लेबल

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

 खाण्यासाठी जन्म आपुला

 खाण्यासाठी जन्म आपुला

   हा विषय वाचल्या वाचल्या मला पटकन आठवले ते माझे बाबा! माझ्या बाबांना खायची आणि खिलवायची दोन्हीची आवड! मी लहान असताना सकाळ सकाळी अनेकदा जाग यायची ती मस्त वासानं! बाबा म्हणायचे, 'चला पटपट आवरून या बदामाचा शिरा केलाय!' किंवा 'आलू पराठा केलाय' असं काहीतरी.. मग आई म्हणायची, 'अहो, आधी चहा वगैरे तरी होऊ द्या!'  पण ते म्हणायचे... 'आधी खाऊन तरी बघा कसा झालाय!' त्यांच्या नजरेत आणि कृतीत खूप अधीरता असायची... साजूक तुपातला बदामाचा शिरा बाबा गूळ घालून करायचे! इतका अप्रतिम लागायचा की बस! आम्ही 'मस्त झालाय... ' म्हटलं... की ते तृप्त व्हायचे! पावसाच्या दिवसात शाळेतून भिजून घरी आलो की घर कांदा भजीच्या वासाने भरलेलं असायचं! एकीकडे आल्याचा चहा आणि एकीकडे कांदा भजी बाबा तळून वाढायचे! असे माझे बाबा खवय्ये होते!    
    दुपारच्या जेवणात हाताची बुक्की मारून फोडलेला कांदा, दोन-चार लसणाच्या पाकळ्या, कच्चे शेंगदाणे यापैकी काहीतरी हवंच... आणि दुपारी जेवताना आज रात्रीला काय करायचे याची चर्चा असायची... आई काही वेळा वैतागायची पण! अहो दुपारचं पचू तर द्या आधी... असंही म्हणायची.
    मला आठवतं मी दहावीला असताना टेरेसवर अभ्यासाला जायचे. मग दोन तीन तास तरी खाली यायचं नाही. मग जाताना चणे दाणे पाणी वगैरे बरोबर न्यायचं... हल्ली मुलं गाणी ऐकत, टीव्ही बघत अभ्यास करतात. मी मात्र खात खात अभ्यास करायचे! जागरण केलं तर मग चहा, कॉफी काहीतरी हवंच!
   दहावीनंतर डिप्लोमा केल्यामुळे माझं कॉलेज लाईफ तसं तीनच वर्षाचं! पण कॉलेजचं पहिलं वर्ष मी आणि माझा ग्रुप जवळ दररोज कॅन्टीनला जायचो. कॅन्टीनचे मालक, वेटर सगळेच आम्हाला ओळखायला लागलेले! की हे जवळजवळ रोजच येतात म्हणून!
   मग पुढं नोकरी लागल्यावर तर काय विचारायलाच नको! सांगलीची जवळपास सगळी हॉटेल्स आणि थिएटर्स आम्ही पालथी घातली आहेत. कुठे भेळ चांगली मिळते, कुठे डोसा, कुठे दहीवडा, कुठे मिसळ... सगळं पाठ झालेलं!
  लग्नानंतर कोकणात आल्यावर तर काय विचारता...नास्त्यात मऊ भात केला तर त्याबरोबर तूप, मेतकूट, पापड, मिरची, लोणचं, दही इत्यादी कंपल्सरी! पोहे केले तर किमान पापड हवाच! थालीपीठ लोणी, पानगी लोणी, पानगी मिरची असे वेगवेगळे मेनू असायचे. कोकणात जेवणाच्या पदार्थांची तर खूपच विविधता आहे. वेगवेगळ्या रानभाज्या, उसळी, आंबा फणस कोकम इ. चे विविध पदार्थ... चिंच गूळ आणि नारळ यांचा मुक्तहस्त वापर हे इथलं वैशिष्ट्य! जाता येता विविध फळांचा आहार तर सुरूच असतो. वेलची केळी किंवा सोनकेळी तर एकावेळी दोन-तीन खायचीच असतात. सुरुवातीला तर मला वाटायचं की काय इथे... सगळे सारखे खातच असतात... म्हणजे नाश्ता, जेवण, मधली वेळ, संध्याकाळ, रात्र सुरूच असतं सतत काही ना काही... माझे बाबा इथे माझ्याकडे आले की खुश असायचे. मसाला काजू, खारा काजू त्यांना फार आवडायचा! शेवटी शेवटी जेंव्हा ते थकले तेंव्हा त्यांनी एकदा एका जाणकारांना विचारलं होतं की.... माझा आता तसा सगळ्यावर संयम आलाय म्हणजे राग झोप इत्यादी... पण अजून खाण्यावरची वासना काही जात नाही... त्यावर त्या जाणकारांनी फार छान उत्तर दिलं. ते म्हणाले... अहो भल्याभल्यांची ही वासना जात नाही! म्हणूनच नाही का पिंडाला कावळा शिवावा म्हणून भजी, वडे, चहा, सुपारी.. काहीही ठेवतात! यावरूनच मग मला बाबांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली... एक ऋषी असतात. खूप तपस्वी वगैरे...आणि आता त्यांची प्रयाणाची वेळ येते...आता मोक्ष मिळणार... ते समाधीतून बाहेर येतात आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष ज्या झाडाखाली ते बसलेले असतात त्या झाडावरच्या एका रसदार अशा फळाकडं जातं... काय सुंदर फळ आहे! मधुरही असेल नाही... बस! एवढेच विचार त्यांच्या मनात येतात! आणि त्याच क्षणी त्यांचं प्राणोत्क्रमण होतं. त्यांना अळीचा जन्म मिळतो आणि त्या फळावर ती अळी वळवळायला लागते...मला फार गंमत वाटायची या गोष्टीची! म्हणजे अहो जन्मच काय? खाण्यासाठी पुनर्जन्मही घ्यायला लागतो... आणि तसं व्हायला नको असेल ना.. तर बाबा म्हणायचे तसं ऋणं कृत्वा घृतं पिबेत!  अगदीच असंच नाही...तरी निदान मनात येईल ते आणि तेव्हा खात जावं हेच खरं! कारण... खाण्यासाठी जन्म आपुला!

✒️ सौ. सारिका दत्तात्रय बिवलकर
मस्त!
किती छान आठवणी!
कित्ती सुंदर आठवणी 👌👌👌 खूप आवडला लेख.
Thank you☺️🙏🏻
Thanks☺️🙏🏻
बाबांच्या हातचा स्वयंपाक स्पेशल असतो👌👌
हो खरयं... प्रेम, कौतुक, उत्साह भरलेला असतो त्यात... धन्यवाद☺️🙏🏻
गंमत आहे ना.. जवळ जवळ सगळ्यांच्याकडे आईच घराची food minister असते. पण कौतुक मात्र बाबांनी कधीतरी केलेल्या पदार्थांचं. मला वाटत 'आजी' झाल्याशिवाय आईच्या वाट्याला कौतुक येतच नाही 😃. .. गंमत करतेय हा. मी पण बाबांच्या पक्षात असायची. 😅
माझ्या बाहेरच्या खाद्य भ्रमंतीची खरी सुरवात शिक्षणानंतर नोकरीसाठी मुबंईला गेले तेंव्हा झाली. त्या आधी बाहेर खायला जायची घरी पद्धत नव्हती. आई घरीच खूप काही बनवायची. पण त्या पदार्थांपेक्षा मला काय आवडत असेल तर, तो म्हणजे आमटी न भाजीची कढई पुसून घेतलेला भात. काहीही वाया घालवायचं नाही हे आईच तत्त्व. त्यामुळे आमटीचं आणि भाजीची कढई पुसण्यासाठी त्यात भात घालायची. त्यात आई लोणच्याचा खार घालायची. तो आमटीचा, भाजीचा मसाला लागेलेला भात खूप मस्त लागायचा. त्या भाताच्या वाटणीवरून आम्हा भावंडांच्यात भांडण व्हायची. असेच आम्ही आई तिच्यासाठी म्हणून जी भाकरी करायची, त्यावर टपून बसायचो. त्यात खरंतर विशेष काही नसायचं. सगळ्या भाकऱ्या करून झाल्या कि आई उरलेल्या पिठाची एकच मोठी, जराशी जाड, कडक भाकरी करायची. जाड असल्याने थोडी खरपूस भाजावी लागायची. तव्यावरून उतरवलेली गरम भाकरी, त्यावर शेंगदाण्याचं तेल आणि तिळाची चटणी (तेल न् तिळाची चटणी must)...ह्या आमच्या इस्टेटी वरुन भांडायचो. आजही जेंव्हा आम्ही तिघे एकत्र जमतो तेंव्हा आईला एक भाकरी करायला सांगतो. आता तिच्याच्याने काही होत नाही पण त्या भाकरी साठी ती उभी राहते. इतक्या वर्षांनंतरही तीच चव. जरा सुद्धा इकडे तिकडे नाही. मी जेंव्हा पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला तेंव्हा खरंच वाटून गेलं, काय हे .. या पेक्षा आईची भाकरीच भारी..

                 आजोळ कोकणात असणाऱ्या भाग्यवंतांपैकी मी एक. आम्ही गेलो कि आधी मामी सोवळ्यातले पापड बाहेर काढायची. त्यातल्या पोह्याच्या पापडांची विशेष आठवण. चुलीतल्या निखाऱ्या वर भाजलेले पोह्याचे पापड म्हणजेच मिरगुंड लागायचे मस्तच पण पापडाचा तुकडा तोंडात टाकला कि त्यातल्या तिखटाने अशी ढास लागायची की डोळ्यातून पाणीच यायचं. पण हि पहिली ढास गेली कि कोहळ्याच्या पाण्यात बनवलेले ते पोह्याचे पापड दह्याबरोबर अप्रतिम लागायचे. मग मामीने केलेले बाकीचे सगळे पदार्थ बाजूला पडायचे. माझी मामी सुगरण. त्यामुळे मग नंतरचे काही दिवस खाण्याचा महोत्सव असायचा.    

                 पण माझ्यासाठी बाहेरच्या खाण्याच्या आठवणी त्यांच्या स्थानमाहात्म्याशी किंवा कालमाहात्म्याशी जोडलेल्या आहेत. ह्या आठवणी म्हणजे माझ्या साठी benchmarks आहेत. कधी तो पदार्थ खाल्ला की लगेच मापदंडावर मोजणी होते. पण अजून या पदार्थांचे मापदंड कुणी ओलांडले नाहीत (माझ्या साठी तरी नाही). जसं सिंहगडावरचं मटक्यातलं दही. त्याची चवच अफलातून असते. घरी तसं दही लावायचं कितीही प्रयत्न केला तरी ती चव येतच नाही. (मी यर एकदा तिथल्या आजींशी बोलून ती मातीची छोटी भांडी मागून आणली होती. म्हटलं न जाणो त्यात काही जादू असेल तर?🤦🏻‍♀️🙈) गडावरची गोड हवा आणि तिथल्या इतिहासाचं गारुड त्या दह्याची लज्जत वाढवते. त्यातून जर गडावर चढून गेलो असू तर क्या केहना...दह्याची चव कितीतरी पटीने वाढते.  तशीच ' मचाण' रिसॉर्ट मधली smoked दाल मखनी. त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी दाल मखनी खाल्ली...अगदी कोरेगाव पार्क मधल्या शेफ संजीव कपूर च्या 'येल्लो चिल्ली' मध्ये सुद्धा, पण 'मचाण' मधल्या smoked दाल मखनी लाजवाब होती.  
                 पूर्वी कोथरूड कडून बावधनला जात असताना, पुलासाठी उजवीकडे वळताना तिथे एक छोटं हॉटेल होता. हॉटेल कसलं टपरीच म्हणा. टपरीच्या मागे बांबूच्या छताखाली १०-१२ टेबल्स मांडलेली.  (up and above hotel chya diagonally opposite) तिथली कॉफी म्हणजे लाजवाब. आता ती टेकडी आणि तो पूल दोन्ही इतिहासजमा झाले. मग त्या टपरीची काय कथा! ती टपरी अशी टेकडीच्या कडेला होती. त्यामुळे एकाबाजूने पाहिलं तर खाली मुंबई- बेंगलोर हायवे अस्ताव्यस्त पडलेला दिसायचा आणि पलीकडे कोथरूड.. तिथे अफलातून कॉफी आणि मसाला पाव मिळायचे.  थंडीच्या संध्याकाळी  धुक्याच्या रजईतून कोथरूड मधले लुकलुकणारे दिवे, हायवे वरून सतत धावणारे दिवे आणि हातात त्याची अफलातून कॉफी. सगळ्या अस्सल कोथरुडकरांच्या अभिमानाला धक्का बसेल.. (त्यासाठी आधीच माफी मागते.) पण 'दुर्गा'ची कॉफी त्याच्या जवळपास पण नाही. तो टपरीवाला पण माहोल बनावा म्हणून तो मागे जुनी, शांत हिंदी गाणी लावायचा... मला आठवतंय मी आणि माझा नवरा ते हायवे साईडच टेबल मिळावं म्हणून एकदा कॉफी साठी पाऊण तास थांबलॊ होतो.  ☺️

                   अशाच एका उप्पीटाची चव, सहा वर्ष होऊन गेली, जिभेवर रेंगाळतेय. त्यावेळी मी गरोदर होते. सकाळी लवकर डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती त्यामुळे सकाळी काही करून जाण जमलं नाही. डॉक्टरांच्या इथे खूप वेळ लागला आणि घरी येईपर्यंत मला चांगलीच भूक लागली. घरात जे खाण्याचं होतं ते मला खावंसं वाटत नव्हत. मला काहीतरी गरम गरम खावंसं वाटत होतं, पण करायची इच्छा नव्हती. असा वाटत होत कि कुणीतरी मायेने करून घालावं. पण मायेचं असं त्यावेळी जवळ कुणी नव्हतं. भूक लागलेली, घरात जे आहे ते खायला नको वाटणं, गरम गरम कुणीतरी खायला करून आयतं तयार द्यावं असं वाटणं किती ते moods .. आता 'त्यात काय एव्हडं' म्हणून हसू येतंय. पण मला आठवतंय त्या वेळी खूप भरून आलं होतं. मग डबडबलेले डोळ्यांनी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला. आणि तिला जवळ जवळ ऑर्डर च दिली. "मी आत्ता तुझ्या घरी येतेय. मला काहीतरी गरम गरम खायला हवंय." तिलाही फोनवरून माझी अवस्था लक्षात आली असावी. माझ्या घरून तिच्या घरी जाईपर्यंत, फक्त पाच मिनिटात तिने उप्पीट तयार ठेवलं होतं. तिच्या घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या प्लेट भरून उप्पीट हातात. त्या दिवशीच्या त्या उप्पीटाला स्वर्गीय चव होती. त्याच्या आधी आणि नंतर पण मी कितीतरी वेळेला उप्पीट बनवलं, त्याच मैत्रिणीच्या घरी पण खाल्लं . पण 'तेंव्हा' सारख नाहीच.
                 'खाण्यासाठी जगावं कि जगण्यासाठी खावं' असल्या वादात पडण्यापेक्षा conveniently स्थळ आणि काळाप्रमाणे आपण पार्टी बदलत राहावी.. फक्त खाण्यासाठीच हा😄
Ahhaha,  sundar , Aai Baba chya athavanitil lekh wachun mazya dolyat pani cha ale .. Sarika Tai ani Hemangini Tai 🙏🙏
😀best! ते पार्टी बदलायच धोरण आवडलं बुवा!
मस्तच!!!  खाण्यासाठी जन्म आपुला ह्या मालिकेतील सर्व लेख वाचताना आईची खूप आठवण आली. कदाचित आपण लहान असताना एवढी ओढ तिच्याबद्दल जाणवली नसेल पण तिच्यापासून जरा दूर आल्यावर पदोपदी तिची आठवण येते. माझी आई अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर राहते. कोरोनाच्या काळात मला फारसे तिच्याकडे जाता नाही आले, पण जरा परिस्थिती निवळल्यावर निवांत २-३ दिवस गेले होते, तर आई-दादांना अत्यानंद झाला.दादा म्हणाले तिला जे खायचे आहे तेच बनव.तर आईने मला विचारले कि काय करु जेवायला,तर मी म्हणाले,अगं आई मला उडदाच्या डाळीचं घुटं (बर्याच जणांकडे वेगळा शब्द वापरत असतील), बाजरीची भाकरी आणि झणझणीत ठेचा खायचा आहे. तर ते ऐकून दोघे खूप हसले. मी म्हणाले , आमच्याकडे हा प्रकार माहितच नाही कोणाला. आईने केलेल्या बाजरीच्या भाकरी आणि घुट्यावर मी तुटून पडले होते.ते पाहून दोघेही तृप्त झाले.☺️
आईने शिकवलेल्या सर्व पदार्थांना तिच्या हातची चव यावी म्हणून वरचेवर फोनवर रेसिपी मागवत असते. अगदी माझा नवरा , दोन्ही मूलं त्यांच्या आवडीच्या पदार्थांची फर्माइश करत असतात.😊
वा! मस्त...
😃😃 खरयं..
खरं आहे.
कैक पिढ्यांपासून जी कामाची वाटणी झाली आहे, तिचा पगडा मनावर असतोच. स्वयंपाक हे मुलींचं काम समजलं जातं, त्यामुळे मुलीला स्वयंपाक करता येतो, यात कोणाला विशेष काही वाटत नाही. एखाद्या मुलाला स्वयंपाक करता येत असेल, तर त्याचं विशेष कौतुक होतं. एखाद्या मुलीला स्वयंपाक येत नसेल तर तिला नावं ठेवली जातात. पण मुलाला स्वयंपाक येत नसेल तर कोणाला त्याचं विशेष काही वाटत नाही.
याउलट घराबाहेरची कामं मुलांची समजली जातात. मुलगा एकटा परदेशप्रवासाला गेला, तर त्यात काय एवढं? पण मुलगी गेली तर 'एकटी परदेशात जाऊन आली' म्हणून तिचं कौतुक होतं (किंवा काही वेळा नाकं मुरडली जातात).
मस्त!
Kharay... आधी मला असं वाटायचं की घरातील मुलाने भाजी चांगली केली की त्याचं लगेच कौतुक होत...आपण तर सततच स्वयंपाक करत असतो..मग एक दिवस जाणीव झाली की मी एखाद्या वेळेला सातारा, कोल्हापूर पर्यंत गाडी drive केली की लगेच माझं कौतुक होत...घरातले पुरुष तर हे एरवीच सहज करत असतात...🤗🤗...fair and square😀
पुढच्या आठवड्यासाठी ज्यांना विषय सुचवायची इच्छा आहे, त्यांनी कृपया मला वैयक्तिक संदेश पाठवा. 🙏🏻
प्रत्येकाला असं वाटतंय का, की दुसरं कोणीतरी पाठवेल? म्हणून कोणीच पाठवत नाहीये? एकापेक्षा जास्त लोकांनी संदेश पाठवला तरी चालणार आहे. त्यांना त्यापुढच्या आठवड्यात संधी मिळेल.
तर,
'खाण्यासाठी जन्म आपुला' या विषयाच्या 'खमंग' यशानंतर पुढच्या आठवड्यासाठीचा विषय देणार आहेत, रेवती गोखले!
तर विषय आहे - समाधान
आत्तापर्यंत जेवढं लेखन केलंय, तेवढ्यावरच समाधान मानायचं नाहीये बरं का!
'दिसामाजी काहीतरी ते लिहावे' असं समर्थांनी सांगून ठेवलं आहेच.
अस्वस्थतेच्या कडेलोटावरचा इराण-https://www.loksatta.com/chaturang/iran-movement-regarding-women-rights-mahsa-amini-moral-police-amy-95-3327460/?utm_source=whatsapp_web&utm_medium=social&utm_campaign=socialsharebuttons
आजचा माझा चतुरंग मधला लेख 👆
परिस्थिती खूपच अवघड आहे तिथे. अजूनही 12व्या शतकात असल्यासारखी.
It was good enough till 70s
Did you get chance to meet Maral?
Yes. मी तिच्यावर तीन वर्षांपूर्वी दिवाळी अंकात लेख लिहिला होता. तेव्हा आम्ही भेटलो होतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा