लेबल

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

हा चंद्र"

 कुसुमाग्रजांची "


हा चंद्र" अशी एक मस्त कविता आहे. आकाशातला चंद्र आणि कवी मनाचा चंद्र अशी गमतीशीर तुलना त्यात केलेली आहे.केवळ अंतरिक्षयानात बसून जाता येणाऱ्या त्या चंद्राचे आणि रसिकांच्या मनात राहणाऱ्या, निंबोणीच्या झाडामागे लपणाऱ्या, प्रेमिकांच्या मनातल्या या चंद्राशी काही नातं असूच शकत नाही असं ते म्हणतात. 

पण आज दूरदर्शन वर याची देही याची डोळा इतिहास घडताना बघायला मिळाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या मोहिमेचा अत्त्युच्च बिंदू पाहून हा क्षण पाहायला मिळाला याचा मनापासून आनंद झाला. कोण म्हणतं की केवळ कवी, संगीतकार, लेखक, कलाकारच रसिक असतात. गेली अनेक वर्षे, महिने अविरत अभ्यास करून, काम करून अलगद चंद्राला कवेत घेणारे शास्त्रज्ञ तितकेच रसिक म्हणायला हवेत.

त्यामुळे कुसुमाग्रजांची माफी मागून...


'या' चंद्राचे 'त्या' चंद्राशी 

कुठले नाते ?


साक्षी ठेवून या चंद्राला,

त्या चंद्रावर पोचायाचे 

स्वप्न नव्याने पाहता येते.


अथक प्रयत्नांच्या साथीने 

अवघड दुर्लभ मोहीम सुद्धा 

पूर्णत्वाला नेता येते.


शास्त्रज्ञांच्या त्या चंद्राला 

विज्ञानाची कास धरोनि,

कवेत अलगद घेता येते.


- ©️स्मिता श्रीपाद 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा