ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पालक - किल्ले भ्रमंती
2023.04.02
प्रवासवर्णन - ट्रेक: मोरगिरी
नाणेघाट चावंड नंतर पुढचा ट्रेक कुठे ह्या प्रश्नाचं उत्तर सचिन
नी आधीच शोधून ठेवलं होतं - झुंज नावाच्या संस्थेनी आयोजलेल्या मोरगिरी किल्ल्याची
सफर! Youtube च्या सहाय्याने मोरगिरी किल्ल्याचे काही vlogs बघितले आणि किल्ला बघण्याचा
आणि ते ही एखाद्या मुरलेल्या ट्रेकिंग समूहासोबतच हा निर्णय पक्का झाला. त्याचं कारण
होतं की वाटेतल्या दोन टप्प्यांवर दोराच्या सहाय्याने पुढे जावे लागते!
पुण्याहून अंदाजे साठ आणि लोणावळ्याहून अंदाजे वीस किलोमीटर
वर असलेला हा किल्ला फारसा गर्दी खेचत नाही. ह्याची मुख्य कारणे म्हणजे त्याबद्दलची
अनभिज्ञता आणि पोहोचावयास लागणारे कष्ट. मात्र आमच्यासाठी सुरुवातीला हेच किल्ल्याचे
दोन USP होते :-)
रविवारी २ एप्रिल २०२३ ला भल्या पहाटे पाच वाजता, वयोगट ८ ते
५५ मधील आम्ही २५ जणं बस मध्ये बसून निघालो. ज्ञानप्रबोधिनी पालक गट ह्यांचं प्रतिनिधित्व
सचिन, मृणालिनी आणि मी असे तिघेजण करत होतो. पहिल्या काही मिनिटांच्या औपचारिकतेनंतर
सगळी मंडळी (ड्राइवर वगळता!) झोपेची थकबाकी वसूल करण्यात मग्न झाली. चांदणी चौक, भूगाव,
पिरंगुट, घोटावडे फाटा एकामागोमाग एक ओलांडले जात होते आणि पौड च्या थोडं अलीकडे बस
ने उजवीकडचा रस्ता धरला. तासाभरात जसं उजाडायला लागलं तसं तिकोना, तुंग हे किल्ले आणि
त्यांना विभागणारं पवना धरणाचं पाणी दिसायला लागलं. त्या अल्हाददायक वातावरणात आपण
किती भाग्यवान आहोत ह्याची जाणीव झाली!
सगळी मंडळी आता जागी झाली होती आणि दिसणारा प्रत्येक डोंगरमाथा
'हा मोरगिरी आहे का?' असं विचारून झुंज च्या कार्यकर्त्यांना भेडसावू लागली :-) त्यांचं
सुदैव की अजून थोड्या काही वेळातच, अंदाजे ७ वाजता, आम्ही गंतव्य स्थानी पोहोचलो. जवन-तुंगी
रस्त्याच्या एका कडेला बस पार्क केली गेली आणि मग ओळख परेड, नाश्ता, ट्रेक च्या सूचना,
घोषणा ह्या अनुक्रमाने मार्गस्थ होत ट्रेक ची सुरुवात झाली. सुरुवातीला अर्धा तास जंगलातला
चढ, नंतर पाऊण तास पठारावरून वाटचाल आणि मग डाव्या दिशेनी दीड तास खडी चढाई असं ह्या
ट्रेक चं ढोबळ वेळापत्रक आहे.
पहिल्या टप्प्यात सकाळ आणि दाट झाडींमुळे उन्हाचा अजिबात त्रास
झाला नाही. पक्ष्यांचा किलबिलाट आणि सुरुवातीचा उत्साह ह्यामुळे हा टप्पा लगेच साध्य
झाला.
पठारावर पोहोचताच समोर कोरीगड चं दर्शन झालं. L आकारातील विस्तीर्ण
असं हे पठार रायरेश्वराच्या पठाराइतकेच, किंबहुना त्याहून मोठे असावे. ह्या पठारावर
सैनिकतळ उभारून सभोवतालच्या अनेक गडांच्या रक्षणासाठी गरजेनुसार कुमक पाठवण्यात येत
असावी असा कयास आहे. किल्लेपायथ्यास पाठ करून उभं राहिल्यास उजवीकडे दोन वाजता कोरीगड,
डावीकडे ११ वाजता तुंग आणि तिकोना आणि ९ वाजता लोहगड-विसापूर असे किल्ले दिसतात. मध्य
ठिकाणी असलेल्या ह्या पठाराचे लष्करी महत्व त्यामुळे लगेच पटते. अंदाजे पाऊण तास रमत-गमत
चालल्यावर आम्ही L आकाराच्या जॉईंट इथे पोहोचलो.
तिथून डावीकडे नजर फिरवली तर आसमंताला भिडणाऱ्या किल्ले मोरगिरीचा
माथा दिसला आणि 'आपल्याला हे प्रकरण जमेल का?' ह्या शंकेनी मनात घर करायला सुरुवात
केली. सुरुवातीला कार्वी च्या जंगलातला रस्ता दमवणारा जरी असला तरी थोडी सावली असल्याने
सुसह्य वाटला. जसं जसं मंडळी एका फळीत चढ चढू लागली तसं तसं इतका वेळ गप्पांच्या ध्वनींने
वेढलेले वातावरण शांत होऊ लागले. जो तो गुपचूप मान खाली घालून एक एक पाऊल लक्षपूर्वक
टाकत होता. बहुदा ह्याच वाटेवरून आपल्याला परत देखील यायचय ह्याचा विचार मनात घोळत
असेल.
साधारण ३० एक मिनटांनंतर आमची कूर्म गतीनी होणारी वाटचाल अजूनच
मंदावली - त्याचे कारण म्हणजे समोरचा अंदाजे ८ फुटी दोरीचा मार्ग! ह्या ठिकाणी डोंगरात
एका बाजूस अडकवलेली दोरी, सुट्ट्याबाजूने वापरावयाची होती. झुंज च्या कार्यकर्त्यांनी
ह्या दोरीचा वापर कसा करावा ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले खरे पण हिम्मत ही प्रत्येकाने
स्वतःची स्वतः दाखवायची होती. पाय ठेवण्यास सपाट जागा नसल्याने ह्या ठिकाणी दोरीवर
आपले अख्खे वजन टाकत आणि हाताने स्वतःला पुढे ओढत हा दगड चढून पार करायचा होता. चढताना
तरी ठीक पण उतरताना थोडे rappelling करावे लागेल हा विचार पुढे परतेपर्यंत भेडसावत
राहिला.
हे अंतर हळू हळू आम्ही सगळे पार करतो तोच समोर अंदाजे अजून एक
६ फुटी दोरीचा दुसरा मार्ग आड आला आणि त्यापलीकडे एक ८ फुटी लोखंडी शिडी चा मार्ग खुणावत
होता. डोंगराची भिंत, लगत जेम तेम एक व्यक्ती उभी राहील एवढी जागा, आणि त्यापुढे दरी
अश्या बिकट वाटेवर ही अधिकची दोन आव्हाने खरं तर बहुतेकांना गर्भगळीत करण्यास पुरेशी
होती. मात्र झुंज च्या कार्यकर्त्यांनी इथे सगळ्यांची खूप "हौसला-अफजाई"
आणि मदत केली. स्वर्गारोहण करणाऱ्या पांडवांची गोष्ट का कुणास ठाऊक - पण ह्या वेळी
माझ्या मनात येऊन गेली.
वाढत्या उन्हात आमची मिरवणूक संथ गतीने का होईना पण एकदाची ११
च्या सुमारास किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचली! स्वतःच्या 'मला-जमेल-का' ह्या शंकांवर
एक मोठ्ठा विजय मिळवल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागला :-)
किल्ल्याचा माथा हा शंभर एक माणसांना सामावून घेईल इतका मोठा
आहे. आज दोन पाण्याच्या टाक्या आणि एका ध्वजस्तंभाव्यतिरिक्त काही शिल्लक नसणाऱ्या
ह्या जागेने कधी काळी सुगीचे दिवस अनुभवले असतील नक्कीच. बेधुंद वाऱ्यावर फडकणाऱ्या
भगव्याच्या सान्निध्यात काही काळ बसून मग सगळ्यांनी सभोवतालच्या दृश्यांना नजरेत आणि
कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. श्रम-परिहार म्हणून सुका मेवा, चिक्की, फळं इत्यादी
ह्यांची देवाण-घेवाण झाली. अर्ध्या तासानंतर मंडळी ताजी-तवानी होऊन परतीच्या वाटेस
लागली.
'बऱ्याच वेळेला trekking करताना चढापेक्षा उतारावर खरी कसोटी
लागते' ह्या सिद्धांताचा प्रत्यय सगळ्यांनाच आला. शिडी, दोऱ्यांचे मार्ग जीव मुठीत
घेऊन पार केल्यावर पुढचा पठारापर्यंतचा उतारावरील प्रवास सोप्पा असेल हा विचार कल्पना
विलास ठरला. ठिसूळ मातीच्या त्या वाटेवरून जाताना घसरू नये म्हणून बहुतांशी मंडळींनी हा प्रवास बसत-बसत धुळीचे लोट उडवत आणि
उन्हाचे चटके खात पार केला. त्याक्षणी त्रास झाला खरा पण आता मागे वळून बघताना हा अनुभव
चिर-स्मरणीय ठरला आहे!
एकदा चे ते पठार लागले आणि मग सगळ्यांना हुरूप आला. भरभर पावलं
टाकत आल्या वाटेनी आम्ही सुरुवात केली त्या ठिकाणी पोहोचलो. मग रस्त्यापलीकडे एका खानावळीत
छान जेवण झालं - ज्वारीची भाकरी, पिठलं, आमटी, भात, खर्डा, कांदा आणि ताक! पोटभर जेवल्यावर
आलेला क्षीण निघून गेला आणि तुंग किल्ला देखील आत्ताच बघून घेऊ अशी चर्चा सुरु झाली.
बहुदा थंड गार मसाले ताकाचा तो अम्मल असावा :-)
पुढे ५ मिनिटांच्या डुलकीचे अर्ध्यातासाच्या शांत निद्रेत रूपांतर
झाले आणि संध्याकाळी ४ च्या सुमारास आमची बस पुण्याला परतायला निघाली. येताना आलेल्या
वाटेवरुन परत ना जाता, लोणावळ्याहून एक्सप्रेसवे मार्गे जावे असं ठरलं. लोणावळ्याला
जाताना परतीचा रस्ता हवाई दल आणि नौदल ह्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवरून जातो हे ध्यानी
आलं.
गम्मत म्हणजे वीस एक वर्षांपूर्वी माझ्या चुलत आणि आत्तेभावाबरोबर
मी लोणावळ्याला सायकलिंग साठी गेलो असताना ह्या प्रशिक्षण केंद्रांपर्यंत आलो होतो.
वादळी हवामानामुळे पुढे न जाता आम्ही तिथूनच परतलो. तेव्हापासून मनात एक प्रश्न होता
की तो एकांतातला निवांत रस्ता पुढे कुठे बरं जातो? २ एप्रिल २०२३ रोजी त्याचा उलगडा
झाला!
लेखक: अजय घाणेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा