शिवजयंती – एका अनामिक गडाच्या नजरेतून
रामराम मंडळी , कसं काय ?
नुकतेच येताय ना, वरून मी व्यवस्थित बघत होतो तुम्ही गड चढत असताना. मध्येच वाटही चुकलात ना? पण, बरं झालं ना, अगदी वेळेवर मिळाली तुम्हाला मळलेली वाट. असो. जरा घाम टिपून घ्या, तळ्यातलं छान थंडगार पाणी पिऊन ताजेतवाने व्हा , थोडंफार खाऊन घ्या, मग बोलूच ..
पण काल , म्हणजे शिवजयंतीला दिसला नाहीत ते? तुम्ही पण कालच यायला हवे होतात की इथे.
काही हजार लोक काल होते इथे. मी म्हटलं, तुम्ही कुठे राहिलात?
अच्छा अच्छा, कळलं हो... तुमच्या परिसरातील शिवजयंती उत्सवात मग्न होतात ना? मग मजा आली की नाही तिथे? मोठ्ठाल्या कर्कश्श आवाजातील गाणी, लेझरचा चकमकाट, हॉर्नच्या किंकाळ्या असं सगळं नित्यानेमाने पार पाडून आज इथे आलात का? तुमच्या भाषेत ‘शास्त्र’ असतं ना ते !
पण खरं सांगू का? काल इथेही काही वेगळी परिस्थिती नव्हती. गेल्या काही वर्षांपासून सगळंच बदललं आहे. महाराजांच्या प्रमुख गडांपैकी कुठलाही गड घ्या, थोड्याफार फरकाने हेच दृश्य असतं.
मुद्दाम अगदी भगवे फेटे किंवा टोप्या काय, किंवा कपाळावर चंद्रकोरी काढण्याची हौस काय, स्पीकर्सची भिंत तर इतक्या उंचीवर सुद्धा असते. घोषणा तर काय म्हणता, नुसता ऊत. पण त्या घोषणा तरी शुद्ध स्वरात कुठे म्हणतात? फटाक्यांचा ठणाणा असतोच. पोलिसांशी हुज्जत घातली नाही तर तो हल्ली फाउल ठरतो म्हणे. पण का अट्टहास ह्या सगळ्याचा?
मला तर आताशा अगदी नको होतं. काही वर्षांपूर्वी गडावरची शिवजयंती छोट्या प्रमाणात असायची पण खूप हवीहवीशी वाटायची. मी त्या दिवसाची अगदी वर्षभर वाट बघत बसायचो आणि पुढे कित्येक दिवस त्या एका दिवसाच्या रम्य आठवणीत जायचे. तुमच्या भाषेत cherish the memories म्हणतात ना तसंच.. तेव्हा गोनीदा, बाबासाहेब वगैरे तुरळक मंडळी फक्त शिवजयंतीला येत असत, माझ्याच इथे राहणाऱ्या एका धनगर कुटुंबाबरोबर अगदी संधी शिवजयंती साजरी होत असे, तेव्हा किती प्रसन्न वाटे, ह्या दोघांची ती आविष्कारयुक्त भाषणे ऐकून अंगावर सरसरून काटा येई, आणि नकळतच मी सतराव्या शतकात जात असे.
पण आताशा असं काही होत नाही.
सर्वप्रथम तुम्ही लोकांनी शिवजयंती तिथीने का तारखेने ह्यावरून गोंधळ घातलात. तुम्ही, म्हणजे राजकारणी मंडळींनी किती कीस पाडला ना त्या एका विषयाचा? ह्यासगळ्यात आपण छत्रपतींना किती संकुचित करून ठेवलंय, ह्याचं भानच तुम्ही लोक विसरून गेला आहात. पण हा विषय जाऊ देत. त्याची कितीही चर्चा कमीच आहे , आणि ती चर्चा आपल्यात होऊन उपयोगाची नाही.
माझ्या शिवनेरीसारख्या भावांचा तर जीव अक्षरश: घुसमटून जातो. मुख्यमंत्री, इतर मंत्रीगण, त्यांचा प्रोटोकॉल, स्थानिक खासदार-आमदार, इतर गल्लीबोळातले सुरवंटासारखे वाढलेले दादा, भाई .. काय होत असेल शिवनेरीचं? मला तर कल्पना सुद्धा करवत नाही. तीच गत आमचा दादा, रायगडाची होते, कधी? राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी .. काय म्हणता? राजगड-तोरणा सुटलेत? छे, छे कुठल्या भ्रमात आहात ? त्यांनाही हे भोग सुटले नाहीयेत.
खरंतर मी असा नाराजीचा सूर का लावतोय, असं प्रश्न यायला हरकत नाही ना ?
आजच्या तरुण पिढीला माझ्याबद्दल ओढ वाटते, हे सुचिन्हच आहे, नाहीच मी हे नाकारत!!
पण त्याचवेळेस अश्या सोहळ्यांच्या नावाने आज माझी जी नासधूस होते, तिला कोण जबाबदार?
तुम्ही बघताच आहात, काल मस्तकी असलेल्या भगव्या टोप्यांची अवस्था बघताय ना, एका दिवसांत त्या जड झाल्या का? पायदळी तुडवल्या जाताहेत. सगळीकडे पसरलेला कचरा बघा की. तळ्यातले स्वच्छ पाणी गढूळ/दूषित कसं करावं हे तुम्हा लोकांकडून शिकावं. ज्या वास्तूंना प्रत्यक्ष छत्रपतींचा, जिजाऊंचा आणि कित्येक सरदारांचा, मावळ्यांचा स्पर्श झाला, त्यांची अवस्था आज बघताय ना? सोहळ्यापुरेसं सगळं चकचकीत ठेवलं की झालं. मग ये रे माझ्या मागल्या !!
कोण आहे ह्याला जबाबदार?
हल्ली फक्त हे ठराविक दोनतीन दिवसच असतात, की जेव्हा तरुणाई तलवारी आणि दांडपट्टे फिरवते. एरव्ही त्यांच्या हातात इथे फक्त दारूच्या बाटल्याच मला दिसतात.
किती दुर्दैव आहे की शिवजयंती किंवा राज्याभिषेक सोहळे ह्यादिवशी दिसणारी तरुणाई, ३१ डिसेंबर किंवा गटारी(??) सारखे दिवसही माझ्यासमोर इथेच “साजरे” करते आणि त्यात अभिमानही बाळगते. किती मोठी शोकांतिका आहे ही !! गडांवरची देवळे, गुहा, धान्याची आगारे इथे जे काही चालतं, ते सर्व बघून भयंकर चिडचीड होते. बरं हे सगळं करताना आपण छत्रपतींसारख्या दाढीमिश्या ठेवतो, त्यांच्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करतो पण त्यांच्यासारखे कणभरसुद्धा वागत नाही .
पूर्वी माझा एखादा चिरा निखळला, कुठल्या वाड्याची भिंत कोसळली तर लगेच त्याची पूर्ववत बांधणी होत असे, अगदी तुम्ही औषधपाणी करता तशीच माझी बडदास्त ठेवली जात असे. आज त्याच माझ्या चिऱ्यांवर नको नको ते लिहिलेलं मला बघवत नाही आणि हे सगळं मुकाट सहन करायला लागतंय.
शेवटी काय, तर पिकनिक हा एकच उद्देश ठेवूनच येतात ना . परंतु, ही कृतघ्नता नव्हे काय? काय अधिकार आहे त्यांना ?
पण त्याच वेळेस काही तरुण मंडळी माझ्या संवर्धनात सर्वस्व झोकून हिरीरीने काम करत असतात, वृक्षारोपणासारखे कार्यक्रम तर अनेकदा होत असतात, माझ्यावरची तळी, तलाव ह्यांची निगराणी करतात. माझे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व त्यांना थोडंफार तरी उमगलेलं असतं.
माझा इतिहास तुम्हाला माहित असेल किंवा नसेलही पण माझ्या गडावरच्या प्रत्येक वास्तूला, दगडाला आणि चिऱ्याला तो नक्कीच माहित आहे. माझा इतिहास नक्कीच गौरवशाली आहे. प्रत्येक गडाचा इतिहास आणि त्याचे इतिहासातील स्थान हे दीपस्तंभाप्रमाणे आहे. जेव्हा तुम्ही ते अभ्यासाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपला इतिहास अतिशय गौरवशाली आणि अभिमान बाळगण्यासारखा आहे. आणि त्यामध्ये किल्ल्यांचे स्थान अतिशय मोलाचे आहे. त्याविषयी यथार्थ अभिमान बाळगलाच पाहिजे..
शिवजयंती किंवा राज्याभिषेक सोहळा, हे दिवस माझ्यासाठी कोणत्याही सणाहून कमी नाहीयेत. मी हे क्षण अक्षरश: जगलो आहे. आणि त्या दिवसांचं पावित्र्य तुम्हाला जर राखता येत नसेल, तर तुमच्या बुद्धीची किती कीव करावी? पण मी तर ह्यापुढे जाऊन म्हणतो, की गडांचं पावित्र्य हे सदासर्वकाळ जपलंच पाहिजे. आणि ह्यात दुमत असण्याचं काही कारणच नाहीये...
मिलिंद फडके – २०-फेब्रुवारी-२०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा