लेबल

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

माझा मर्‍हाटाचि बोलु कौतुके

 माझा मर्‍हाटाचि बोलु कौतुके 


कुणी जातीचे अभिमानी, कुणी धर्माचे अभिमानी 

भाषेचा कुणा इथे अभिमान?

पैजा अमृताशी जिंके, अशा महाराष्ट्री भाषेचे

लाभले खरेच आम्हा वरदान 


मराठी दिन एकचि केवळ, बाकी दीन मराठी

सोसतसे पदोपदी अपमान

महाराष्ट्रदेशीदेखिल अनिवार्य न भाषा इथली

तिचा ठेवील कोण बरे सन्मान? 


ज्ञाना-तुकयाची मर्‍हाटी, सावरकरी भाषाशुद्धी

सार्थकी लावू ते सायास महान

राज्यव्यवहारकोशनिर्मिती शिवबा परभाषा भेदी

सुबोध वाचेला अर्पी अग्रमान 


मराठीचा महिमा गाऊ, द्वेषा नच थारा देऊ

मुळी नको तो दुरभिमान

मराठीचा आग्रह धरू या, परभाषिकास शिकवू या

मिळवू या आगळे समाधान


परभाषी कुबड्या फेकू, मधुर वाणीने जग जिंकू

मराठीत बोलू उंचावूनिया मान

सखोल धांडोळा घेऊ या, प्रतिशब्द नवे घडवू या

नवनिर्मितीने मिळेल जीवनदान 


अनेक भाषा जाणून घेऊ, मायबोलीला परि देऊ

जनी-जीवनी अढळ स्थान

जो मान ठेवी आईचा, तोचि आदर करी सर्वांचा

लाभे स्नेहाचे भाषेला परिमाण


--आसावरी गोखले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा