'च' आणि बंडाची ठिणगी
केलंच पाहिजे, झालंच पाहिजे, असलंच पाहिजे... ..
एकमेकांशी बोलताना, विशेषतः आपल्या अपेक्षा व्यक्त करताना आपण किती सहजपणे, सढळपणे हा 'च' वापरतो. फारसा विचारही करत नाही.
'च' ला जेंव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या स्वेच्छेची जोड मिळते, मग ती एक 'win-win' परिस्थिती असते.पण 'च' बरोबर त्यात जर दुसऱ्याच्या इच्छेचा, अपेक्षांचा, स्वप्नांचा कुठेतरी, नकळत का होईना अनादर असेल तर या 'च' मध्ये कुठेतरी भविष्यातल्या बंडाची ठिणगी लपलेली असते . 'च' एकप्रकारची सक्ती व्यक्त करतो. .आणि त्याविरुद्ध माणसाचा मूलभूत स्वभाव विरोध प्रदर्शित करतो.
आम्ही एवढ मोठ हॉस्पिटल उभं केलं किंवा व्यवसाय उभा केला. आमच्या नंतर तू तो सांभाळला'च' पाहिजेस.... या 'च' मुळे कुठेतरी उमलू घातलेली साहित्याची किंवा संगीताची वा वेगळी आवड जोपासू पाहणारी कळी चिरडली जाते.
.तू अमुक अमुक घराण्याची सून आहेस. तू नोकरी सोडायला'च' हवीस....कुठेतरी बंडाची ठिणगी पडतेच. ती ठिणगी लगेचच आगीत रूपांतरीत होईल असे नाही. पण खोल कुठेतरी जखम होते आणि ती ठसठसत राहते.
सतत मुलाला आम्ही सांगू तसं केलच पाहिजे असं, त्याच्या मनाचा विचार न करता, सांगत राहिलं तर त्याची परिणीती ते मूल मोठं झाल्यावर 'न ऐकणे', 'उद्धट बोलणे', 'उलट उत्तरे देणे' यात होणारच. हीच गोष्ट जर दोन व्यक्तींमध्ये घडली तर नात्यात कटुता येते. रोजचे नातेसंबंध जपताना असे काही 'च' आपल्याला बोचताना, आड येताना अगदी जाणवतात.
या 'च' मुळें जेंव्हा स्वातंत्र्यावर घाला पडतो तेंव्हा मग ती गोष्ट कितीही आवडीची असली तरीही मनातून उतरते. ज्या व्यक्तीवर हा 'च' लादला जातो त्याच्या मानसिक शक्तीवर, समंजसपणावर आणि रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटी वर ती व्यक्ती बंड करून उठेल कि आयुष्यभर जखम ठसठसत ठेवेल हे अवलंबून असतं.
एरवी दिवस न दिवस घरात लोळून काढणारे आपण, घरातल्या कामासाठी वेळ मिळत नाही म्हणून तक्रार करणारे आपण , जेंव्हा lockdown मध्ये घरी रहावे'च' लागेल हे कळल्यावर कसे तडफडत होतो. फक्त नोकरी, व्यवसायासाठी बाहेर असणारेच नाहीत तर अगदी ज्यांचा दिनक्रम घराभोवतीच फिरतो अशांसाठी सुद्धा ही सक्ती शिक्षेसारखी वाटत होती. तुम्हाला गोड खायला आवडत म्हणून फक्त गोड खायची सक्ती केली तर चालेल का?
अर्थात जरी मी 'बंड'.. 'बंड' अस म्हटलं तरी त्याला अगदीच नकारत्मकतेच्या चष्म्यातून बघायला नको. या बंडातूनच अनेकदा समाजामध्ये मंथन घडलं आहे आणि त्या मंथनातून अमृत आणि अनेक रत्नं पण बाहेर पडली आहेत.
'पती निधनानंतर स्त्रीने सती गेलं'च' पाहिजे.' या 'च' विरुद्ध राजा राम मोहन रॉय यांनी बंड केलं आणि अनेक भारतीय स्त्रियांच्या आयुष्यात नवीन पहाट झाली.
त्यानंतरच्या काळात कितीतरी समाजसुधारकांनी त्या वेळेच्या अश्या अनेक 'च' च्या विरुद्ध आवाज उठवला आणि असंख्य स्त्रियांनी, लोकांनीं मोकळा श्वास घेतला. त्यांच्यासाठी नवीन जगाची कवाडे उघडली गेली. संतांनी देखील अशीच बंड करून ज्ञानाची शिदोरी सर्वसामान्यांना वाटली.
. असं असलं तरी व्यक्तिगत आयुष्यात या 'च' चा वापर जेवणातल्या मिठासारखाच चवीपुरता'च' करावा....केला'च' पाहिजे 😃😃
हेमांगिनी जावडेकर-पुराणिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा