लेबल

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

सूर्यास्त

 सूर्यास्त 


      म्हणे जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते. पण मला मात्र मावळता सूर्य खिळवून ठेवतो. भारावून टाकतो. 

म्हणजे सूर्योदय बघायला सकाळी लवकर उठाव लागत आणि  त्या मानाने सूर्यास्त पाहणं, बघायला मिळणं सोपं असत. :) :) 

      हा गमतीचा भाग सोडला तरी मला सूर्यास्त आवडतो. 

मावळणारा सूर्य मला एखाद्या दमून भागून घरी परतणाऱ्या बाबा सारखा वाटतो. दमलेला भागलेला असला तरी पिचलेला नाही हं .. क्रुतार्थ..दिवसभर ऑफिसमध्ये, फॅक्टरी मध्ये, कामाच्या ठिकाणी १००% देऊन परत घरी जाऊन, दुसऱ्या जगात नवीन ऊर्जा घेऊन जाणारा. बाहेर झालेला मान अपमान, ताण, सुख दुःखाच्या गोष्टी अलिप्तपणे बाहेरच ठेऊन, घरी नवीन रूप घेऊन जाणारा बाबा. 

        खूप वेळ ग्राऊंडवर फुटबॉल खेळून घरी जाणारी मुलं पहिली आहेत? खेळून खेळून दमलेली असतात, अंग धुळीने आणि घामाने माखलेल असतं . पण तरीही घरी जात असताना, रस्त्यात पडलेली रिकामी बाटली किंवा कॅन पायाने उडवत जात असतात. शरीर दमलेले असल तरी आतली ऊर्जा शमलेली नसते. तसाच मावळणारा सूर्य देखील जाताजाता आकाशावर , ढगांवर  क्षणाक्षणाला वेगवेगळे रंग उधळत जात असतो. 

           उगवणाऱ्या सूर्य मध्ये एक नवीन सृजनशील ऊर्जा असते. पण मावळणाऱ्या सूर्यामध्ये  मात्र अंतर्मुख करणारी, माणसाला आतमध्ये बघायला भाग पडणारी शक्ती असते. आयुष्यभर तृप्ततेने जगणारी, जगण्याचं सार्थक झालेली, किंवा जीवन कस जगावं हे सांगणारी आभाळाएवढी काही  वयाने आणि मानाने जेष्ठ माणसं असतात ना तसाच मला हा मावळणारा सूर्य भासतो. 

          'देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी' असा सगळ्या जगाला वाटावं इतकी प्रचंड उर्जा, जिच्यावर सगळं जीवन अवलंबून आहे, ती जगाला अर्पण करून देखील, तृप्त, धीरगंभीर, आणि अलिप्त भाव फक्त मावळणाऱ्या सूर्यातच दिसतात. जणू काही 'कर्ता करविता तो ईश्वर' असच तो म्हणतोय. 

           त्यातून मावळणाऱ्या सूर्याच्या जोडीला समुद्र असेल, तर सूर्याच्या मावळ्ण्याच वलय अजूनच गूढ होत जात. मावळणाऱ्या सूर्याचा खरा सखा हा समुद्राचं. दोघेही अथांग शक्तीचे मालक, सृष्टी चक्र चालवणारे आणि सगळ्यात नामानिराळे राहणारे, अलिप्त....

जीवन कसं जगावं? हे दाखवत..


हेमांगिनी जावडेकर-पुराणिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा