माझ्या बाहेरच्या खाद्य भ्रमंतीची खरी सुरवात शिक्षणानंतर नोकरीसाठी मुबंईला गेले तेंव्हा झाली. त्या आधी बाहेर खायला जायची घरी पद्धत नव्हती. आई घरीच खूप काही बनवायची. पण त्या पदार्थांपेक्षा मला काय आवडत असेल तर, तो म्हणजे आमटी न भाजीची कढई पुसून घेतलेला भात. काहीही वाया घालवायचं नाही हे आईच तत्त्व. त्यामुळे आमटीचं आणि भाजीची कढई पुसण्यासाठी त्यात भात घालायची. त्यात आई लोणच्याचा खार घालायची. तो आमटीचा, भाजीचा मसाला लागेलेला भात खूप मस्त लागायचा. त्या भाताच्या वाटणीवरून आम्हा भावंडांच्यात भांडण व्हायची. असेच आम्ही आई तिच्यासाठी म्हणून जी भाकरी करायची, त्यावर टपून बसायचो. त्यात खरंतर विशेष काही नसायचं. सगळ्या भाकऱ्या करून झाल्या कि आई उरलेल्या पिठाची एकच मोठी, जराशी जाड, कडक भाकरी करायची. जाड असल्याने थोडी खरपूस भाजावी लागायची. तव्यावरून उतरवलेली गरम भाकरी, त्यावर शेंगदाण्याचं तेल आणि तिळाची चटणी (तेल न् तिळाची चटणी must)...ह्या आमच्या इस्टेटी वरुन भांडायचो. आजही जेंव्हा आम्ही तिघे एकत्र जमतो तेंव्हा आईला एक भाकरी करायला सांगतो. आता तिच्याच्याने काही होत नाही पण त्या भाकरी साठी ती उभी राहते. इतक्या वर्षांनंतरही तीच चव. जरा सुद्धा इकडे तिकडे नाही. मी जेंव्हा पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला तेंव्हा खरंच वाटून गेलं, काय हे .. या पेक्षा आईची भाकरीच भारी..
आजोळ कोकणात असणाऱ्या भाग्यवंतांपैकी मी एक. आम्ही गेलो कि आधी मामी सोवळ्यातले पापड बाहेर काढायची. त्यातल्या पोह्याच्या पापडांची विशेष आठवण. चुलीतल्या निखाऱ्या वर भाजलेले पोह्याचे पापड म्हणजेच मिरगुंड लागायचे मस्तच पण पापडाचा तुकडा तोंडात टाकला कि त्यातल्या तिखटाने अशी ढास लागायची की डोळ्यातून पाणीच यायचं. पण हि पहिली ढास गेली कि कोहळ्याच्या पाण्यात बनवलेले ते पोह्याचे पापड दह्याबरोबर अप्रतिम लागायचे. मग मामीने केलेले बाकीचे सगळे पदार्थ बाजूला पडायचे. माझी मामी सुगरण. त्यामुळे मग नंतरचे काही दिवस खाण्याचा महोत्सव असायचा.
पण माझ्यासाठी बाहेरच्या खाण्याच्या आठवणी त्यांच्या स्थानमाहात्म्याशी किंवा कालमाहात्म्याशी जोडलेल्या आहेत. ह्या आठवणी म्हणजे माझ्या साठी benchmarks आहेत. कधी तो पदार्थ खाल्ला की लगेच मापदंडावर मोजणी होते. पण अजून या पदार्थांचे मापदंड कुणी ओलांडले नाहीत (माझ्या साठी तरी नाही). जसं सिंहगडावरचं मटक्यातलं दही. त्याची चवच अफलातून असते. घरी तसं दही लावायचं कितीही प्रयत्न केला तरी ती चव येतच नाही. (मी यर एकदा तिथल्या आजींशी बोलून ती मातीची छोटी भांडी मागून आणली होती. म्हटलं न जाणो त्यात काही जादू असेल तर?🤦🏻♀️🙈) गडावरची गोड हवा आणि तिथल्या इतिहासाचं गारुड त्या दह्याची लज्जत वाढवते. त्यातून जर गडावर चढून गेलो असू तर क्या केहना...दह्याची चव कितीतरी पटीने वाढते. तशीच ' मचाण' रिसॉर्ट मधली smoked दाल मखनी. त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी दाल मखनी खाल्ली...अगदी कोरेगाव पार्क मधल्या शेफ संजीव कपूर च्या 'येल्लो चिल्ली' मध्ये सुद्धा, पण 'मचाण' मधल्या smoked दाल मखनी लाजवाब होती.
पूर्वी कोथरूड कडून बावधनला जात असताना, पुलासाठी उजवीकडे वळताना तिथे एक छोटं हॉटेल होता. हॉटेल कसलं टपरीच म्हणा. टपरीच्या मागे बांबूच्या छताखाली १०-१२ टेबल्स मांडलेली. (up and above hotel chya diagonally opposite) तिथली कॉफी म्हणजे लाजवाब. आता ती टेकडी आणि तो पूल दोन्ही इतिहासजमा झाले. मग त्या टपरीची काय कथा! ती टपरी अशी टेकडीच्या कडेला होती. त्यामुळे एकाबाजूने पाहिलं तर खाली मुंबई- बेंगलोर हायवे अस्ताव्यस्त पडलेला दिसायचा आणि पलीकडे कोथरूड.. तिथे अफलातून कॉफी आणि मसाला पाव मिळायचे. थंडीच्या संध्याकाळी धुक्याच्या रजईतून कोथरूड मधले लुकलुकणारे दिवे, हायवे वरून सतत धावणारे दिवे आणि हातात त्याची अफलातून कॉफी. सगळ्या अस्सल कोथरुडकरांच्या अभिमानाला धक्का बसेल.. (त्यासाठी आधीच माफी मागते.) पण 'दुर्गा'ची कॉफी त्याच्या जवळपास पण नाही. तो टपरीवाला पण माहोल बनावा म्हणून तो मागे जुनी, शांत हिंदी गाणी लावायचा... मला आठवतंय मी आणि माझा नवरा ते हायवे साईडच टेबल मिळावं म्हणून एकदा कॉफी साठी पाऊण तास थांबलॊ होतो. ☺️
अशाच एका उप्पीटाची चव, सहा वर्ष होऊन गेली, जिभेवर रेंगाळतेय. त्यावेळी मी गरोदर होते. सकाळी लवकर डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती त्यामुळे सकाळी काही करून जाण जमलं नाही. डॉक्टरांच्या इथे खूप वेळ लागला आणि घरी येईपर्यंत मला चांगलीच भूक लागली. घरात जे खाण्याचं होतं ते मला खावंसं वाटत नव्हत. मला काहीतरी गरम गरम खावंसं वाटत होतं, पण करायची इच्छा नव्हती. असा वाटत होत कि कुणीतरी मायेने करून घालावं. पण मायेचं असं त्यावेळी जवळ कुणी नव्हतं. भूक लागलेली, घरात जे आहे ते खायला नको वाटणं, गरम गरम कुणीतरी खायला करून आयतं तयार द्यावं असं वाटणं किती ते moods .. आता 'त्यात काय एव्हडं' म्हणून हसू येतंय. पण मला आठवतंय त्या वेळी खूप भरून आलं होतं. मग डबडबलेले डोळ्यांनी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला. आणि तिला जवळ जवळ ऑर्डर च दिली. "मी आत्ता तुझ्या घरी येतेय. मला काहीतरी गरम गरम खायला हवंय." तिलाही फोनवरून माझी अवस्था लक्षात आली असावी. माझ्या घरून तिच्या घरी जाईपर्यंत, फक्त पाच मिनिटात तिने उप्पीट तयार ठेवलं होतं. तिच्या घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या प्लेट भरून उप्पीट हातात. त्या दिवशीच्या त्या उप्पीटाला स्वर्गीय चव होती. त्याच्या आधी आणि नंतर पण मी कितीतरी वेळेला उप्पीट बनवलं, त्याच मैत्रिणीच्या घरी पण खाल्लं . पण 'तेंव्हा' सारख नाहीच.
'खाण्यासाठी जगावं कि जगण्यासाठी खावं' असल्या वादात पडण्यापेक्षा conveniently स्थळ आणि काळाप्रमाणे आपण पार्टी बदलत राहावी.. फक्त खाण्यासाठीच हा
लेबल
- 01.कथा (5)
- 02.नाट्य छटा (1)
- 03.कविता रसग्रहण (5)
- 04.ट्रेक (8)
- 05.प्रवासवर्णन (21)
- 06.भजन (1)
- 07.भक्ती गीत (1)
- 08.कविता (52)
- 09.लेख (60)
- 10.खाद्य भ्रमंती (8)
- 11.पुस्तकपरिचय (4)
- 12.चित्रपट परीक्षण (1)
- 13.व्यक्तिचित्र (2)
- 14.अनुभूती (1)
- 15.चारोळ्या (2)
- 16.नाटिका (3)
- अजय घाणेकर (2)
- अथर्व बिवलकर (1)
- अदिती जोगळेकर-हर्डीकर (2)
- अभिजीत कारेकर (1)
- अर्चना खिस्ती-गोरकर (11)
- आसावरी गोखले (12)
- ऋचा देव (6)
- कल्याणी बोरकर (4)
- किर्ती पांडव (2)
- केयूर कानडे (1)
- कौस्तुभ सांभारे (2)
- गिरीश खोडके (1)
- ज्योती नेरकर (1)
- डॉ योजना चिराग (3)
- धनश्री केयूर कानडे (5)
- पालक अभिव्यक्ती नियोजन गट (1)
- मिलिंद फडके (9)
- रुपाली सागडे कुलकर्णी (7)
- रेवती गोखले (4)
- वंदना बोकील-कुलकर्णी (1)
- शलाका मेहता (1)
- सचिन चव्हाण (1)
- सुखदा आठल्ये (1)
- सौ . शिल्पा जरे (1)
- सौ. सारिका दत्तात्रय बिवलकर (6)
- सौ. सारिका नितिन कुडले (1)
- सौ.चन्नम्मा सगणे (2)
- स्मिता श्रीपाद (28)
- स्वरूपा कुलकर्णी शहापुरकर (9)
- हर्षाली वाघोले (5)
- हेमा हर्षाली (1)
- हेमांगिनी जावडेकर-पुराणिक (3)
- ज्ञानेश्वर नेरकर (1)
रविवार, ११ डिसेंबर, २०२२
खाद्य भ्रमंती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा