ज्ञान प्रबोधिनी प्रशाला पालक - किल्ले भ्रमंती
2023.02.25 प्रवासवर्णन - ट्रेक: नाणेघाट आणि प्रसन्नगड
एरवी कधीही कुठल्याही मागणीला बारकाईने scrutinize
केल्याशिवाय निर्वाळा न देणारे बाबा, "येत्या शनिवारी आम्ही सगळे खरे काकांबरोबर overnight trek ला जाऊ का?" ह्या विनंती अर्जावर त्वरित "हो" म्हणाले आणि त्या उपर "चल तुला hunter shoes घेऊ" अशी offer ही दिली.
सातवीतला तो क्षण म्हणजे माझ्यासाठी 'इतिहास के पन्नो में सुवर्णअक्षरो से लिखा गया पल' झाला. अर्थात,त्याचं पूर्ण श्रेय जातं खरे काकांना. काल्पनिक हरी तात्यांप्रमाणे, खरे काकांनी खरोखरच आमच्या कॉलनी मधील बाल-गोपाळांना इतिहास प्रेम आणि दुर्ग-भ्रमंती ची आवड ह्या दोन अमूल्य भेटी दिल्या आहेत.
काल JPP पालक मित्रांबरोबर नाणेघाट च्या गुहेत बसलो असताना,
बत्तीस वर्षांपूर्वी खरे काकांबरोबर केलेला पहिला ट्रेक आणि त्यावेळच्या अनेक आठवणी डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. आटलेल्या धबधब्यातून पानाच्या साहाय्याने भरलेली पाण्याची बाटली, शेकोटी भोवती कोंडाळा करून ऐकलेल्या सातवाहन आणि शिव कालीन साहस-कथा, अंधारातील काजव्यांची आणि ताऱ्यांची लकलक - एक ना दोन, अश्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
JPP
पालकांचं आमचं त्रिकुट (गिरीश, सचिन आणि मी) शनिवारी 25 Feb 2023 रोजी पहाटे 5:30 वाजता पुण्याहून निघालो आणि अंदाजे तीन तासात नारायणगाव – जुन्नर
- घाटघर मार्गे नाणेघाटाच्या खिंडी पाशी पोहोचलो. काही वर्षांपूर्वी 'पर्यटकांच्या सोयीसाठी' एक डाम्बरी रस्ता थेट खिंडी पर्यंत बनवला असल्याने 'य' गर्दी असेल अशी धाकधूक मनात बाळगून आम्ही तिथे पोहोचलो आणि बघतो तर सगळा परिसर रिकामा!
लवकरची वेळ अथवा सुरु असलेल्या शालेय परीक्षांचं सत्र ह्यामुळे आम्हाला खूप निवांतरित्या तेथील गुहा, दगडी रांजण, नानाचा अंगठा आणि सभोवतालचा परिसर बघता आला. नानाचा अंगठ्या वरून दिसणारे दृश्य - समोर पसरलेला अफाट कोकण प्रदेश, त्यावर पहारा ठेवणाऱ्या उत्तुंग आणि मैलोनमैल एकसंध अश्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा - हे सगळं बघितलं आणि मन तृप्त झालं. भरभरून वाहणारा वारा सूर्यदेवाच्या प्रकोपाला शांत करत होता. 15-20
मिनिटं वरती फिरून झाल्यावर, आम्ही पठारावर परतलो आणि 'फर्स्ट-क्लास' कांदे पोहे आणि चहा ह्यांची न्याहारी करून पुढच्या प्रवासास लागलो.
शिवनेरी किल्ल्यावर जावं असं originally प्लॅन केलं असताना, आयत्या वेळेस चावंड / प्रसन्नगड हा किल्ला बघावा असं ठरलं. In hindsight,
ह्या बदललेल्या itinerary साठी स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी असा मोह झाला :-)
प्रसन्नगड हा किल्ला नाणेघाटाच्या खिंडीपासून जुन्नर च्या दिशेने जाताना साधारण 10 km अंतरावर
आहे. सातवाहन काळात नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर गस्त ठेवण्यासाठी वापरला जाणारा हा किल्ला, पुढे मुघलांच्या काळात कारागृह-रुपी वापरण्यात आला.
पायथ्याहून किल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वारा पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल ह्या आमच्या चौकशीला तेथील गावकऱ्यांनी ‘अर्धा तास’ असं उत्तर दिलं होतं. कुणास ठाऊक, पण त्या उत्तरा-आड "तुम्ही? तुम्ही 'healthy' लोकं किल्ल्यावर जाणार?" असा व्यक्त न केलेला विचार त्यांच्या मनाला शिवून गेला
असावा, असं मला वाटलं. त्याक्षणी पक्क ठरवलं - काहीही झालं तरी आम्हाला चढायला अर्धा तास लागू देणार नाही... आणि ठरवल्याप्रमाणे करून दाखवलं!
पाऊण तासानंतर (अर्धा नाही!) आम्ही वरच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. ह्या अधिकच्या 15 मिनिटांचं खापर एका ठराविक patch मधील निमुळत्या आणि उंचच-उंच असलेल्या पायऱ्यांच्या माथी मारून, अपराध-मुक्त मनाने आमचा पुढील प्रवास सुरु झाला :-)
किल्ल्यावरचा विस्तार बऱ्यापैकी मोठा आहे. पूर्ण फिरणार होतो पण वाढतं ऊन, खूप सारे चढ-उतार, माणसाच्या उंची इतके वाढलेले गवत आणि परतीची वाट धरण्याचा 1 PM चा cut-off
ह्या सगळ्यांचा विचार करता - एक शिवकालीन तोफ, एक भंगलेला वाडा आणि मंदिर, दोन पाण्याचे कुंड आणि अवती-भवतीच्या पर्वत रांगा डोळ्यात साठवून आम्ही परतीला निघालो. किल्ला उतरल्यावर परंपरेनुसार लिंबू सरबताचे सेवन झाले आणि ताजे-तवाने होऊन मंडळींची पुण्य-नगरीच्या दिशेनी बढती झाली.
नशीब थोर की चाकण च्या सिग्नल ला jam लागला नाही आणि तीन तासात पुणे गाठता आले. अर्ध्या दिवसाचं
हे outing खूप छान आठवणी देऊन गेलं. दोन दिवस हाती असतील तेव्हा पुन्हा एकवार ह्या ठिकाणी यावे आणि त्या खेपेस शिवनेरी,
हडसर आणि जीवधन हे किल्लेही सर करावे अशी खूणगाठ मनाशी बांधून ह्या ट्रेक ची सांगता झाली.
ता.क.
परतत असताना गिरीश ने गाडीतला radio 'on' केला. "ये जीवन हैं, इस जीवन का, यही हैं, यही हैं रंगरूप" ह्या गाण्याचे बोल कानावर पडले आणि आपली Gavaskar-style गोल टोपी सांभाळत खरे काकांचं ह्या गाण्याचं rendition आठवलं.
“Thank you
खरे काका...for everything!”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा