लेबल

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

गोवा

 "श्री क्षेत्र गोवा" 😉

अगदी सगळ्यांप्रमाणे आमच्या ही घरी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठे जाऊया अशी चर्चा रंगली होती! 

        जो तो आवडीनुसार ठिकाण सुचवत होता. त्यानुसार चर्चा आणखी फुलत गेल्या. हे असे कित्येक दिवस .. साधारण एखादं महिना तरी चालू होते. हो नाही करता करता एक ठिकाण "श्री क्षेत्र गोवा"  😉 आणि जोडीला कोकण करायचे निश्चित केले व प्रवास आणि हॉटेलची नोंदणी ची कामे आम्ही "बाबा" नामक भरवश्याच्या माणसावर सोडून मोकळे झालो! परंतु आमची पसंती घेतल्याखेरीज एकही नोंदणी झाली नाही बरं का ... हे विशेष नमूद केलेले बरें!

         भारतभरात इथून तिथून सगळ्यांना गोव्याचे विशेष आकर्षण आहे हे खास सांगायला नकोच ! यांत प्रत्येकाची कारणं ही वेगवेगळी असतात 😅 ... जाताना करवीर निवासिनी श्री आंबा बाईचे दर्शन घ्यायचे ठरवले त्यानुसार निघायच्या दिवशी रात्री ११ ला दारात गाडी हजर झाली. खरे तर निवांत टुर हा अजेंडा असल्या कारणाने कमीत कमी सामान घेऊन सर्व बॅग्स पॅक झाल्या होत्या... गाडी वेळेत आल्याने उत्साह द्विगुणित झाला. पहाटे कोल्हापुरात पोहोचलो... ठरल्या प्रमाणे सारे घडत होते एक मानसिक समाधान मिळत होते. आता केवळ १ /२ तास च आराम करून देव दर्शन करायचे होते म्हणून अगदी साधेच हॉटेल घेतले... म्हणले मुलांना अश्या ही गोष्टींची सवय हवी... प्राप्त परिस्थिती शी जुळवून घेता आलेच पाहिजे. कौतुक म्हणजे कुठलीच तक्रार न करता  मुले ही प्रत्येक गोष्ट समजुन घेत होती.

         दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रसन्न चित्ताने देवीचे सुंदर दर्शन झाले. मंदिर परिसरात थोडा वेळ बसून लगेच च शाहू पॅलेस पाहण्यास गेलो. आपला इतिहास, त्याचे जतन केलेले काम सर्व काही मुलांनी खूपच मनापासुन पाहिले; त्यावर चे त्यांचे प्रश्न, चर्चा आणि मग चर्चे अंति समाधान कारक चेहरे पाहून आम्ही ही आतून सुखावत गेलो.  दुपारचे जेवण करून श्री क्षेत्र गोव्याकडे प्रस्थान केले. 🤗

         प्रचंड आकर्षण, उत्सुकता मनात दाटली होती मुलांच्या; अगदी दिसत होतं. कधी एकदा गोव्यात पोहोचू असं झालेलं मुलांना ( आमची ही परिस्थिती काही निराळी नव्हतीच). वाटेत आंबोली घाट लागला. निसर्गाच्या मुक्त हस्ते उधळणीची सुरुवात झाली ; ते निसर्ग सौंदर्य पाहून आमच्या आनंदाला पारावर उरला नाही. धबधब्याखाली यथेच्छ नाही म्हणता येणार पण शक्य तितकी मज्जा करून घेतली आणि अर्थात कॅमेऱ्यात शक्य तितके क्षण टिपून घेतले. आता इथून पुढले ४-५ दिवस केवळ धम्माल करायला मिळणार या जाणिवेने सगळे अतिशय आनंदी होतो. असं करत करत एकदाचे काय ते आम्ही गोव्यात पोहोचलो बाबा !! 😅

         अंजुना बीच रिसॉर्ट ला जाऊन थडकलो ... रिसॉर्ट एकदम सुरेख होते; अगदी ठेवणीतली वास्तू होती. झाडाझुडपांनी नटलेली आणि जोडीला जलतरण तलाव आमच्या खोलीच्या पुढ्यात च होता. लागलीच मुलं मस्त पैकी पाण्यात उतरून मोकळी! सगळ्या गोष्टींचा पुरेपूर आनंद लुटणे अगदी सुरेख जमते मुलांना. हा गुण शिकण्यासारखा आहे. लगबगीने आवरून आम्ही मग जवळच्या च एका उपहारगृहात जेवण्यास गेलो. तिथले वातावरण काय वर्णू!... जेवता जेवता लाईव्ह ऑर्केष्ट्रा तो ही जॅझ ऐकायला मिळाला. इतकी काय ती वाद्यवृंद मग्न होऊन वाजवत होती की पाहणाऱ्या बऱ्याच मंडळींनी आपसूक ताल धरला, कुणी त्यांचे फोटो काढत होते.. एकूण काय वातावरण जादुई झाले आणि आम्ही एका वेगळ्याच दुनियेची सैर करून आलो.

खोलीवर येतानाच उद्याचे नियोजन करत आलो...मुले उद्याची स्वप्ने पहातच कधी गाढ झोपी गेली काही कळलेच नाही....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा