जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
|| जय गणेश||
तिची खास मैत्रीण तिला आज आ वासून बघतच राहिली
नेहमी गबाळी राहणारी ही, आज सुटसुटीत छान आवरून आली
गबाळी असली तरी चेहऱ्यावर मात्र कायम हसू
दोघींना माहित होते की आत लपलेत किती आसू
क्षणभर थोडा गोंधळ उडाला, लगेच विचारायला जावं काय
अरे पण हिच्या चालीत सुद्धा फरक पडलाय, नक्की घडलंय तरी काय
कधी नव्हे ते आज सगळेच तिच्याशी बोलत होते
आज काय खास ह्याची विचारपूस करत होते
शेवटी एकदाची त्यांची गळाभेट झाली
नजरेनेच विचारलं तेव्हा गुपित असं काही नाही म्हणाली
एक क्षण मैत्रीण तिची तिला हरखून पाहत होती
नजर कोणाची लागू नये म्हणून तिला काळी तीट लावत होती
दोघींच्याही नजरे नजरेत चालला होता हा खेळ
हळूच विचारले परत तिला कसा वजा केलास हा न्यूनगंडाचा मेळ
उसासा टाकत म्हणाली की ओझं दिवसेंदिवस वाढत होत
मी काहीच करत नाही, ह्याने मन खात होत
रोजची ती घरची काम अन् घड्याळाशी स्पर्धा
मेटाकुटीला येऊन जीव होऊन जायचा अगदी अर्धा
दुसऱ्यांना सीमोल्लंघन करताना बघून मी मनापासून दाद द्यायची
आपण मात्र कधी एकदा परत डबक्यात जातोय ह्याची घाई व्हायची
असं असताना काल अचानक ती भेटली
मी काय चुका करते ह्याची जाणीव झाली
अगदी माझ्यासारखीच होती पण आनंदाने रसरसलेली
प्रत्येक काम करताना चैतन्याने न्हायलेली
मला जवळ घेत म्हणाली की काम हे काम असतं
कोणी घरी तर कोणी बाहेर जग शोधत असतं
काही फरक नाही फक्त बघण्याचा चष्मा बदल
बाहेर नाही तर आतमध्ये स्वतःकडे लक्ष घाल
जे करशील त्याला मनापासून आनंद दे
पण त्याबदल्यात त्याच्याकडून समाधानच दान घे
सुरुवात तर कर सखे, बघ किती सुंदर दिसशील तू
कोणी कितीही रडवण्याचा प्रयत्न केला तरी सदा हसशील तू
मनाला भावला, भिडला अगदी प्रत्येक शब्द
त्या क्षणापासून सुरुवात केली अन् झाले मी कटिबद्ध
बाकी काही खास नाही.. हाच माझा वृत्तान्त
आता सदा गुंफायचे भावनांचे नवे रेशीम बंध
दोघींच्या डोळ्यात आता फक्त आनंदाश्रू तरळले
एकमेकींच्या मनातले दोघींनाही उमगले
मी ही, तू ती कशाला हवाय हा दुरावा
मैत्री जगायला फक्त नितळ मन हाच एक दुआ
ठरलं तर मग असं म्हणत दोघींनी एकमेकींना आलिंगन दिलं
हा वसा कधीच सोडायचा नाही असं काही न बोलताच ठरवलं
© हर्षाली वाघोले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा