नववर्ष
दाटे मनी आनंद
होई नाविन्याचा स्पर्श
नव्या आशा घेऊन
बघ आले नववर्ष
शुभेच्छा सारे देती
होवो उन्नती, उत्कर्ष
भरभराटीचे जावो
आपणास नववर्ष
वर्ष नवीन ते येते
जेव्हा जुने ते सरते
पृथ्वी सूर्याभोवती
तशी रोजच फिरते
अपुल्या सोयीसाठी
वेळ बांधली दिस-मासात
परी आयुष्य असते
फक्त' चालत्या श्वासात
सूर्य तोचं तो उगवे
आणि पडे तेच चांदणे
मग का बरे नव्याने
होई संकल्प मांडणे?
उन सावल्याही येती
आणि परतुनी जाती
आज का वाटे ह्या दिशा
माझ्यासाठी गाती?
रूप नवीन लेवून
बघ आयुष्य हे उभे
तुज पुसे प्रेमाने
सांग तुज काय हवे?
जुन्या वरीसाचा
ओलांडता उंबरा
लेखा-जोख द्यावा
थोडा आपण आपुला
कटू आठवाना
द्यावा पूर्णविराम'
अधुऱ्या स्वप्नांना
थोडा स्वल्पविराम
पान उलटावे नवे
खूण जुनी ती जपत
भिडावे नव्या वर्षा
अनुभवाने शिकत
थांबून न्याहाळावा
मागचा प्रवास
मनमोकळाच घ्यावा
क्षणभर श्वास
निश्चयाने निघावे मग
पुढल्या प्रवासा
उन्नत होण्याचा
मनी घेउनिया वसा
-कल्याणी बोरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा