लेबल

रविवार, ११ डिसेंबर, २०२२

'खाण्यासाठी जन्म आपला'

 'खाण्यासाठी जन्म आपला' हे ऐकल्यावर मला आमचे अमृतसरचे दिवस आठवले. आर्मी मधील नोकरीमुळे गेली पंधरा वर्षे खूप वेगवेगळे प्रदेश पाहत आलोय आणि तिथल्या लोकांनी, संस्कृतींनी आमचं जीवन खूप समृद्ध केलंय.

अमृतसर म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते सुवर्ण मंदिर ! सुवर्णमंदिरामध्ये मिळणारा 'कडा प्रसाद' आणि लंगर का खाना
एकदम डीव्हाईन!

पंजाबी आणि मुख्यत: सरदार कुटुंबीय खाण्यापिण्याचे खूप शौकीन! पंजाबी खाद्य संस्कृती ही पंजाब पुरती मर्यादित नसून जगभरात लोकप्रिय आहे.

पंजाबी लोकांच्या दिवसाची सुरुवातच मुळी दमदार..
मोठ्ठा पितळी ग्लास भरून लस्सी (मलई मारके) आणि हा थाळी एवढा मोठा गरमागरम पराठा (मक्खन मारके)..
आलू, गोभी, मूली, पनीर रोज अशा वेगवेगळ्या मिश्रणाचे तव्यावरून पानात वाढलेले गरम, खुसखुशीत पराठे दिवसभरासाठीची ऊर्जा देतात.

असा भरपेट नाश्ता झाला तरी दोन -अडीचच्या सुमारास पोटात कावळे ओरडू लागतातच..  मग ही मंडळी राजमा चावल,कढी चावल असे सोपे सुटसुटीत जेवण पसंत करतात.
आणि रोटी-शोटी खाण्याचा विचार असेल तर आलू गोभी, आलू मेथी, जीरा आलू,( बटाट्यावर विशेष प्रेम आहे पंजाबी लोकांचे) गाजर मटर, पालक पनीर, पनीर पसंदा, चना मसाला, मशरूम मटर,आलू वडी ( सांडग्याचा प्रकार), बैंगन भरता, न्यूट्री खिमा अशा काही ठराविक भाज्या करतात.
जेवणात पापड, सॅलड, आचार आणि छांछ नक्की..

जेवण झाले की काहीतरी गोड हवेच!
ऋतुमानाप्रमाणे गोडाचे विविध पदार्थ घरी तयार असतात. उन्हाळ्यामध्ये चावल की खीर, फिरनी, कुल्फी इत्यादी आणि थंडीमध्ये मूंग का हलवा, गाजर का हलवा, पंजिरी के लड्डू असे काही बाही..

दुपारी थोडा निवांतपणा असला की दाण्याची चिक्की, भाजलेल्या शेंगा या सोबत करतात.

चार वाजता 'फक्त' चहा घेतला तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं ह्यांना.. म्हणून चहाबरोबर वर्णी लागते ती पंजाबी मठ्ठी आणि आम का आचार यांची..

संध्याकाळी बाजारात फिरताना आलू टिक्की, सतरंगी गोल गप्पे खाल्ल्याशिवाय घरी जायचं नाही असा शिरस्ता ह्यांचा..
कधीतरी बदल म्हणून पनीर पकोडे, आलू प्याज के पकोडे , मूंग दाल के पकोडे आहेतच आणि घाई गडबडीत असाल तर कोपऱ्यावरच्या ठेलेवाल्याकडून घ्यायचा 'राम लड्डू'..

रात्री जेवायला काय करायचं असा प्रश्न पंजाबी लोकांना क्वचितच पडत असावा..
चिकन तंदुरी ह्यांचा वीक पॉईंट, चिकन टिक्का, पनीर टिक्का, तंदुरी फिश, सोया चाप अशा काही पदार्थांनी रात्रीच्या जेवणाची सुरुवात होते.
सरसों का साग आणि मक्के दी रोटी, दाल मखनी, कुल्चे छोले, बटर चिकन हे यांचे विशेष आवडते खाद्यप्रकार..
जेवण झाल्यावर पाय मोकळे करायला बाहेर पडलो की पान आणि कढईत आटवलेले गरम दूध प्यायचे म्हणजे दिवसाची सांगता यथायोग्य झाली असे वाटते.

असं अहोरात्र खाऊन पिऊन आपला जन्म सार्थकी लावणारे पंजाबी लोक एकमेवाद्वितीय असेच!

सुखदा आठल्ये
१.१२. २०२२
पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा