कविता रसग्रहण -
कविता हा विषय म्हणजे माझ्या 'मर्मबांधतली ठेव. आपल्या लेखन गटावर हा विषय आल्यावर आता काही सुंदर कविता, त्यांचे रसग्रहण वाचायला मिळेल ह्या कल्पनेने खूप खूप आनंद झाला. आणि मग आपण कुठली कविता निवडावी हा विचार करताना खूप गोंधळायला झाले .... एक आवडती कविता...म्हणून कुठली निवडावी? बा. भ बोरकर, मर्ढेकर, ग्रेस, आरती प्रभू, विंदा, सुरेश भट किंवा अगदी आत्ता आत्ता चे संदीप खरे, कवी सौमित्र,चंद्रकांत गोखले ह्यांच्या अनेक, सुरेख, मनाला खूप भावलेल्या कविता भुरळ घालू लागल्या.... शेवटी मी दोन निकष ठरवले - मराठी साहित्यातले अजरामर नाव आणि सकारात्मक भाव. म्हणून कुसुमाग्रज ह्यांची 'विशाखा' ह्या काव्य संग्रहातील 'कोलंबसाचे गर्व गीत' ह्या कविते बद्दल थोडे लिहीत आहे. ही कविता समजायला सोपी, भावपूर्ण आणि वीरश्री जागवणारी आहे...तिचा अर्थ उलगडून दाखवावा अशी दुर्बोध तर मुळीच नाही... पण त्यातील आवडलेले काही विचार मी इथे मांडत आहे.
अनंत अडचणींवर मात करत, समुद्री मार्गाने प्रवास करून शोध लावणारा आपल्यासाठी परका असलेला 'कोलंबस' हा जरी ह्या कवितेचा नायक भासत असला तरी ह्या कवितेसाठी तो मानवजातीचं प्रतिक आहे. मनुष्याची अचाट महत्वाकांक्षा,ध्येयासक्ती, मनःशक्ती आणि जिद्द ह्यांचं - ही कविता म्हणजे जणू गौरव गान आहे. वेडी माणसंच इतिहास घडवतात...अनंत अडचणींवर मात करत स्वतःचा मार्ग शोधतात आणि इतरांना ही प्रवृत्त करतात- अश्या माणसांना कुठलीच संकटे थांबवू शकत नाहीत... कुसुमाग्रज म्हणतात - "मार्ग अमुचा रोखू शकती ना धन ना दारा, घराची वा वितभर कारा....' कोलंबस हा अश्या माणसांचे प्रतीक आहे. ह्याउलट ज्यांना काही आकांक्षा नाहीत, जीवनात काही अलौकिक, अचाट असे साध्य करण्याची मनीषा नाही अशी माणसे म्हणजे जीवन मृत्यूच्या रहाटगाडग्यात फिरणारे जीवाणू आणि पायाखाली तुडवली जाणारी कोट्यावधी गवताची पाती !!
ज्या सागराच्या लाटांवर शीड चढवून कोलंबस आगेकूच करत असेल...त्या विशाल सागराला पामर म्हणून कुसुमाग्रज तुच्छ लेखत आहेत का? अर्थातच नाही... मला वाटतं की माणसाचे मन हे त्या सागरापेखा विशाल, अथांग आणि खोल आहे हा कवितेचा भावार्थ आहे. त्या 'मनामध्ये' एकदा का कुठल्याही संकल्पाची ठिणगी पडली की मग - "तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची".... कारण केवळ क्षितिजा पर्यंतच पसरण्याची मुभा असलेल्या सागराला 'किनाऱ्याचे बंधन आहे....पण मानवी मन असे आहे की... त्याच्या खोली चा कोणाला थांग लागत नाही, त्याच्या अचाट कर्तृत्वाला आणि कल्पनाविलासाला कशाचेच बंधन नाही...कुठलीच लक्ष्मण रेषा नाही !!
संपूर्ण कवितेत exageration ह्या figure of speech ची मुक्त हस्ते उधळण आहे... आणि त्यासाठी वापरलेली सुंदर परखड भाषा विषयाला साजेशीच आहे .... यमक आणि मीटर समजायला थोडे कठीण आहे...पण ते समजावून घेत मोठ्याने आणि त्वेषाने हि कविता वाचली तर वीरश्रीचा अनुभव मिळतो आणि आंपल्या मनाच्या अमर्याद ताकदीची एक तीक्ष्ण जाणीव झाल्याशिवाय रहात नाही....
- रेवती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा