लेबल

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

कविता रसग्रहण


 कवितांच्या बाबतीत अनेक  आठवणी आहेत.एक जरा वेगळी.

बारावीत असेन.शिक्षक दिन जवळ आला होता.इंग्रजीचा  तास माझ्या वाट्याला येईल असं वाटत होतं.मीही तशी मनाची तयारी केली होती.काय शिकवायला सोपं जाईल,याचा विचार करत होते.

एक दिवस मधल्या सुट्टीत स्टाफरुममधून बोलावणं आलं.मराठीच्या मॅडमनी आदेश सोडला,'तू मराठीचा तास घ्यायचा'.म्हटलं,'ठीक आहे.मराठी काय,झोपेतून उठवूनही काही बोलायला सांगितलं तरी आपण तयार'.पाठ्यपुस्तकातले धडे ज्या पुस्तकांतून घेतले होते,ती मूळ पुस्तकेच वाचून काढल्यामुळे अडचण काहीच नव्हती.पण खरी गंमत पुढे होती.मॅडम म्हणाल्या,'तू प्रेमाचा गुलकंद कविता शिकवायची!'

'आँ!'मी बराच वेळ आ करुन पाहतच राहिले.मॅडम गालातल्या गालात मंद स्मित करत होत्या.माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता.'सही सुना तुने.'त्यांचे मिस्कील डोळे सांगत होते.

'काय मॅडम?'मी विचारलं.मॅडमची काहीतरी चूक झाली असावी,असं माझ्या भाबड्या मनाला वाटून गेलं.'अगं,५सप्टेंबरला तू 'प्रेमाचा गुलकंद'ही कविता शिकवायची.'

बाप रे!मॅडम खरंच बोलताहेत.

'पण मॅडम,मी दुसरं घेते ना.'मी कसाबसा धीर गोळा करत सांगण्याचा प्रयत्न केला.

' अंतू बर्वा,नाहीतर नटसम्राट घेते ना.'

'नाही!हीच कविता घ्यायची.'

मी मनातल्या मनात हादरुन गेले होते.'कविताच घ्यायची,तर मग ती दुसरी घेते.मी वाचलाय पूर्ण कवितासंग्रह.आणि मला आवडते ती कविता,चांगली शिकवता येईल,प्लीज मॅडम.'

काहीही न बोलता मॅडम मंद हसत फक्त डोकं नकारार्थी हलवत होत्या.आता मला रडू येईल कि काय असं वाटायला लागलं.

'मॅडम प्लीज,ही शिकवते ना.'मी वेगळ्या कविता आणि धड्यांची नावं सांगून त्यांचं मन वळवायचा प्रयत्न करत होते,पण त्या ठाम होत्या.

'नाही!हीच घ्यायची.जा आता वर्गात.'त्यांनी अगदी निर्वाणीचं सांगितलं.

मी मान खाली घालून वर्गात आले.समोर कोणते सर,काय शिकवताहेत,शेजारची मैत्रीण काय विचारतेय,कशाकशाकडं माझं लक्ष नव्हतं.मला फक्त चांगली फूटभर उंचीची काचेची बरणी घेऊन उभी असलेली 'ती', अवाक् होऊन पाहणारा 'तो',काहीही न शिकवता फळ्यासमोर उभी असलेली मी 

आणि माझ्याकडे बघून हसणारी वर्गातली मुलं दिसत होती.

    खेड्यातलं काॅलेज.सुमारे चोवीस पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ.मुलं आणि मुली एकमेकांशी बोलत नसत.त्यात आमचं परंपरा जपणारं कुटुंब.कडक शिस्तीचे,आदर्शवादी वडील.सातच्या आत नव्हे, शाळेची वेळ सोडल्यास इतरवेळी घरातचा नियम!

मी आधीच भित्री.काॅलेजला मान वर करुन कधी मुलांकडे न पाहणारी मी!बोलायचा प्रश्नच नव्हता.मी 'प्रेमाचा गुलकंद' शिकवायची?काय करु?कसा मार्ग काढू?देवा,सोडव रे बाबा.

'आयडिया!'

मराठीच्या मॅडम स्टाफरुममध्ये नाही असं पाहून इंग्रजीच्या सरांना भेटले.जसं काय मराठीचं काही ठरलंच नाही.'सर,शिक्षक दिनाला... lesson घेते.चालेल ना?''हो,चालेल ना.तुला घ्यायचा तो घे.' मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटली.कित्ती गं बाई मी हुश्शार!चुटकीसरशी प्रश्न सोडवला.पटकन वर्गात पळून आले.अहाहा!कित्ती तो आनंद!नाचावंस वाटतं होतं.'पंछी बनू,उडती फिरुँ।...'बॅकग्राऊंडला वाजत होतं.काॅलेज सुटल्याची बेल झाली.मॅडमला न दिसता पळायच्या बेतात होते.

पण हाय रे कर्मा! स्टाफरुममधून बोलावणं आलं.गेले.वादळानंतरची पडझड दिसत होती.सर पेपरात डोकं खूपसून आणि मॅडम त्यांच्याकडे रागारागाने पाहत  होत्या.'मराठीचाच घ्यायचा.काय?'मी निमुट मान डोलावली आणि पाय ओढत निघाले.मघापासून 'काय गं?' 'काय गं?' विचारणार्‍या मैत्रिणींना सांगितलं.त्या काही न बोलता हसतच सुटल्या.एक मैत्रीण म्हणाली,'घे ना मग!त्यात काय एवढं?

''वाचलीय का तू कविता?''

 "हॅ!कविता आणि मी?मला नाही बाई आवडत."तिने मान उडवली.

"'आवडत नाही" नाही.कळत नाहीत तुला.वाच आधी.घे म्हणायला काय जातं तुझं.'

सारा गाव मैत्रिणींचा,एक नाही कामाची.नुसती चीडचीड होत होती.'घे आता.वर्गात उत्तरं द्यायची फार हौस ना तुला!कोणी सांगितलं होतं धड्याचे मागचेपुढचे संदर्भ वर्गात सांगायला,मॅडमच्या चुका काढायला?त्या नव्हत्या सांगत तर तुला का हौस?

गप्प आपापलं वाचायचं अन् आपल्यापुरतं ठेवायचं.

वाचनाची आवड,अमुक अन् तमुक.भोग आता.'

काय करावं?देवा!देवा!

जाऊ दे!उद्या गेल्यावर मॅडमला टिळकांच्या बाणेदारपणे सांगूनच टाकते,'नाही जमणार!'

अँ.. अँ...मॅडम ऐकणारच नाहीत.

'जाऊ दे!दांडीच मारते ५सप्टेंबरला.

'बरं वाटत नाही'म्हटलं कि घरचे ऐकतील.

पण ६सप्टेंबरचं काय?७,८,९....सप्टेंबर,आॅक्टोबर,.....मार्चपर्यंतचे बरेच दिवस होतात.अरे बाप रे!आख्खं वर्षं काढायचंय अजून.'

गणपतीपुढं हात जोडले,पाया पडले.त्याच्यापुढच्या वाटीतल्या गूळखोबर्‍याला हातसुद्धा लावला नाही.उपास करीन!पण यातून सोडव.रडायचीच बाकी होते.विचार करकरुन

डोक्याचा पार भुगा झाला.सगळी मजाच गेली आयुष्यातली.काॅलेजला जावसं वाटेना.कशातच लक्ष लागेना.काय करु?काही सुचेना.

आदल्या दिवशी सर्व विद्यार्थी शिक्षकांना स्टाफरुममध्ये बोलावून सूचना दिल्या गेल्या.मी फक्त हं हं करत राहिले.त्या रात्री झोपच येईना.पुस्तक उघडून कविता वाचून काढली.कोण बरं पुस्तक तयार करतं?हीच कशाला पुस्तकात टाकली?बाकीच्या एवढ्या कविता सोडून हिच्यावाचून काय अडलं होतं?बरं'परिटास,वगैरेपण आहेत ना 'झेंडूच्या फुलांत?'ती टाकली असती तर काय बिघडलं असतं?आमच्यासारख्या लहान(?)मुलांच्या पुस्तकात कशाला छापायची ती?दुसरी नाही घेता आली?

ना ना तर्‍हेचे विचार डोक्यात येऊन गेले.पण सुटकेचा मार्गच नव्हता.

     अखेर तो दिवस उजाडला.

कधी नाही इतक्या मनोभावे देवाला नमस्कार केला.सतत धावा चालूच होता.साडी नेसून काॅलेजला गेले.'अजिबात हसायचं नाही.'मैत्रिणींना दम देऊन ठेवला.टाईमटेबल पाहून ठेवलं.बारावीवर दुसरा तास!बरं झालं,पहिला नाही.बी पाॅझिटीव्ह!आपलाच वर्ग.

एक दोघी सोडल्या तर बाकीच्या सगळ्या आपल्याच मैत्रिणी.त्या बिचार्‍या हसणार नाहीत.होईल सगळं नीट.एवढं काय घाबरण्यासारखं?कविता वाचायची,कठीण शब्द फळ्यावर लिहायचे,अर्थ समजून सांगायचा,थोडेफार प्रश्न विचारायचे(नाहीतर विचारायचेच नाहीत)आणि संपेल लगेच तास.निघून यायचं बाहेर.काय त्यात मोठं?

  बेल झाली.पहिल्या तासावाले निघून गेले.बाकीचे मजेत बोलत होते.मी मात्र गप्प!पुढं उभं राहिल्यावर आपण सगळ्यांना दिसू. मुलं दिसतील.त्यांना मी दिसेन.ती ओरडतील?शिट्या मारतील?हसतील?काय करतील?देवा!देवा!विचार बंद करता येत नाहीत का?टण् टण् !संपला पहिला तास.धीर एकवटून,देवाचं नाव घेऊन वर्गात गेले.मुलांकडं पाहायचंच नाही.मुलींकडे पाहत शिकवायचं ठरवलं.

थोडी प्रस्तावना केली.आचार्य अत्रे,विडंबन काव्य,झेंडूची फुले,इ.इ.करत 'आज प्रेमाचा गुलकंद'कविता शिकणार आहोत,सांगून टाकलं.रितसर फळ्यावर शीर्षक लिहिलं.आणि सुरु... कवितेच्या दोन ओळी, त्यांचा अर्थ करत करत सगळी कविता समजावली.कठीण शब्द कोणाला अडले नाही तरी फळ्यावर लिहिले.शक्य तितका मख्खं चेहरा ठेऊन शिकवण्याचा प्रयत्न करत होते.रेखी आणि बंटी एकमेकींशी काहीतरी बोलत गालात हसत होत्या.त्यांच्यावर डोळे वटारले.

मुलांकडं बघण्याचं टाळत होते.एकदाची संपली.तरी वेळ शिल्लक होता.प्रश्न विचार!प्रश्न विचार!मैत्रिणी प्राॅम्पटींग करत होत्या.काहीतरी प्रश्न विचारला.एका मुलाने हात वर केला.पर्यायच नव्हता.म्हटलं, सांग बाबा!त्याने सांगितलं,त्यात काही चुका!आता परत समजावणं आलं.संपूर्ण वर्ग हास्याच्या अशा एका बिंदूवर येऊन थांबला होता कि कधीही बांध फुटेल.परत समजावून शेवटाकडे येता येता माझाच बांध फुटला.आणि मी गोळा केलेलं सगळं अवसान सोडून खो खो हसायला लागले.पुढच्याच सेकंदात सारा वर्ग खिदीखिदी करत हसत होता.तेवढ्यात बेल झाली.मी सटकले.पण हसू काही थांबत नव्हतं.

  हुश्श!संपलं एकदाचं!नंतर कितीतरी वेळ काय काय झालं,ते आठवून हसत होते.पुढचे कितीतरी दिवस हा गुलकंद आम्हाला पुरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा