पदार्थोद्भव विनोद!! तडका मारके सांगावेत!!
"वहिनी, काय मस्त झालंय हो धिरडं!! मला सांगा ना रेसिपी." माझ्या काकूला पाहुण्या बाईंनी विचारलं.
"त्याचं असं आहे वाहिनी, आदले दिवशी पासून तयारी करावी लागते. म्हणजे खूप जास्त आमटी करायची. उरली तर फ्रीज मध्ये ठेवायला विसरायचं. मग सकाळी जरा उंबरठ्यापर्यंत गेली असं जाणवलं की कुरकुरीत धिरड्याचा नाश्ता नक्की मिळतो.त्यामुळे आमटी जास्त आहे अशी शंका आली की धिरड्यांपासून सावध रहा असे आम्ही म्हणतो.", माझ्या काकांनी तत्परतेने सांगितलं आणि एकच हशा पिकला.
असेच एकदा कुठल्याश्या मुंजीत बरेच पदार्थ उरले. भाजी,पोळी,कोशिंबीर इत्यादी सर्व मिक्सरला लावून त्यात उरलेला भात आणि भाजणी घालून मळले आणि भाजणीचे वडे सकाळच्या उरलेल्या चटणी बरोबर भराभर खपले.अर्थात हा सर्व आतबट्ट्याचा व्यवहार! त्यामुळे "असे वडे कध्धीच खाल्ले नाही बुवा" असं पाहुणे मंडळी म्हणत असताना विजयी बायकांच्या चर्या रहस्यमय स्मितहास्याने उजळून निघत होत्या. आणि आमटी भाजीचे तेल असल्याने वेगळे मोहनही घालावे लागले नाही!
अशाच कडक झालेल्या रव्याच्या लाडूंना खलबत्त्यात कुटून मिक्सरला फिरवून त्यावर उकळलेले दूध ओतून झालेल्या सांज्याच्या पोळ्या पुन्हा कधी 'तश्शाच्या तश्शा' बनवता आल्या नाहीत. बेसनाच्या वडीचा कड कच्चा राहिला की मोहनथाळ म्हणायचे आणि कडक झाला की हीच सांज्याच्या पोळ्यांची रेसिपी....थोडक्यात काय झाकली मूठ सव्वा लाखाची!
माझी दुसरी एक काकू उकडीचा मोदक नीट वळायला जमला नाही की कुणाचं लक्ष नाहीसं बघून स्वतः कच्चाच खाऊन टाकायची. एकदा पकडली गेली आणि २१ मोदकांचा न लागलेला हिशोब सुटला.
असेच एकदा मी चुकून salted बटर घेऊन लाडूसाठी रवा भाजला होता. नंतर उपमा करावा लागला. रवा तसा जास्त होता त्यामुळे लाडू नको पण उपमा आवर म्हणायची वेळ आली.😀
एकदा केक मधे बेकिंग पावडर,सोडा घालायचा राहिला. केकच्या पाटवड्या जरा खमंग भाजल्या. तसा चवीला वाईट नाहीये असं म्हणत मीच खायचे आणि बाकीचे लोक नाईलाजाने हो तसा ठीकच आहे असं म्हणत दबके हसू लपवायचे. कुणी मैत्रीण आली तर कसा खपावता येईल त्याचे प्लॅन व्हायचे. 😀
एका मित्राने भाजणी समजून उडदाच्या डांगराचे थालीपीठ लावले. 🙃हाताला पीठ इतके चिकटत होते की विचारू नका. पानावर बसल्यावर सगळे म्हणत की थालीपीठ नेहमीसारखे लागत नाही. त्याची आई घरी आल्यावर एवढे डांगर कसे संपले म्हणाली तेव्हा सगळा उलगडा झाला!
परदेशात नवशिक्या मित्राने चण्याच्या पिठल्यात कांदा आणि टोमॅटो केचअप घातले होते. त्याचे सर्व उत्तर भारतीय मित्र कांदा आणि टोमॅटो केचअप च्या gravy मध्ये सर्व भाज्या बनवायचे ना! मी ते पिठले कसे खाल्ले असेल हे तुम्ही कल्पना करून पहा.
पण तरी बिघडलेल्या पदार्थातून निर्मिती आणि विनोद निर्मिती खासच! कधी हे नवे खाऊ 'खावे लागतात' तर कधी खायला मिळतात,अलभ्य लाभ होतो. आज्जी म्हणायची ते आठवतं, "खाऊन माजावे टाकून माजू नये". वाया न घालवण्याची भारतीय संस्कृतीची समज या विनोदांच्या निमित्ताने पुढे सरकत रहाते.
दुसऱ्या भाषेत मेनूकार्ड वर येणाऱ्या पदार्थातून निवड करतानाही फार गमती होतात.
असे माझे दोन भाऊ घरच्या पोळी भाजीला कंटाळून, एकदा काहीसं विचित्र विदेशी नाव असलेल्या रेस्टॉरंट मध्ये गेले. पदार्थांचे दर बघून त्यांनी दोनच डिश शेअर करायचे ठरवले. एकूण वर्णन वाचून main course मधली एक डिश आणि एक सूप मागवले. main डिश ची quantity इतकी कमी होती की बोटं चाटत बसावे लागले आणि veg lung fung म्हणून मागवलेले सूप चक्क भाज्या घातलेले कुळथाचे पिठले निघाले. पाचशेच्या वर बिल देऊन कुळथाचे पिठले खाऊन आले!!(ही ९५ सालातली गोष्ट आहे. तेव्हा google नव्हते)
दुसऱ्या एका प्रसंगात कोकणातल्या घरी खूप दूध होते. काकू आज्जीने प्रेमाने श्रीखंड बनवले.मे महिन्यात ठाण्याहून काका आले होते. त्यांच्या बरोबर ठाणेकर मंडळींसाठी श्रीखंडाचा डबा भरून दिला. त्यावेळी फक्त दिवसाची बस असायची. काका सकाळी बसमध्ये बसले. श्रीखंड आदले दिवशी केलेले. त्या काळी घरी फ्रिज नसल्याने काहीसे सकाळीच आंबट झाले असणार. एक वाजून गेला. इतर प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत डब्यावर बांधलेले कापड सरकले. आणि दोन
अडीचच्या सुमारास आत गॅस पकडून झाकण ताडकन उडाले आणि कुणाच्या तोंडावर तर कुणाच्या कपड्यांवर, बॅगांवर गाडीभर श्रीखंडच श्रीखंड!! पुढची काही वर्षे ही श्रीखंड कथा आम्हा सर्वांचे मनोरंजन करत राहिली! काकू आजीचे श्रीखंड सर्वांच्या मुखी लागले ते असे
लेबल
- 01.कथा (5)
- 02.नाट्य छटा (1)
- 03.कविता रसग्रहण (5)
- 04.ट्रेक (8)
- 05.प्रवासवर्णन (21)
- 06.भजन (1)
- 07.भक्ती गीत (1)
- 08.कविता (52)
- 09.लेख (60)
- 10.खाद्य भ्रमंती (8)
- 11.पुस्तकपरिचय (4)
- 12.चित्रपट परीक्षण (1)
- 13.व्यक्तिचित्र (2)
- 14.अनुभूती (1)
- 15.चारोळ्या (2)
- 16.नाटिका (3)
- अजय घाणेकर (2)
- अथर्व बिवलकर (1)
- अदिती जोगळेकर-हर्डीकर (2)
- अभिजीत कारेकर (1)
- अर्चना खिस्ती-गोरकर (11)
- आसावरी गोखले (12)
- ऋचा देव (6)
- कल्याणी बोरकर (4)
- किर्ती पांडव (2)
- केयूर कानडे (1)
- कौस्तुभ सांभारे (2)
- गिरीश खोडके (1)
- ज्योती नेरकर (1)
- डॉ योजना चिराग (3)
- धनश्री केयूर कानडे (5)
- पालक अभिव्यक्ती नियोजन गट (1)
- मिलिंद फडके (9)
- रुपाली सागडे कुलकर्णी (7)
- रेवती गोखले (4)
- वंदना बोकील-कुलकर्णी (1)
- शलाका मेहता (1)
- सचिन चव्हाण (1)
- सुखदा आठल्ये (1)
- सौ . शिल्पा जरे (1)
- सौ. सारिका दत्तात्रय बिवलकर (6)
- सौ. सारिका नितिन कुडले (1)
- सौ.चन्नम्मा सगणे (2)
- स्मिता श्रीपाद (28)
- स्वरूपा कुलकर्णी शहापुरकर (9)
- हर्षाली वाघोले (5)
- हेमा हर्षाली (1)
- हेमांगिनी जावडेकर-पुराणिक (3)
- ज्ञानेश्वर नेरकर (1)
रविवार, ११ डिसेंबर, २०२२
पदार्थोद्भव विनोद
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा