लेबल

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

संडे स्पेशल आई

 संडे स्पेशल 

"मैफिल" 


''आई" ....

'आई' हा उर्दू गझलचा विषय या आधी कधीही झाला नाही , दिग्गज शायर  मीर , दाग , मूसहाफी , किंवा गालिब  यांनीही 'आई' या विषयावर गझल रचली नाही , पण निदा फाझली  यांनी "बेसन की सौंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ" ..हा  मिसरा असलेली गझल लिहिली आणि "आई" हा देखिल गझल चा विषय होऊ शकतो यावर शिक्कामोर्तब झालं.....  निदांच्या या गझलवर पुढच्या संडे स्पेशलमध्ये सविस्तर लिहीणार आहे. 

बुलंद शायर मुन्नवर राणा , यांनी सुद्धा 'माँ' हा विषय घेऊन भरपूर शायरी केली . मुन्नवर यांची आई वर वेडी भक्ती ... त्याचीच झलक आजच्या संडे स्पेशल मध्ये ... आईची महती अस्विकार करणारा, आई वर प्रेम न करणारा  मला शोधूनही सापडला नाही ... 

काही व्यक्त होतात तर, काहींचं प्रेम हे अव्यक्त ... माझा जवळचा मित्र , आणि तो माझा गुरु हि फिलॉसॉफर हि , त्याची आई दुर्धर आजारांनी गेली ... त्यानी त्याचे दुःख उघड पणे व्यक्त केलं नाही पण तो आई चा निस्सम भक्त होता , कधीही आईची कोणतीही आज्ञा त्यानी मोडली नाही , आज ही आईच्या प्रेमळ छायेत असल्या सारखा वागतो ... 

तो जरी व्यक्त होत नसला तरी ....

"न जाने क्यों आज अपना ही घर मुझे अनजान सा लगता है,

तेरे जाने के बाद ये घर-घर नहीं खाली मकान सा लगता है" 

या प्रकारचं जे फिलींग, अलिकडे त्याच्या देहबोलीतून व्यक्त होत असतं, त्यातूनच त्याचं अव्यक्त दुःख मी रोज अनुभवतो ... 

शेवटी म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा .... 


असो...  मुन्नवर यांचे 'आई' या विषयावर काही निवडक शेर अन्वयार्थसह.. 


लहान मुल रडते,  आई त्याची समजूत काढते , आणि ते मुल, त्याचे बक्षीस आईला , त्याचे आश्रू तिच्याच पदराला पुसून देतं, मुल तर खुश होतं आणि मुलाचा आनंद बघून आई सुद्धा ... ह्या भावनेवर मुन्नवर  यांचा शेर बघा 

"मैंने रोते हुए पोंछे थे किसी दिन आँसू,

मुद्दतों माँ ने नहीं धोया दुपट्टा अपना ... " 


आई वर शायरची भक्ती पहा ... 

"जब तक रहा हूँ धूप में चादर बना रहा,

मैं अपनी माँ का आखिरी ज़ेवर बना रहा".....'माँ  का  जेवर"  काय सुंदर उपमा दिली आहे ! ... हे केवळ निस्सीम मातृभक्तच लिहू शकतो . 


आईची सुद्धा वाटणी करणारे दुर्दैवी आणि भिकार हृदयाचे लोक आहेत या जगात .. धन ,दौलत घर दार याची वाटणी करताना आईची सुद्धा वाटणी होते .... मुन्नवर स्वतःला नशीबवान समजतो , आणि म्हणतो मी लहान आहे मला माझी आई द्या , तुम्ही घ्या संपूर्ण संपत्ती .. मला माझी आई प्यारी ..आणि शेर होतो 

"किसी को घर मिला हिस्से में या कोई दुकाँ आई,

मैं घर में सब से छोटा था मेरे हिस्से में माँ आई..." 


आपत्य चूक करतं, त्रास मात्र आईला होतो. काही वेळेस हा त्रास आईला अक्षरशः रडवतो... हि वेळ आईवेड्यां वर न येवो .... पण आलीच तर ,  आई मुलाची तडफड बघू शकत नाही , ती मुलाची समजूत काढते आणि त्याला या 'गिल्ट' भावनेतून बाहेर काढते  ... याला मुन्नवर पापक्षालन असे समजतात आणि लिहितात 

"इस तरह मेरे गुनाहों को वो धो देती है,

माँ बहुत ग़ुस्से में होती है तो रो देती है..." 


मुन्नवर  ची किती साधी मागणी आहे बघा , मला परत लहान मुल बनव देवा ... आणि आईला इतकं घट्ट बिलगू दे कि , जादू ने मी परत लहान मुल होईन ( बच्चा हो जाऊं ) 

"लहान मुल दुडुदुडू पळत येते आणि उभ्या असलेल्या आईच्या पायाला दोनी हातानी घट्ट पकडून बिलगते" ... ह्या चित्रा इतका आई आणि मुला मधील ममत्व दाखवणारा दुसरा भावनिक प्रसंग नाही.  

"मेरी ख़्वाहिश है कि मैं फिर से फ़रिश्ता हो जाऊँ,

माँ से इस तरह लिपट जाऊँ कि बच्चा हो जाऊँ" 


.... मुल कितीहि वयस्क असो, आई साठी ते एक बाळ असतं.. आई समोर असली की अपसूक आपण 'बाळ' होऊन जातो. आई आपल्यातलं बालपण सर्वार्थाने जोपासते. यावर मुन्नवर म्हणतात..

"कल अपने-आप को देखा था माँ की आँखों में,

ये आईना हमें बूढ़ा नहीं बताता है" 


जगातील प्रिय आणि मौल्यवान चीज ती म्हणजे आई च्या हातचं जेवण .... दुसऱ्या व्यक्तीच्या हातचं जेवण किती हि रुचकर असलं तरी शेवटी आपला अभिप्राय , “आई च्या हातची मटकी उसळ काही और च," 

... असंच काहीतरी मुन्नवर लिहून जातो 

"खाने की चीज़ें माँ ने जो भेजी हैं गाँव से,

बासी भी हो गई हैं तो लज़्ज़त वही रही" 


आई च्या पायाशी स्वर्ग आहे अशी समजूत आहे, त्यावर हा शेर आहे 

"चलती फिरती आँखों से अज़ाँ देखी है

मैंने जन्नत तो नहीं देखी है माँ देखी है...."

(अज़ाँ - प्रार्थनेची पुर्वसुचना) 


जो आई वेडा तो कधीहि स्वतःच दुःख आईला सांगत नाही , स्वतः सोसतो, आई समोर रडत नाही ... याचं एकच कारण- आईला त्रास नको, तिला काय वाटेल या जाणिवेने तो हैराण होतो , यावर मुन्नवरचा हा शेर आपल्याला निशःब्द करून जातो..

"माँ के आगे यूँ कभी खुल कर नहीं रोना,

जहाँ बुनियाद हो इतनी नमी अच्छी नहीं होती"

... जिथे 'पाया' असतो तिथं इतका ओलावा चांगला नाही ... 


"जब भी कश्ती मेरी सैलाब में आ जाती है,

मां दुआ करती हुई ख्वाब में आ जाती है"... 

काय लिहणार या वर , मुलगा त्रासात असतो तेव्हा  “दुवा “ देणारी आई त्याला स्वप्नात दिसते आणि तो चिंता मुक्त होतो .... 


मुन्नवर लिहितो कि, जी लेखणी केवळ   मेहबुबा , कोठा , नाच गाणं यावर गझल करत होती त्या लेखणीला,  आई वरील श्रद्धेच्या ताकदीने मी आईवर गझल लिहिण्या साठी भाग पडलं ... हा आईच्या प्रेमाचा जल्लोष आणि विजय आहे. "मामूली एक कलम से कहां तक घसीट लाए,

हम इस ग़ज़ल को कोठे से मां तक घसीट लाए" 


आई ला  साने गुरुजी 'पाचवा वेद' म्हणतात ते उगीचच नाही ...साने गुरूजींच खरं नाव 'पंढरीनाथ' असलं तरी, पुस्तक लिहीताना गुरूजींनी शाम हे नाव घेतलं कारण त्यांच्या आईचे नाव 'यशोदा' होतं. प्रत्येक आपत्य हा शाम आणि प्रत्येक आई हि शाम ची आई झाली तर, नक्कीच हे जग प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञतेचा  प्रचंड  महासागर होईल..!!


- अभिजीत कारेकर 

हे मी 24/10/20 ला लिहीलयं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा