लेबल

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

गोवा दिवस २ रा

              अथांग समुद्राची निळी निळाई डोळ्यांत भरण्यासाठी आणि त्याच्या विशालतेत डुंबण्यासाठी आम्हा चौघांची स्वारी सकाळी ७ लाच पायी अंजुना बीच च्या दिशेने पूर्ण  तयारीनिशी निघाली. छोट्या छोट्या गल्लीतून वाट काढत काढत एका ठिकाणी आलो आणि समोर बघतो तर ....स्वच्छ आणि लांबच लांब किनारा, फेसाळणाऱ्या लाटा, हवेत हलका गारवा, दूरवर खोल समुद्रात डौलाने जाणाऱ्या बोटी, चमचमणारी रेती, किनाऱ्यावरती सुसज्ज श्याक... अहा हा...केवळ अप्रतिम! आज मात्र आम्ही पाण्यात यथेच्छ मस्ती करणार होतो.. केलेही तसेच! जसा वेळ पुढे जात होता तस तश्या लाटांचा जोर आणि उंची वाढत गेली; आमची मजाही. एकदा तर एवढी काय मोठी लाट आली आम्ही सगळे च्या सगळे धाप्पकन खाली पडलो 

 काहीही झाले तरी माझ्या धाकट्याचा हात काही मी सोडला नाही शेवट पर्यंत...आत्ता मज्जा वाटते आहे पण त्या क्षणी आपण निसर्गासमोर किती लहान आहोत याची जाणीव नकळत होऊन गेली. घाबरलो कुणीच नाही परंतु हा अनुभव चित्त हेलावून टाकणारा होता खरा!

           श्याक मध्ये अर्ध ओल्या अंगानेच; मस्तपैकी समुद्राकडे पहात पाहत नाश्ता केला अगदी सिनेमात दाखवतात तसला काही तरी हा अनुभव होता.  कुठेही कसलीच तक्रार नव्हती; होती ती फक्त अनुभूती सुखाची!

नाश्ता करून मग आम्ही स्पीड बोट ची सैर केली. पोहोता येत असूनही किंचित शी मनात भीती होतीच... पण म्हणतात ना डर के आगे जीत हैं! हे सारे काही कॅमेऱ्यात कैद करण्याचे काम मात्र मी अथक पार पाडत होते...

           सकाळी ७ ते दुपारी १२ अशी यथासांग समुद्रकिनाऱ्याची मौज लुटून रिसॉर्ट वर आलो एकेका चे आवरणे होत होते ; जलतरण तलावाच्या काठावर आमचे दुपारचे जेवण रंगले. खेळून प्रचंड भूक लागली होतीच; अस्सल गोवन जेवण झाले आणि जीवन कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.  त्यानंतर गाडी येईस्तोवर अर्ध्या तासाची वामकुक्षी घेऊन कंटाळा न करता अँग्वादा किल्ला पाहायला गेलो. खरे तर किल्ला म्हणावे असे काही नाही तिथे परंतु इतिहासाचा एक भाग म्हणून भेट देऊन आलो.

           संध्याकाळी बागा बीच वर थोडीशी रपेट मारली. तिथेच श्याक मध्ये जेवण करू असे निश्चित केले. भारतच काय परंतु जगभरातून आलेली पर्यटक मंडळींनी तिथे प्रचंड गर्दी केली होती. रंगबिरंगी रोषणाई करून प्रत्येक श्याक सज्ज होती स्वागत करण्यासाठी. एवढ्या गर्दीतही कोणालाच कोणाचा त्रास होत नव्हता; जो तो आपापल्या परीने गोवन अन्न पदार्थ आणि हवा असलेला निवांत पणा अनुभवत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा च आनंद दिसत होता. आम्ही पण भरपूर सुट्टीचा आनंद लुटत होतो....खुश होतो!


© स्वरूपा कुलकर्णी शहापुरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा