लेबल

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

माऊली

 *माऊली 


बाईची आई होते तेव्हा

नेमकं काय बरं बदलत असतं?

आईपण केवळ जैविक नसतं

भावनिक, मानसिक, बौद्धिक असतं 


भूत-वर्तमान-भविष्य मुलांचं

सतत तिच्या नजरेसमोर फिरतं

क्षणात कठोर, क्षणात हळवं होत

पिल्लांचं हित तिला साधावं लागतं 


काळजीचं मळभ जेव्हा मनात दाटतं

पिल्लांना कुशीत घेऊन बसावंसं वाटतं

मात्र पंखांत बळ तिला भरायचं असतं

जगण्यासाठी त्यांना सक्षम करायचं असतं 


मुलांना, बाबांना, आजी-आजोबांना

तिचं आग्रही असणं मानवत नसतं

'आई जरा अतिच करते'

यावर त्यांचं एकमत असतं 


समतोल साधणं हेच खरं तर

आईचं मुख्य काम होऊन बसतं

व्यवसाय अन् कुटुंब, बंध आणि मुक्त

परंपरा न् आधुनिकता, कौतुक नि शिस्त 


संवादाचे पूल बांधत ती माणसं जोडते

पुढच्या पिढीसाठी उदाहरण घालून देते

प्रत्येक आई आदर्श नसेल कदाचित

पण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न जरूर करते 


जिजाऊच्या काळजाचा अंश ती मागते

ज्ञान-भान-जाण, विवेक, सामर्थ्यही देते

व्यष्टीकडून समष्टीचा प्रवास समजावते

लेकराला घडवून समाजाकडे सोपवते 


आई ही नसते केवळ कुणी व्यक्ती 

आईपण ही असते एक निखळ प्रवृत्ती 

बाबांमध्येही कधी ती हळूच डोकवी

कित्येकदा मूल होई आईचीही आई 


बालविधवांना 'महर्षीं'च्या मायेची सावली

'अनाथांची माय' जशी सिंधूताई झाली

ज्ञानोबा वारकर्‍यांची होतसे 'माऊली' 

'विठाई' भक्तांच्या सदा हाकेला धावली


--आसावरी गोखले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा