चैत्रपालवी
वर्ष नवे हर्ष नवे
खेद जावो मावळोनी
मानवी उत्कर्ष नवे
भेद-भाव विसरोनी
तेज नवे बीज नवे
सृजनाला लगडोनी
रान नवे पान नवे
उत्साहाने ओसंडोनी
गंध नवे स्पर्श नवे
मेघ मनी बरसोनी
छाया नवी ऊन नवे
द्वंद्व घेऊ समजोनी
लय नवी ताल नवे
क्षण जाती परतोनी
गीत नवे राग नवे
कणसूर ओलांडुनी
लाट नवी थेंब नवे
तनु-मना भिजवोनी
नदी नवी झरे नवे
धारणा घ्या प्रक्षाळोनी
तेल नवे दीप नवे
सांदीकोना उजळोनी
सर्ग नवे मार्ग नवे
रुजवू या चोखाळोनी
भानू नवा नभ नवे
धग घेऊ मुरवोनी
माती नवी डाव नवे
रग अंगी जिरवोनी
लाभती निष्कर्ष नवे
वेध नेमका घेओनी
रोजचे संघर्ष नवे
जाता ये ना चुकवोनी
चैत्र नवा मैत्र नवे
मुक्त झुळूक झेलूनी
आशा नवी भान नवे
तोल ठेवू सावरोनी
--आसावरी गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा