लेबल

रविवार, १९ मार्च, २०२३

संक्रात

 संक्रात


संक्रमण करण्या पुढच्या राशीत सूर्य बदली प्रांत

गोड बोला संदेश देत आली मकर संक्रांत 


झोंबणारे थंड वारे आता कुठे थोडे होतील शांत

नभी दिसेल सूर्य आज खूप दिवसांनी निवांत


शेतगड्याच्या कष्टाचा कबुल होईल आता नवस

जीवापर जपलेल्या पिकाच्या कापणीचे आले दिवस


शुभ्र पांढरा तो हलवा अन वस्त्रे शोभतील काळी

सख्या-मैत्रिणी जमतील साऱ्या कुंकुम लावण्या भाळी


तिळगुळ सांगे देता-घेता आजपासूनी बोला गोड

मुखातल्या शब्दांना मनीच्या ओलाव्याची असू  दे जोड


वरवरचे गोड बोलणे तर कसे कुठेही  मिळते

तीळ सांगतो  मायेच्या उबेनेच खरे नाते जुळते


देखणे होईल आज आकाश जसे उडू लागतील पतंग

उडताना ते राखतील भान की मांजाचा सुटू नये संग


सण संक्रांतीचा घेउनी आला सोबत बदलाचे वारे

म्हणे ह्या जागी बदलच निश्चित नका विचारू का रे?


नियम बदलाचा नाकारुनी जो उगा करी आक्रांत

आज ना उद्या निश्चित आहे त्याच्यावरील संक्रांत   

                                                         

- कल्याणी बोरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा