दिवस ३ रा गोवा
आज सगळी महत्वाची प्रार्थना मंदिरे पहायची होती. गोव्याचे भव्य आणि तितकेच जुने चर्च प्रथम पाहिले. त्याच्या समोर एक खूप मोठे शुभ्र चर्च आहे. त्यात पुरातन वस्तूंचे, तैल चित्रांचे कायमस्वरूपी प्रदर्शन ही पाहिले. एवढे लोंढेच्या लोंढे तिथे भेट देत असूनही कुठेच कचरा, अस्वच्छता दिसली नाही याचे मोठे कौतुक वाटले. दोन्ही कडे वास्तु रचनेवर आमच्यात बरीच चर्चा झाली. मी व्यवसायाने वास्तुविशारद असल्याकारणाने सगळी उत्तरे मी ही जोमाने देत होते. पण या चर्चेला अजून खुमासदार केले ते गाडीवरच्या आईस्क्रीम ने ! भुकेची वेळ टळून गेली होती मग मंगेशी च्या मंदिराच्या दिशेने आमची गाडी सुसाट निघाली. वाटेत कुठेतरी जेवण करून मग दर्शन घ्यायचे ठरले.
आवडीचे जेवण मिळाले त्या खुशीतच सगळे गाडीत बसलो ... गाडी मार्गस्थ झाली. संध्याकाळची वेळ होत आली.. शांत वातावरणात मंगेशीच्या मंदिरात प्रवेश केला. अतिशय टापटीप... मन प्रसन्न करणारी शांतता आणि भाविक चेहरे... दर्शन उत्तम झाले. गाडी पाशी येता येता माझ्यातला खरेदीचा किडा जन्माला आला ... सुंदर लामण दिवे, फ्रिज मॅग्नेट अशी खरेदी मला करावीच लागली; शेवटी खरेदी शिवाय फिरण्यात काय मजा!... नाही का !!! तिथून पुढे आम्ही शांता दुर्गा मंदिरात गेलो. साधारण ५-६ किमी अंतर होते दोहोंमध्ये. गाडी ते मंदिर वाटेत तिथल्या फुलवाल्या सुरेख गजरे, हार, वेण्या गुंफत बसल्या होत्या. काम करता करता बोली भाषेत काही तरी हसी मजाक करत होत्या. ते ऐकत आम्ही पुढे गेलो इथेही तोच प्रसन्नतेचा सुंदर अनुभव आला. काय अप्रतिम मुर्ती आहे म्हणून काय सांगू!! सुरेख फुलांची सजावट ही मन मोहून घेत होती. मंदिराच्या मागील बाजूस उंच हिरवाईने नटलेले डोंगर आहेत. सांजवेळ, आकाशाचा धूसर हलका निळा रंग, मागे दाट गर्द झाडी आणि पुढ्यात पारंपरिक विटकरी , पांढऱ्या रंगात विद्युत रोषणाई त नटलेले मंदिर... हा नजारा मन सुखावून गेले.
आज मात्र आम्ही काल सारखे पुन्हा बीच साईड लाच जेवण करणे पसंत केले. आज बीच होते "कंडोलीम".
अर्थातच पुन्हा श्याक मध्ये परंतु मोकळ्या आकाशाखाली बसणे चौघांनी एक मताने पसंत केले. या बीच ची खासियत काही निराळी च होती. किनारा अगदीच छोटा. जिथे बसलो तिथे लगेचच २-३ फुटावर च लाटा येऊन थबकत होत्या. सपाट किनारा नसून तो खोलगट होता. मुले तर जेवण आले तरी ही पाण्यातच खेळत होती. पाण्याकाठीमनपसंद जेवणाचा आनंद घेणे ते ही खुल्या आसमंता खाली ! याची मजा काही औरच... शब्दातीत! हा अनुभव ज्याने त्याने स्वतः घ्यावा !
जेवण झाले, दिवसभराचा आढावा घेणे चालू होते बाप लेकांचे; मग जोडीला आइस्क्रीम तर हवेच ना! असे सगळे करे पर्यंत रात्रीचे १२ कधी वाजले खरंच कळले नाही. गोव्याची हवाच काही निराळी आहे हे च खरे!!
ट्रिप ला गेलो मग कसली आली चिंता?! ना सकाळी उठून डबे करायचे ना आवरून ऑफिस ला पळायचे !
केवळ मुक्तपणे सुट्टीचा आस्वाद घ्यायचा हे एक च उद्दिष्ट होते ...तेच तर चालू होते... मनमुराद!
© स्वरूपा कुलकर्णी शहापुरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा