ आपण फुकट घालवत असतो. मात्र, अगदी जवळपास जायचे असले तरीही वेळ वाचवण्यासाठी म्हणून आपण गाडी काढतोच. खरेच वाचतो का वेळ? शहरांमधल्या गर्दीतून वाहनाने जायलासुद्धा वेळ लागतोच. शिवाय पार्किंग शोधण्यात वेळ जातो तो वेगळाच. ज्यांना शक्य आहे, त्यांनी घराजवळची किंवा कार्यालयाजवळची कामे चालत जाऊन केली, तर काय हरकत आहे? चालण्याचा फायदा जसा आपल्या आरोग्याला मिळणार आहे, त्यापेक्षाही जास्त फायदा आपल्या शहराच्या आरोग्याला, देशाच्या आरोग्याला आणि पर्यायाने पृथ्वीच्या आरोग्याला मिळणार आहे, असा विचार आपण का नाही करत? निसर्ग आणि माणूस यांना आपण वेगवेगळे समजतो. पण खरे म्हणजे आपण निसर्गाचाच एक भाग आहोत हे लक्षात घेतले, तर एखादी कृती करताना आपल्यासमोर जे काही पर्याय असतील, त्यापैकी त्यातल्यात्यात निसर्गस्नेही पर्याय कोणता, हे आपण नक्की लक्षात घेऊ.

परदेशांमध्ये चालत जाणाऱ्यांना रस्त्यावर प्राधान्य दिले जाते, त्यांचा मान ठेवला जातो, तिथले मोठमोठे पदाधिकारीसुद्धा सायकल चालवत कार्यालयात जातात, याचे गोडवे आपण गात असतो. तथापि, आपण दुचाकी किंवा चारचाकी चालवत असताना, चालणाऱ्यांना रस्ता ओलांडायला अवसर देतो का? की मध्येच कडमडले म्हणून शिव्याशाप देतो? याचा विचार आपला आपण करावा. आपल्या रस्त्यांवरून चालत जाणाऱ्यांची, सायकल चालवणाऱ्यांची, बसने जाणाऱ्यांची कशी कुचंबणा होते, हे अनुभवण्यासाठी स्वतः या गोष्टी करून पाहाव्यात. स्वतः अनुभव घेतला म्हणजे त्यांच्याकडे बोट दाखवायच्या आधी, आपण किंचित थांबून विचार करू.

 चालणाऱ्यांसाठी प्रतिकूल असलेल्या परिस्थितीचा मी वरती उल्लेख केला. परंतु, या परिस्थितीत अगदी सावकाश का होईना, बदल घडताना दिसत आहे. तुरळक ठिकाणी तरी प्रशस्त फूटपाथ दिसू लागले आहेत, स्वच्छ भारत अभियानाचा काहीसा परिणाम जाणवत आहे. सायकल मार्ग आखलेले आहेत. बससेवा सुधारली आहे, हे मी स्वानुभवाने सांगू शकते. या सोयी-सुविधांचा योग्य पद्धतीने वापर करण्याची जबाबदारी मात्र आपली आहे. 

'चालायला शिकणे' हा बालकाच्या वाढीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा समजला जातो. आजकाल मात्र 'चालायला विसरणे' हा एक पुढचा टप्पा अस्तित्वात आला आहे की काय, असे वाटते! लहानपणी जेव्हा आपण एक-एक पाऊल टाकू लागतो, तेव्हा आपल्याला आणि आपल्या घरच्यांना झालेला आनंद जरा आठवू या. निसर्गसुसंगत जीवनशैलीकडे आपली पावले वळवू या. आपण फक्त लेखणी चालवत नाही, तर पायही 'चालवतो', हे दाखवून देऊ या!


--©आसावरी गोखले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा