लेबल

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

गोवा / कोकण दिवस ४ था

 दिवस ४ था गोवा / कोकण

            आज किंचित नाराजी आणि किंचितशी उत्सुकता मनात दाटून होती; गोव्याला सोडवेना ... कोंकण साद घालणे थांबवेना! प्रवास लांबचा होता गोवा ते खवणे बीच म्हणून लगबगीने सामान बांधाबांध केली. रिसॉर्टवर च भरपेट नाश्ता केला चेक आउट करे पर्यंत मी आणि मुले सगळा परिसर पुन्हा एकदा डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घेत होतो तितक्यात गाडी तयार असल्याचे कळाले...मग आई आपण पुन्हा येऊ ग इथे, आम्हाला फार फार मजा आली, अजून एखादा दिवस तरी हवा होता इथे ... इत्यादी इत्यादी गप्पा मारतच आम्ही गाडीत बसलो. गाडी कोकणच्या दिशेने भरदाव सुटली आणि आमचे मन गोव्याच्या दिशेने! मनोमन परत यावेच लागेल इथे असा संकल्प करून टाकला 😂 आणि पुढील वेध लागले एकदाचे... 😆.

            निसर्ग चोहो बाजूंनी मेहेरबान होता. हिरवी झाडी, त्यातुन डोकावणारी इवली इवली कौलारू घरे, घरापुढील छोटेसे अंगण आणि अंगणात लावलेली फुलझाडे... सारं काही मनमोहक होतं. आपल्या शहरात कुठे आला एवढा निवांत पणा! असं मनात येऊन गेलं नकळत. असो...वाटेत मुद्दाम सावंतवाडी ला थांबलो खास लाकडी वस्तूंची खरेदी करायची होती म्हणून. ज्या दुकानात गेलो तिथे सुरेख वस्तू होत्या. बरेच मोठे दुकान एकट्या आजी प्रसन्न व हसऱ्या चेहऱ्याने सांभाळत होत्या. त्यांचे मोठे कौतुक वाटले आम्हाला. लहानपणी शाळेत शिकलो होतो "सावंतवाडी ला लाकडी खेळणी छान मिळते" ते नक्की काय, कसे हे पाहण्यासाठी हा खरेदीचा घाट घातला हो!☺️ लाकडी पोळपाट, ट्रे, नात्यातील छोट्या मुलींसाठी भातुकलीचा खेळ आणि खास आम्हाला सुट्टीच्या दिवशी फक्कड कॉफी प्यायला २ लाकडी मग ... एवढी सगळी खरेदी करूनच मी बाहेर पडले.😍

            पहिले गेलो तारकर्ली बीच वर. बऱ्यापैकी गर्दी होती. पर्यटक छान खेळत होती. खरं तर इथे पँरासिलिंग करायचा बेत होता परंतु तिथे काहीच नव्हतं... पण हिरमोड होऊ देऊ नका मुलांनो आज आपण करणार म्हणजे करणार अशी हमी दिली बाबाने 😃 म्हणून मग आम्ही अगदी थोडासाच आस्वाद घेतला पाण्याचा व परत गाडीकडे निघालो तर वाटेत तारा मासा रेतीत दिसला... तो पहाताच सगळे च हरखून गेलो. फोटो काढून घेतले आणि पुढच्या प्रवासास निघालो देवबागच्या दिशेने. साधारण अर्ध्या तासातच तिथे पोहोचलो. देवबागलाच कोकणी पद्धतीचे चविष्ट जेवण केले...सोबतीला थंडगार सोलकढीचा आस्वाद घेतला. त्यानंतर पटापट स्विमिंग कॉस्च्युम घालून किनाऱ्यावर गेलो. बोट फेरी चे व  पँरासिलिंगचे ही बुकिंग केले. मग एक मोठी फेरी खोल समुद्रात मारून झाली त्यात त्सुनामी बेट दुरून दाखवले. सर्व साधारण बेटा सारखे बेट होते ते. पुन्हा किनाऱ्यावर आलो. ज्यांना पँरासिलिंग करायचे अशा सगळ्या मंडळींना एका दुसऱ्या बोटीत बसवून लांब खोल समुद्रात नेले. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कुणी एकट्याने तर कुणी जोडीने आपापला नंबर लावला. मी आणि माझा थोरला मुलगा व बाबा आणि धाकटा मुलगा अश्या जोड्या ठरल्या. अनंत शंकाकुशंकांचे निरसन करत करत खोल समुद्रात ठराविक ठिकाणी पोहोचलो. तिथे गेल्यावर असे कळले की पाण्यात डीप डीप करायचे का? त्याचे वेगळे ४००/-₹ पडतील. म्हणलं कर बाबा डीप डीप होऊ दे खर्च! 🤣 हाय काय अन नाय काय 😉... आमचा नंबर आला, आम्हाला त्या  भल्या मोठ्या रंगबेरंगी पँराशूट च्या दोरखंडाला पॅक केले. बघता बघता उंच आकाशात उडालो. मग आलटून पालटून पाण्यात बुचकळले गेलो. जेव्हा पाण्यात बुडवले गेलो तेव्हा चा क्षण शब्दात सांगता येणे कठीण. सूर्यास्ताची वेळ; गळ्या पर्यंत पाण्यात ते ही समुद्राच्या मध्यात... भीतीदायक.. चित्तथरारक.. अविस्मरणीय अनुभव! अहा हा...बरोबर त्यावेळी सूर्यग्रहण दिसले. फार विहंगम दृश्य होते ते!

            अशी सगळी हौस मौज करत रात्री ८ ला आम्ही खवणे बीच रिसॉर्ट ला पोहोचलो. खोली अप्रतिम होती. खोलीत वॉल पेपर लावलेला, कमी पण आवश्यक सगळे फर्निचर तिथे होतें. सगळी प्रचंड भुकेली झाली होती. छानपैकी फ्रेश झालो. इथेही रिसॉर्टच्या अंगणात समुद्राकडे बघत आणि त्याचा तो खळाळता आवाज ऐकत जेवणाचा आस्वाद घेतला. शांत, निवांत, आरामदायी वातावरणाची ती संध्याकाळ मी कधीच विसरू शकणार नाही....केवळ अतुलनीय!! 


© स्वरूपा कुलकर्णी शहापुरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा