मनातली शाळा - आठवणींचा खजिना
"आई, मला सोडून लगेच निघून नाही जायचं बरका.
माझी बस सुटेल तेव्हा तू मला टाटा करायला थांबायचं "
माझी लेक मला आग्रह करत होती.डिसेंबर मधली प्रसन्न सकाळ होती ती. फील्ड ट्रीप साठी माझ्या मुलीला मी शाळेत सोडायला गेले होते. अतिशय उत्फुल्ल दिसणारे चेहेरे, चिवचिवाट करणारे पोरं पोरी, इतरवेळी सकाळी उठायला त्रास देणारी पण ट्रीप आहे म्हणून उत्साहानं शाळेत उड्या मारत चाललेली चिल्ली पिल्ली , आईने डब्यात काय खाऊ दिलाय ते लाडक्या मैत्रिणीला हळूच कानात सांगणारी एखादी चिमुकली, मुलांना सूचना देणाऱ्या आया, शाळेच्या ग्राउंडवर स्पोर्ट्स इव्हेंट ची तयारी करणारी मुलं असं सगळं मस्त चित्र शाळेच्या पटांगणावर तयार झालं होतं.
हे सगळं लोभस दृश्य समोर दिसत असतानाच अचानक जोरदार ढोल आणि पाठोपाठ लेझीम चा आवाज कानावर आला. अंगावर शहारे आणि पाठोपाठ डोळ्यातुन टचकन पाणी आलं. नक्की काय भावना मनात आली ते कळलंच नाही.का मोठे झालो आपण ? किती व्यापात अडकवून घेतलंय स्वतः ला ? तिथल्या मुलांच्या चेहेऱ्यावर दिसणारा निर्व्याज आनंद परत कधी अनुभवायला मिळेल ? थेट 20-25 वर्ष मागे, माझ्या शाळेत मन कधी पोचलं कळलंच नाही.
माझी शाळा, कराड मधली स्व. रा. की. लाहोटी कन्या प्रशाला असं आगगाडी सारखं लांबलचक नाव असलेली. इंग्रजी C आकाराची इमारत आणि चौथ्या बाजूला भली भक्कम उंच कंपाउंड ची भिंत. शाळेत जायचा दरवाजा पण मोठा उंच लोखंडी. सकाळी 12:30 च्या ठोक्याला बंद म्हणजे बंद . तुमची शाळा म्हणजे जेल आहे असं चिडवायचे सगळे जण आम्हाला. पण हे जेल आम्हाला अतिशय म्हणजे अतिशय प्राणप्रिय होतं.
वर वर कठोर वाटणाऱ्या पण आतून अत्यंत प्रेमळ अशा आमच्या मुख्याध्यापिका जोगळेकर बाई अजूनही तशाच डोळ्यासमोर दिसतात.आम्हा सगळ्या पोरींवर त्यांचं बारीक लक्ष असायचं.पाचवी ते दहावी चे वर्ग ,प्रत्येकी 4 तुकड्या आणि प्रत्येक वर्गात साधारण 50 ते 60 मुली असा सगळा मिळून शाळेचा पसारा.
जुन मधे शाळा सुरु झाल्यापासुन पुढे वर्षभर अभ्यासासोबत अनेक उपक्रम शाळेत चालु व्हायचे.नव्या कोऱ्या वह्या पुस्तकांचा वास, रेनकोट, छ्त्री चं अप्रुप संपतय तोवर यायच्या त्या निवडणुका. प्रत्येक वर्गाची आणि शाळेची मुख्य आणि उपप्रतिनिधी निवडली जायची. मग पहिली घटक चाचणी आणि पाठोपाठ गणेशोत्सव येउन ठेपायचा. कन्या शाळा असल्यामुळे आमच्या शाळेत गणेशोत्सव तर नसायचा पण ३ दिवसाचा शारदोत्सव दिमाखात साजरा व्हायचा. त्याची तयारी गणपती पासुनच सुरु व्हायची. विविध स्पर्धा, शारदास्तवन, आरत्या ई ची तयारी सुरु व्हायची. रोज शाळा सुटल्यावर चित्रकला शिक्षकांच्या मदतीने सजावटीची तयारी सुरु व्हायची. पताका बनवणे, त्या वर्षीच्या थीम नुसार कट आउट्स करणे, रंगवणे ई कामांना वेग यायचा.
प्रतिष्ठापनेच्या दिवशी शारदेची स्थापना करायला सकाळी लवकर शाळेत पोचायचं. आई चा टाचलेला ब्लाउज आणि साडी नेसुन सगळ्या पोरी नटुन थटुन शाळेत यायचो. प्रतिष्ठापना, पुजा आणि मग दिवसभर स्पर्धा असा भरगच्च कार्यक्रम पार पडायचा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपापल्या आयांना घेउन शाळेत हळदी कुंकु कार्यक्रमाला जायचो. नौवारी आणि नाकात नथ अशा वेशातल्या आमच्या सगळ्या बाई अजुनही आठवतात.शारदोत्सवानंतर पाठोपाठ यायच्या त्या सहामाही परीक्षा आणि मग दिवाळी सुट्टी.
सुट्टीनंतर शाळा सुरु झाली की क्रीडासप्ताहाचे वेध लागायचे. वेगवेगळ्या वैयक्तीक आणि सांघिक स्पर्धा सुरु व्हायच्या. खो-खो च्या स्पर्धा सगळ्यात जास्त भाव खाउन होत्या. आपल्या वर्गाची खो-खो ची टीम सर्वोत्तमच असली पाहिजे अशा जिद्दिने मुली सराव करायच्या. रोज मधल्या सुट्टी नंतर खोखो चे सामने रंगायचे. मधल्या सुट्टीची बेल झाली रे झाली की पीटी उषा च्या वेगाशी स्पर्धा करत पोरी वर्गाच्या बाहेर पळायच्या. खोखो बघण्यासाठी मोक्याची जागा पकडायला. कोण आधी पोचलं यावरुन खडाजंगी पण व्हायची. एकदा का आपली आणि आपल्या गॅन्ग ची जागा धरली की मग झटपट डबा खाउन सामना बघायला तयार. "जी डबल ओ डी - गुड गुड गुड", " लाडी लाडी लाडी लाडी आहा आहा", आवाज कुणाचा", "गेली गेली गेली" अशा आरोळ्या नी मैदान दुमदुमुन गेलेलं असायचं. खोखो चा अंतिम सामना जिंकणं हा अतिशय अभिमानाचा क्षण आणि प्रत्येकीचं स्वप्न असायचं.
एके वर्षी केवळ एका गुणाने आमचा वर्ग अंतिम सामना हरला. आमची शेवटची भिडु आउट नसताना सरांनी तिला आउट दिलं आणि "९वी ड" ला जिंकवुन दिलं यावर आमच्या वर्गाचं एकमत झालं होतं. सर ९वी ड चे वर्गशिक्षक होते त्यामुळे सरांनी पर्शालिटी केलेली आहे असा निष्कर्ष काढुन आम्ही मोकळ्या झालो आणि हा अन्याय सहन करायचा नाही असं एकमतानं ठरलं. दुसर्या दिवशी आम्ही वर्गात फळ्यावर खो-खो चं ग्राउंड, प्रत्येक खेळाडुची पोझिशन, आमची शेवटची भिडु कुठे होती आणि ती कशी आउट नव्हती हे दाखवणारी चित्रं असं सगळं काढलं. आज एकही तास होउ द्यायचा नाही, बंड करायचं असं ठरवलं. ज्या बाई वर्गात येतील त्यांना आरडाओरडा करुन आमचंच कसं बरोबर होतं, आम्हीच कसे विनर होतो हे पटवुन द्यायला सुरुवात केली. पहिले ३ तास असेच गेले. आम्हाला वाटलं की आपल्या बंडाचा परीणाम होणार आणि काहितरी क्रांतीकारक निर्णय यावेळी होणार म्हणुन.अखेर आमच्या उपमुख्याध्यापिका बाई चौथ्या तासाला वर्गात आल्या. एव्हाना आमच्या सगळ्या करामती त्यांच्यापर्यंत पोचल्या होत्या. आल्या आल्या त्यांनी शांत पण ठाम शब्दात आम्हाला गप्प बसायला सांगितले. त्यांचा करारी आवाज ऐकुन निम्म्या वर्गाचं अवसान गळालं. त्यांनी शांतपणे पुढे जाउन संपुर्ण फळा पुसला आणि जिथे सुविचार लिहायची जागा असते तिथे लिहिलं "आयुष्यात यश मिळतं तसं अपयश पण मिळतं. ते स्वीकारायला शिका." पुढचा १/२ तास त्या जे बोलल्या ते आम्ही कधीही विसरणार नाही. चुक कोणाची होती कोणाची नव्हती ते महत्वाचं नाही. सामन्याचा निकाल एकदा लागला की लागला. खिलाडुवृत्तीने पराभव कसा मान्य करायचा ते त्यांनी शिकवलं.कळत नकळत शाळा आपल्यावर किती संस्कार करत असते ते असे प्रसंग आठवले की आज लक्षात येतं.
संक्रांतीच्या गोडव्याने सुरु झालेला जानेवारी महिना वर्षिक स्नेहसंम्मेलनाच्या सरावामुळे अजुन गोड व्हायचा. संगीत, नृत्य, नाट्य असे सगळे कलाप्रकार शाळेने शिकवले.
अभ्यास करत करत गॅदरिंग ची प्रॅक्टीस पण चालु असायची.आणि ऐन गॅदरिंग च्या दिवशी शाळेत एखाद्या लग्नघरासारखी धावपळ असायची. सगळ्या मुलींचा मेकअप, साड्या नेसवणे ई बाईच करुन द्यायच्या. मुलं बनवण्यासाठी खोट्या मिशा काढलेल्या आणि तरीही लिपस्टीक आणि गालाला गोल आकारात रुज लावलेल्या आम्ही सगळ्या पोरी एकमेकींना बघुन खी खी हसायचो पण स्वत: चा अवतार पण असाच आहे हे नंतर काढलेल्या फोटोतुन कळायचं.
वर्षभर शाळेत अनेक उपक्रम सतत चालुच असायचे. शिवाय त्यात आंतरशालेय स्पर्धांची भर पडायची. सगळ्या प्रकारच्या स्पर्धात आवर्जुन भाग घ्यायला शाळा खुपच प्रोत्साहन द्यायची त्यामुळे अभ्यास सोडुन ईतर कलाप्रकारात प्राविण्य मिळवण्यासाठी वेगळे क्लास लावायची कधी गरजच पडली नाही. रोज शाळेच्या पोर्च मधल्या फळ्यांवर सुविचार लिहिणे, ठळक बातम्या लिहिणे असे अनेक उपक्रम आम्ही शाळेत केले.त्यामुळे इतर वाचनाची अपोआप गोडी लागली.
आम्ही शाळेत असतानाच, आमच्या शाळेचा हीरकमोहोत्सव आणि संस्थेचा अमृतमोहोत्सव साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. त्यासाठीचे विषेश कार्यक्रम, वेगळी तयारी यामद्धे खुप मजा आली. भारताचा ५० वा स्वातंत्रदिन मध्यरात्री १२ वाजता आम्ही साजरा केला होता. त्याची आठवण अविस्मरणीय अशीच.संपुर्ण कराड शहरातील आमच्या संस्थेच्या सगळ्या शाळांनी १९९८ साली आलेला भारताचा ५० वा स्वातंत्रदिन रात्री १२ वाजता तहसिलदार कचेरी येथे साजरा करायचे ठरवले होते. त्या आधी रात्री १० ते १२ या वेळेत कराड शहरातील मुख्य रस्त्यांवरुन फेरी काढली होती. हातात भारताच झेंडा घेउन आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व करत पुर्ण कराड शहरात घोषणा देत फिरताना अंगावर रोमांच उठत होते.बरोबर १२ ला ५ मिनिट कमी असताना आम्ही सर्व शाळांची मुले आणि शिक्षक तहसिलदार कचेरी जवळ पोचलो.१२ च्या ठोक्याला त्या वेळच्या कलेक्टरनी आपला तिरंगा फडकवला आणि हजारो मुलांनी आणि नागरीकांनी एकसुरात गायलेले राष्ट्रगीत मी आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही.असे अनेक सुंदर क्षण आणि आठवणी शाळेने दिल्या आहेत.ईयत्ता ५ वी ते १० वी ही शाळेतली ६ वर्षे हा आमच्यासाठी आनंदसोहळा होता.
शाळेने शिक्षणासोबतच अनेक सुंदर अनुभव आणि जीव लावणार्या घट्ट मैत्रिणीही दिल्या. शाळेची ही वर्षी म्हणजे आयुष्यातली सोनेरी पाने ज्याच्या नुसत्या आठवणीनेच चेहेर्यावर हसु उमलते.
त्या दिवशी शाळेच्या ग्राउंडवर ऐकलेल्या ढोल आणि लेझिम चा हात धरुन मी २०-२५ वर्ष मागे जाउन माझ्या शाळेत फिरुन आले. समोरुन रांग करुन बस च्या दिशेने येणार्या पोरींमधे दोन वेण्या घाललेली माझी मीच मला दिसायला लागले. नकळत ओठावर हसु उमटलं.
" बाय....आई बाय...बाय आई..." पोरांच्या आवाजाने माझी तंद्री मोडली.
टाटा करण्यार्या त्या सगळ्या घोळक्यात माझ्याकडे बघुन जोरजोरात हातवारे करणारी माझी लेक मला दिसली. आजुबाजुला बघितलं तर बाकीच्या आया पण आपापल्या पोरांकडे बघुन टाटा करत होत्या. पोरं आणि आया दोघांच्या चेहेर्यावर तेच निर्व्याज हसु उमललं होतं. आपण का मोठे झालो असे मघाशी मनात आलेले दु:खी विचार आता पळुन गेले होते. मोठे झालो आणि कामाच्या व्यापात अडकलो तरी आपल्या पोरांच्या निमित्ताने आपण पुन्हा शाळा जगत असतो. शाळा आपल्यातुन कधीच जात नाही. ती एक वर्तुळ पूर्ण करत असते. आपल्याला शाळेत शिकायचे राहिलेले धडे देत असते.
मी सुद्धा उत्साहाने लेकीला टाटा केला.
तिच्या चेहेर्यावरचा आनंद माझ्या चेहेर्यावर पण पसरला...तसाच...निर्व्याज...
-©️स्मिता श्रीपाद कुलकर्णी,पुणे
( स्मिता नागेश कुलकर्णी, 1998-99 बॅच)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा