सांजवेळी
जशी जशी उन्हं उतरणीला लागते, तस तसे मनात विचारांचे काहूर माजते. विचार हे आपल्या मनातील च विचार, काय म्हणावे यांना....
ओजस्वी शांतपणे काम करत होती. एकदम तिची नजर या मोगऱ्याच्या फुलांवर पडली. क्षणभर ती काम करायची थांबली. किती तरी वेळ तंद्री लागल्या सारखी एकटक त्या फुलांकडे ती पाहत होती. त्यातली काही काल उमलली होती तर बरीचशी आज उमलयाच्या तयारीत होती. डोअर बेल वाजली आणि ती भानावर आली. ओंकार आला होता. सकाळपासून दोघांमध्ये अबोला होता त्यामुळे अर्थातच घरात शांतता होती.... तिला बाहेर जायचे होते आणि त्याला लोळत पडायचे होते. कारण तसे शुल्लकच होते. पण बोलता बोलता कधी भांडण झाले कळलेच नाही. "दोन वर्ष झाली आता लग्नाला अजुन याला माझ्या मनातले कळत नाही. काय म्हणू?" "कधीतरी माझे ऐकावे, जरा स्वतः बोलावे, पण नाहीच"ओजूच्या मनात असंख्य विचार सुरू झाले. विचारांमध्येच तिने ओंकारसाठी आणि स्वतःसाठी चहा केला. चहा कपमध्ये ओतला. त्याला नेऊन दिला. त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिले. ही निर्विकार चेहऱ्याने चहा ठेवून परत आली. " काय सुरू आहे हिचे सकाळपासून, जरा म्हणून ऐकून घेत नाही मला कंटाळा आला होता, पण तरीही हिचे सुरूच जाऊयात, जाऊयात".... "काय हे जरा समजून घे. शनिवार,रविवरच तर मिळतो. पण हिला काही नाहीच त्याचे" इकडे अर्थातच ओंकारचे विचार सुरू होते.
माझी प्रत्येक गोष्ट ऐकणारा हा ओंकार आता मला काय हवे हे समजूनच घेत नाही. असा कसा बदलला हा? लग्नाआधी आणि आता लग्न झाल्यानंतरही किती खुश ठेवायचा मला. सतत आपले तुला काय हवे सांग आपण हे करू ते करू.... आणि आता हे ही नको आणि ते ही नको... काय सुरू आहे मलाच समजत नाहीये. विचार करता करताच ओजस्वीने चहा संपवला. स्वयंपाक घरात जाऊन संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागली. आठवडाभर आधीच ठरल्या प्रमाणे आज छोलेपुरीचा बेत करायचा तिने ठरवला होता. ओंकरला आवडतो म्हणून...
साहेबांचे प्रमोशन जे झाले होते. पण सेलिब्रेशन करायला त्याला वेळ मिळाला ना तिला..
म्हणून कालच तिने आठवणीने छोले भिजत घातले होते. तिची लगबग सुरू खाली.
इकडे ओंकार विचार करतच चहा घेत होता. अशी काय ही.. सगळ्याच गोष्टी हिला हव्या तशाच तर करत आलो. मग आत्ता मला नाही जायचे बाहेर म्हणालो तर किती चिडली. सकाळ पासून बोलतच नाहीये. लग्नाआधी म्हणलो चल जाऊ फिरायला तर नको म्हणायची कोणी बघेल, काय म्हणेल नकोच. लग्नानंतर पण अरे घरी काम आहे उद्या हे परवा हे आणि आज मी नाही म्हणालो तर... जरा चिडचिड करतच चहा संपवला त्याने. कप समोर टेबल वर ठेवला. पण क्षणभर त्याला वाटले नको इथे ठेवायला... जाऊन आता सिंकमध्ये नेऊन ठेवावा. नाही तर परत ओरडा खावा लागेल. मग हळूच उठून स्वयंपाक घराच्या दारात आला. आता डोकावून पाहिले तर ती पीठ मळत होती. मग आता जाऊन त्याने कप सिंक मध्ये ठेवला. तिरक्या नजरेने तिला पाहिले. ती कामात मग्न होती. मग तोही बाहेर येऊन टीव्ही पाहत बसला.
खरे तर आज पहिल्यांदाच त्यांच्यात भांडणं म्हणजे अशीच नोकझोक झाली होती. आज ते दोघेही त्यांच्या मतावर अडून बसले होते. माघार कोण घेणार ना....
थोड्या वेळाने एक सुगंध येऊन दरवळला त्याने हलकेच श्वास घेतला..... अरे ही नक्की काय बनवते आहे. हम्म कसला मस्त सुवास आहे. पण विचारू कसा....
अडली गाडी....
हळूच उठून त्याने स्वयंपाक घरात डोकावून पाहिले.. आणि त्याच्या चेहरा एकदम खुलला.. व्वा ही तर छोटे करते आहे. oh i just love chole😋 पण ही तर चिडली आहे मग माझ्या आवडीचा मेनू का करते आहे? त्याला प्रश्न पडायला लागले.... काहीच समजेना...
पण मनात एक विचार डोकावला आणि आवाज न करता तो गाडीची किल्ली आणि त्याचे पाकीट,मोबाईल घेऊन घराबाहेर पडला...
बराच वेळ झाला याचा काही आवाज येत नाही म्हणून हिने बाहेर डोकावून पाहिले पण याची चाहूल लागेना. मग बाहेर हॉल मध्ये, आता रूम मध्ये पाहिले पण हा कुठेच नाही... गेला कुठे ओंकार? माझ्यावर एवढा चिडला की न सांगताच निघून गेला.... झाले ओजस्वी ने रडायला सुरुवात केली.. मग काही सुचेना..समजेना...
आधी रूम मध्ये पळत गेली आणि ओंकारला फोन लावला. पण महाराज गाडी चालवत होते त्यामुळे फोन आल्याचे समजले नाही त्याला. इकडे ओजास्वीची हालत खराब व्ह्यायाला लागली. काही समजेना... मग तिने रडतच आईला फोन लावला. आईने तिसऱ्या रिंग लाच फोन उचलला.. " बोला ओजू राणी काढा आहात? आईची आठवण का आली माझ्या राणीला आज...?"
इकडे आईग म्हणून हिने रडायला सुरुवात केली... आईला काही समजेना " ओजु काय झाले ग का रडते आहेस? सांग मला काय झाले... मग ओजूने सगळे आईला सांगितले... आईने शांतपणे सगळे ऐकून घेतले. क्षणभर मनात हसू आले पण ते आईने अवरले. बरं बरं असे झाले का... अगं ठीक आहे नवराबायको च्या नात्यात असे होत असते. आज पहिल्यांदाच असे झाले म्हणून... पण एक सांगू गोष्टी एकमेकांशी शेअर करा... बोलण्याने बऱ्याच गोष्टी पटपट समजतात आणि त्यावर सोल्युशन निघते. आपले म्हणणे वेगळे असते आणि समोरच्याला वेगळे वाटते. हेच उलटेही होऊ शकते. कितीही राग आला मतभेद झाले तरी. गोष्टी बोलून गैरसमज दूर करता येतात.. त्यामुळे एकमेकांशी बोला. अजुन एक.. ओजुने विचारले आता काय ग..."अगं सगळ्या गोष्टी आईसोबत. शेअर कर पण आधी ओंकार सोबत बोल मग वाटले तर माझ्याशी बोल... कारण आपला लाईफ पार्टनर आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. भलेही रुसवे फुगवे असावे... त्याने आयुष्यात गोडी वाढते पण तो सगळ्यात आधी महत्वाचा मग बाकी सगळे.....
आईने सांगितलेले ओजस्वीला मनोमन पटले.
एकट्याने विचार करण्या पेक्षा गोष्टी दोघांनी सोडवल्या तर लगेचच सुटतात...
एकदा या सगळ्या बाबत अनभिज्ञ आपले ओंकरराव गाडी पार्क करून घराकडे निघाले... हातातली पिशवी नीट सांभाळून हा निघाला. पिशवीत त्याने आणलेले तिचे फेवरेट मँगो आइस्क्रीम आणि तिला आवडतात ती मोगऱ्याची फुले.
स्वतः जवळच्या किल्लीने त्याने दार उघडले आणि समोर पाहतच राहिला... हलक्या गुलाबी रंगाच्या साडीत ओजस्वी त्याच्या स्वागताला उभी होती. सकाळी काही झाले होते याचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता. क्षणभर तिच्यात गुंग झालेल्या ओंकारला तिच्या हाकेने भानवर आणले.... त्यानेही हलके हसून तिला जवळ घेतले आणि वेडी म्हणून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. सकाळ पासून मनात साठलेले सगळे मळभ दूर झाले होते. सांजवेळी उमलेल्या मोगाऱ्याने वातावरण एकदम मनमोहक केले होते.
©kkdhanashree
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा