लेबल

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

वावे सहलीचा वॉव वे!

 वावे सहलीचा वॉव वे!


वेगवेगळ्या कारणांमुळे प्रवासाला जाण्याचे योग येतात. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी कुटुंबीयांसमवेत, कधी अभ्यासदौऱ्यासाठी तर कधी मित्रमंडळींबरोबर सहलीसाठी... प्रत्येक प्रवासाची मजा निराळी! मराठी भाषेचे अभ्यासक आणि आस्वादकांचा आमचा एक गट आहे. त्या गटातील एका मैत्रिणीचे-वैशालीचे- घर आहे कोकणात. तिच्या घरी आम्ही सहलीला जायचे ठरवले. रायगड जिल्ह्यातील 'वावे' या गावी तिचे आई-वडील राहतात. 

२५ मे २०२२ या दिवशी पहाटे साडेपाचलाच आमची सहल सुरू झाली. दोन गाड्या केल्या होत्या. त्या दोन वेगवेगळ्या मार्गाने एकेकाला घेत चांदणी चौकाजवळ एकत्र आल्या आणि कोकणच्या दिशेने निघाल्या. ताम्हिणी घाटाजवळ 'क्विक बाईट्स'मध्ये न्याहारी करून निसर्गरम्य ताम्हिणी घाटाचे सौंदर्य न्याहाळत हरिहरेश्वरकडे जायला निघालो. आमची अनौपचारिक अशी ही पहिलीच सहल होती, त्यामुळे गप्पांमधून एकमेकांची ओळख करून घेत कधी पोहोचलो, ते समजलेच नाही. हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन मोठा प्रदक्षिणा मार्ग काही अंतरापर्यंत चालत गेलो. पुढे समुद्राने रस्ता अडवलेला होता, त्यामुळे मागे फिरलो. तिथून श्रीवर्धनला बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा वाडा बघायला गेलो. उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरणाऱ्या अजिंक्य अशा पहिल्या बाजीरावाचे वडील आणि अटकेपार झेंडे लावणाऱ्या रघुनाथरावाचे आजोबा असणारे, आद्य पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे स्मारक असे दुर्लक्षित अवस्थेत असलेले पाहून वाईट वाटले. बाळाजी विश्वनाथ यांचा पुतळा तेथे उभारला आहे इतकेच. बाकी सगळी पडझड आहे, माहितीचा अभाव आहे. खोल्यांना कुलूप घातलेले असून खिडकीतून आत डोकावून पाहिले असता सर्वत्र अस्वच्छतेचे राज्य दिसले. दिल्लीचे तख्त राखणार्‍यांची त्यांच्या जन्मगावात ही किंमत केली जाते, दुर्दैव! दुसरे काय? असो. 

वैशालीचे बाबा म्हणजे पेंडसेकाका इथेच आम्हाला भेटले. ते वाव्याहून श्रीवर्धनला दुचाकीवरून भर उन्हात आमच्यासाठी आले होते. मग आमच्यापैकी एकाने दुचाकीचा ताबा घेतला आणि काकांना गाडीत बसवून श्रीवर्धनच्या समुद्राचे लांबूनच दर्शन घेत आम्ही दिवेआगरकडे कूच केले. तिथे पोहोचल्यावर काकांनी आम्हाला करमरकर यांच्या भोजनालयात नेले. खास कोकणी पद्धतीचे साधे पण रुचकर जेवण जेवून तृप्त झालो. काका वाव्याला परत गेले. दिवेआगरामध्ये एका घरात आमच्यापैकी काही जणांची राहण्याची सोय केली होती. खाली-वर खोल्या होत्या. मग महिलामंडळ वरच्या खोल्यांमध्ये जाऊन मस्त गप्पा मारत बसले. 

नंतर जरा ताजेतवाने होऊन आम्ही वैशालीच्या मामांकडे गेलो. त्यांच्या घराच्या अंगणात कोकमे वाळत घातली होती, सोनकेळ्यांचे हिरवे घड एका बाजूला मांडून ठेवले होते. उन्हाळी कामांची लगबग चालू असल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यांची मोठी वाडी आम्ही फिरून बघितली. केळी, नारळ, पोफळी, पपनस, आंबे, फणस... सगळी झाडे फळांनी लगडलेली होती. अंगणात खूप मोठी विहीर होती. तिचे पाणी पाटांतून प्रत्येक झाडापर्यंत पोहोचवले होते. मोठ्या खड्ड्यात वाळलेला पालापाचोळा गोळा करून त्याचे खत तयार होत होते. त्यांचा रिकामा पडलेला गोठा पाहून मनात चर्र झाले. मामा आणि मामी दोघेच तेथे राहत असल्याने, आता गुरांचे करणे होत नाही, म्हणून गायी-म्हैशी-बैल विकावे लागले, हे सांगताना मामांच्याही डोळ्यात पाणी तरळले. लगेच विषय बदलत त्यांनी, त्यांच्या वाडीत एक वीरगळ असल्याचे सांगितले आणि तो दाखवायला नेले. त्यावरील मजकूर कोणालाच वाचता येत नव्हता. तेव्हा त्यांनी एक कागद आणला. त्यावर वीरगळावरचा मजकूर देवनागरीमध्ये लिहिलेला होता. 

मामा मामींशी छान गप्पा रंगल्या. त्यांची मुलगी आणि नातवंडेही सुट्टीसाठी आलेली होती. आमच्यापैकी काही जणांनी 'पपनस' हे फळ पहिल्यांदाच बघितले, त्याची चवही घेतली. मामींकडून घरगुती मेतकूट, सांडगी मिरची, कोकम इत्यादी कोकणमेव्याची खरेदीसुद्धा झाली. गप्पा आटोपत्या घेत आम्ही दिवेआगरचे गणपती मंदिर बघायला पायीच निघालो. कोकणातली सुंदर घरे जवळजवळ प्रत्येकाच्या घरी झाडांची बाग, सुबक रस्ते, भर उन्हाळ्यातही सगळीकडे दिसणारा डोळ्यांना सुखावणारा हिरवा रंग बघतच आम्ही मंदिरात पोहोचलो. दिवेआगरमधला सुप्रसिद्ध सोन्याच्या गणपतीचा मुखवटा चोरीला गेल्याचे सर्वांना माहीत असेलच. आता ग्रामस्थांनी तसाच नवीन मुखवटा करून तेथे बसवला आहे. मात्र तो प्राचीन मुखवटा काही सापडला नाही, याची हळहळ वाटली. थोडा वेळ मंदिराच्या बाहेर बसून मग आम्ही सुंदरनारायण आणि रूपनारायण मंदिर बघायला गेलो. या दोन्ही मंदिरांमधील मूर्ती फार सुंदर आहेत. रूपनारायण मंदिरातील मूर्ती प्राचीन असून तिच्यावर विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. 

देवदर्शन झाल्यानंतर आम्ही मावळत्या दिनकराचे दर्शन घेण्यासाठी समुद्रकिनारी गेलो. दिवेआगरच्या किनाऱ्यावर केवड्याचे बन सर्वत्र पसरलेले आहे. केवड्याची कणसे फुललेली बघून ती तोडण्याचा मोह होत होता, पण ती उंचावर होती आणि केवड्याचे बन दाट, काटेरी होते. त्यामुळे तो मोह टाळून आम्ही समुद्राकडे मोर्चा वळवला. सूर्यास्त व्हायला अजून थोडा वेळ होता. आम्ही लाटांशी खेळत होतो. आमच्यातले एक जण म्हणाले की, चला, रेतीत पळण्याची शर्यत लावूया. मग काय विचारता? ४० ते ७० अशा वयोगटातले आम्ही सर्वजण लहान होऊन खरोखरच शर्यत लावली. शर्यतीच्या २-३ फेर्‍या झाल्या. दमलो, पण खूप मजा आली. मग सूर्यास्ताची घटिका जवळ आली, तेव्हा लाल-लाल होत जाणाऱ्या सूर्याकडे बघत आम्ही सूर्य, समुद्र या विषयांवरची गाणी आठवू लागलो आणि तिथेच एक छोटीशी मैफल रंगली. सूर्यास्ताचा नजारा डोळ्यात साठवून अखेर आम्ही परत फिरलो.

संध्याकाळी पेंडसेकाका चारचाकी घेऊन पुन्हा दिवेआगरला आले. रात्री आम्ही ज्यांच्याकडे जेवायला गेलो, तिथे आम्हाला आंब्याचा रस घातलेले उकडीचे मोदक खायला मिळाले. जेवण झाल्यावर पुरुष मंडळी दिवेआगरला त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी गेली आणि आम्ही 'मुली' काकांच्या गाडीतून वाव्याला त्यांच्या घरी मुक्कामाला गेलो. पंधरा-सोळा खोल्यांच्या त्यांच्या जुन्या वाड्यात आता आधुनिक सुखसोयी करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे नव्या-जुन्याचा सुरेख संगम त्यांच्याकडे पाहायला मिळाला. बैठकीच्या खोलीत मोठा झोपाळा होता. तिथे बसून थोडा वेळ हसत खिदळत गप्पा झाल्या. मग आम्ही निद्राधीन झालो. 

पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. काकांनी मस्त चहा केला होता. आम्ही अंगणातल्या झाडाखाली बसून चहा घेतला. काही वेळ तिथेच गप्पा मारत बसलो. चहाचा दुसरा राउंड झाला. इतकी स्वच्छ, सुंदर, मोकळी हवा आणि शांतता... तिथून उठावेसे वाटत नव्हते. पण घड्याळाचे काटे थोडीच आम्हाला सवलत देणार होते? उठलो आणि आवरायला पळालो. आंघोळीचे पाणी तापवायला वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था केलेली होती, त्यामुळे थेट नळाने गरम पाणी येण्याची सोय होती. आमचे आवरून होते तोच दिवेआगरच्या सहकाऱ्यांचा फोन आला की, ते तिथून निघत आहेत. आम्ही पोहे करण्यासाठी काकूंना मदत करू लागलो. भल्या मोठ्या लोखंडी विळीवर कांदे, कोथिंबीर चिरण्याचा अनुभव घेतला. दिवेआगरला राहिलेली मंडळी आल्यावर काकूंनी घरच्या तांदुळाचे पोहे फोडणीला टाकले. त्याबरोबर पापड, ताजे लोणचे असा थाट होता. ते मऊसूत चविष्ट पोहे सर्वांना फारच आवडले. दरम्यान, महिलावर्गाने स्वयंपाकाची तयारी सुरू केली होती. सांदणासाठी तांदळाचा रवा भाजून घेतला. बरक्या फणसाचे गरे मिक्सरमधून काढले. मग तो रवा भिजवून ठेवला. कणीक मळली, पोळ्या झाल्या. काकूंनी छान ओले काजू आणि बटाटा घालून भाजी केली. मग आम्ही सर्वजण निघालो, पेंडसेकाकांच्या आंबा-फणसाच्या वाड्या बघायला. त्यांच्या घरामागची वाडी बघितल्यानंतर घरापासून थोड्या अंतरावर असलेली दुसरी मोठी वाडी बघायला गेलो. काही ठिकाणी आंबे काढण्याचे काम चालू होते. झाडाखाली पडलेली काजूची फळे, आंबे आम्ही वेचत होतो. काही गावठी आंबे तिथल्या तिथेच पिळून खाल्ले. झाडावर चढलो. तिथल्या रखवालदाराकडे असलेली गोफण फिरवण्याचा प्रयत्न केला. काकांकडे असलेली छऱ्याची बंदूक बघितली. माकडांना हाकलून लावण्यासाठी या बंदुकीचा उपयोग होतो, असे काकांनी सांगितले. आदल्या वर्षी आलेल्या वादळात जमीनदोस्त झालेली काही भली मोठी झाडे तिथे अजूनही आडवी पडलेली होती. त्या वादळाच्या काळात घरावरची कौले, छपरे पूर्ण उडून गेली होती. घरात सर्वत्र पाणी भरले होते. मात्र गावकऱ्यांनी एकमेकांच्या मदतीने सर्व घरे पुन्हा शाकारली आणि चिवट कोकणी माणूस नव्याने कष्ट करण्यास सज्ज झाला. वादळाची नुकसानभरपाई मिळाली का, असे विचारल्यावर काका म्हणाले, "होय मिळाली, पण त्यातून पडलेली झाडे उचलण्याचा खर्चसुद्धा निघाला नाही. खरं सांगायचं तर नुकसान भरपाईची अपेक्षा सरकारकडून कशाला करायची? वादळ काय सरकारने आणले का?" असे म्हणून त्यांनी आम्हालाच निरुत्तर केले. त्यांच्या निरपेक्ष कष्टाळू वृत्तीला मनोमन प्रणाम करत आम्ही नारळी, पोफळी आणि पोफळीवर चढवलेले मसाल्याच्या पदार्थांचे वेल बघून घराकडे परतलो. 

आल्या-आल्याच सांदणाच्या सुवासामुळे भूक चाळवली. हात-पाय धुऊन पाट-पाणी घेतले आणि जेवायला बसलो. काकू मोदकपात्रातून गरमागरम सांदणं काढून त्याच्या वड्या कापून आम्हाला वाढत होत्या. काजू-बटाट्याची अप्रतिम भाजी, खारातली मिरची, भरपूर ओले खोबरे-आमसूल घातलेली आमटी आणि घरचा भात असा फक्कड बेत जमला. जेवणानंतर पटापट आवरून आम्ही बॅगा तयार करून ठेवल्या आणि पुन्हा थोडा वेळ गप्पा मारत बसलो. 

त्यादरम्यान, अंगणात गुपचूप हापूस आंब्याच्या पेट्या येऊन तयार होत्या. काका-काकूंचा निरोप घेऊन आम्ही निघालो. त्यांनी प्रत्येकाला एकेक आंब्याची पेटी भेट म्हणून दिली. आदल्या दिवशीपासून त्यांच्या अगत्याने आम्ही भारावून गेलेलोच होतो, त्यावर कळस चढला. अखेर कित्येक मौल्यवान क्षणांच्या आठवणी घेऊन आम्ही परतीच्या प्रवासासाठी गाडीत बसलो. 

पुण्याहून निघाल्यापासून प्रत्येक टप्प्यावर आम्ही गाडीतले सहप्रवासी बदलत होतो. पुण्याकडे परत येताना पहिल्या टप्प्यात मला वऱ्हाडीबोलींचे अभ्यासक रावसाहेब काळे यांच्याकडून, त्यांनीच लिहिलेल्या काही इरसाल ग्रामीण कथा ऐकायला मिळाल्या. त्या ऐकताना चहाची वेळ कधी झाली, ते समजलेच नाही. एकदम गाड्या थांबल्या आणि आम्ही उतरलो. मसाला घातलेला स्पेशल चहा पिऊन ताजेतवाने झालो आणि पुन्हा सहप्रवासी बदलले. या शेवटच्या टप्प्यात आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळत पुण्याकडे निघालो. हा प्रवास कधी संपूच नये, असे वाटत होते आणि जणू विधात्याने खरोखरच आमचे ऐकले! भला मोठा ट्रॅफिक जॅम लागला. रम्य कोकण मागे सोडून आपण रखरखीत शहराजवळ पोहोचल्याची खूण पटली. घरच्यांचे फोन येऊ लागले. एक तासाचे अंतर तीन तासात पार करत अखेर आम्ही आपापल्या घरी सुखरूप पोहोचलो. 

पुढचे कित्येक दिवस कोकणातले निसर्गवैभव, तिथली घरे, तिथली माणसे मनातून जात नव्हती. या सर्वांची गोडी तिथून आणलेल्या आंब्यांमध्ये उतरली होती. पुण्यात, रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस म्हणून खरेदी केलेल्या कुठल्याच आंब्याची चव कधीच इतकी मधुर नव्हती!


--आसावरी गोखले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा