स्थळ – शनिवारवाड्यात आत्त कुठेतरी एका मजल्यावर
पात्र – दोन मित्र (महाविद्यालयीन किंवा ऑफिसचे)
प्रसंग- हेरीटेज वॉकचा शेवट
अजय – विज्या लेका, हे समोर दिसणारं पेशव्यांचं पोर्ट्रेट बघितल्यावर काय वाटतं सांग पाहू?
विजय – अज्या, खरं सांगू, आपण अगदीच useless रे, ते शुद्ध मराठीत क:पदार्थ का काय म्हणतात ना ते आपण, थोडक्यात ढेकूण रे अगदीच !!! अरे, शेवटी छत्रपतींचे पंतप्रधान ते , असेच असले पाहिजेत की !
अजय – कसं अगदी मनातलं म्हणालास, नाही म्हणायला तसा तू थोडा हुशार आहेसच..
पण विजय आता स्वत:च्याच धुंदीत आहे, अजयने त्याच्यावर केलेला विनोद त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाहीये.. अजयच्या हे लगेच लक्षात येतं आणि तो अजून थट्टा करायचं टाळतो
विजय – अज्या, कसं असेल रे तेव्हाचं वातावरण? काय काय पहिलं असेल ना ह्या वाड्याने?
तेव्हाच, अचानक धीरगंभीर आवाज येऊ लागतो ,
"बाअदब, बामुलाहिजा, होशियार, श्रीमंत नानासाहेब पेशवा पधार रहे है "....
"कोण आहे रे तिकडे, अरे श्रीमंत माधवराव कचेरीत आले आहेत, त्याची सत्वर वर्दी द्या..."
"काका मला वाचवा....."
"चला चला राऊ आलेत, स्वागताला चला...."
आपली मंडळी जरा बावचळतात, खरंतर घाबरतात, कावरीबावरी होतात
शनिवारवाडा – काय राव, इतके घाबरलात? तुमची थोडीशी चर्चा ऐकूनच मी इतका प्रसन्न झालो, की तुम्ही वर न मागताच प्रकट झालोय. तुमच्या कपाळावरच्या आठ्या थोड्याश्या तरी पुसून काढूयात का असं वाटलं. तेव्हा तुम्ही काही सांगायच्या किंवा विचारायच्या आधीच मी थोडी माहिती देऊ का? म्हणजे, आवडेल ना? तुमच्या भाषेत झेपेबल करता येईल असं बघतो
तर असं बघा, माझा जन्म झाला २२ जानेवारी १७३२ रोजी, मी तसा छान ऐसपैस आहे बरं का. मोठ्ठाले दरवाजे, अनेक मजले, नानाविध खोल्या, वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाणारे महाल, केव्हढा तो मुदपाकखाना! काही सहस्त्र माणसांसाठी बनेल इतका स्वयंपाक होत असे आतमध्ये , छानसे कारंजे सुद्धा आहे, आणि अश्या कित्येक जागा ..
अजूनही सकाळी मी उठलो की प्रथम आमच्या पेशवे साहेबांना मनोमन मुजरा करतो, साहेब म्हणजे समोर जो अश्वारूढ पुतळा आहे तेच, थोरले बाजीराव पेशवे. तुमच्या भाषेत the greatest बाजीराव पेशवे ..
हं, हं , फुलू द्यात तुमची छाती पण.. अशी जी काही नावे, जी उच्चारताक्षणीच मान झुकते, नजरेत कमालीचा आदरभाव येतो आणि मनगट ताठ होते, त्यातलं एक महत्त्वाचं नाव
अजय आणि विजय आता ट्रान्समध्ये गेलेत, शनिवारवाडा ते बघून क्षणभर थांबतो
अजय (काहीतरी आठवून) – विज्या, एकही लढाई न हरलेला पेशवा तो हाच ! .. चाळीस लढाया सलग जिंकणे ? आपल्याला चाळीस मॅचेस सलग जिंकता येत नाहीत रे , छे छे , कसले रे आपण ..
विजय – बघ की , काहीच्या काहीच रे, एकदम वरचा क्लास ! बोले तो एकदम distinction level
शनिवारवाडा – लय भारी की .. इतिहास माहित्ये की लेको तुम्हाला , छान छान .. शाहू महाराजांनी आमच्या राऊमधील गुण त्याच्या लहानपणीच हेरले होते आणि मोठ्या विश्वासाने पेशवेपदाची जबाबदारी दिली. आणि ती सुद्धा अगदी लहान वयातच बरं का.. तर, ही पेशवे मंडळी मुळातील कोकणातील श्रीवर्धन गावातील बरं का ? तुमच्या दोघांपैकी कुणी आहे की तिथलं, किंवा आसपासचं?
अजय – नाही हो, पण आम्ही फडके, मुळचे कोकणातले, थोरल्या माधवरावांनी जी काही उत्तम माणसे हेरली, त्यात एक हरीपंततात्या फडके होते, आम्ही म्हणे त्या lineage मधले आहोत
विजय – आणि आम्ही पटवर्धन, सांगलीचे संस्थानिक गोपाळराव पटवर्धन, त्यापैकी आम्ही
शनिवारवाडा एकदम खुश होऊन – अर्रर्रर्र , भले शाब्बास , म्हणजे आपलं जुळलंच की , तुम्हा दोघांचे खापर-खापर-खापर पणजोबा माझे दोस्तच की एकदम , किती वेळा त्या दोन्ही थोर सरदारांची भेट झाली आहे म्हणून सांगू ? एकदम दिलदार माणसे ..
तर, बॅक टु सब्जेक्ट, थोरले बाजीराव म्हणजे तुमच्या भाषेत एकदम डॉन माणूस, भिती हा शब्दच कधी शिवला नाही राव त्यांना. तुमच्याकडे आता संरक्षण मंत्री आहेत, चीफ ऑफ मिलिटरी आहे, CDS आहे, NSA आहे, पण आमचा राऊ म्हणजे ऑल इन वन. तल्लख बुद्धी, डावपेचांची आखणी आणि अंमलबजावणी सगळंच होतं की आमच्या राऊंकडे. पालखेडची लढाई तर रेकॉर्डबुक्समध्ये जाऊन बसली आहे. लढाईतला विजय आणि राऊ हे जणू समानार्थी शब्द आहेत. असो , राऊ कादंबरीत आमच्या सरकारांचे खूप छान वर्णन आहे, आणि तुमचा तो बाजीराव पिक्चर !! छे छे, काहीच झेपला नाही, आमचे राऊ कुठे आणि हा पिक्चर कुठे.... जाऊ देत , माझे मत सांगितले एव्हढंच
अजय आणि विजय , बाजीराव पिक्चरला घातलेल्या शिव्या ऐकून जाम खुश होतात आणि आपसातच काहीतरी गप्पा मारायला लागतात, जणू ते शनिवारवाड्याला विसरून गेले आहेत
अजय – movie म्हटली की काहीही दाखवतात राव हे लोक ! किती लिबर्टी घ्यावी , काही मर्यादा त्याला ?
विजय – बघ की, जणू समोर बसलेली जनता कधी इतिहास शिकलीच नाहीये. ह्या movie वाल्यांना कुणीतरी बखरी वाचायला द्या रे
ते जाणून शनिवारवाडा – हे गाईज... बरोबर म्हटलं ना ? पिक्चरचं मी नाव काय घेतलं, तुम्ही तर दोन सेकंदातच विसरलात मला.. तुम्हाला पुढचा पेशवा जाणून घ्यायचा आहे की नाही ?
अजय आणि विजय आपसूकच होकारार्थी माना डोलवतात
शनिवारवाडा- अटक ते कटक म्हणजे काय सांगता ?
अजय आणि विजय , दोघांच्याही चेहऱ्यावर मोठ्ठे प्रश्नचिन्ह
शनिवारवाडा- तर, अटक ते कटक, म्हणजे पश्चिम सीमा ते पूर्व सीमा, म्हणजे मराठा साम्राज्याचा विस्तार
अजय – अटक ते कटक ... क्या बात रे विज्या , एकदम खास यमक आहे
विजय – अज्या, माहित्ये का तुला, ते अटक तर आता अफगाणिस्थानात आहे लेका, म्हणजे कुठच्या कुठे, आणि आपले पेशवे पार तिथवर पोहचले होते , म्हणजे एकदमच भारी की ..
शनिवारवाडा मोठयाने हसून – चला, तसं तर तसं, तुम्ही लक्षात ठेवणं महत्त्वाचं, तर सगळीकडे मराठा साम्राज्य दिसू लागला त्याचं क्रेडिट कुणाला जातं तर आमच्या नानासाहेबांना बरं का... आजच्या ह्या ज्या सगळ्या पेठा आपण बघतोय, त्यांचे जन्मदाते आहेत हे पेशवे, पुणे शहराची बांधणी खऱ्या अर्थाने तेव्हा सुरू झाली. एक गंमत सांगू का? ह्या पठ्ठयाने थेट कात्रज तलावातून माझ्यापर्यंत पाणी आणलं होतं, आणि ते ही काही शतकांपूर्वी, कसं केलं असेल हो, विचार करा पाहू .. तुमची आत्ताची मॉडर्न टेक्नॉलॉजी नव्हतीच तेव्हा. मला सगळंच माहीत्ये म्हणा, पण तुम्ही विचार करून आठवड्याभराने मला सांगा. तुमच्या त्या मेट्रोसाठी खोदताना किती ठिकाणी पाणी लागलं माहीत्ये ना! ही देणगी आमच्या नानासाहेबांची आहे.... पानिपतचं तिसरं आणि अंतिम युद्ध घडलं नानासाहेबांच्या काळातच बरं का? पण तो विषय नकोच, कारण त्या युद्धानंतरची दृश्ये माझ्या मनावर खूप खोलवर ठसली आहेत. मी तुम्हाला विचारतो, पानिपतची लढाई हा खरंच पराभव होता का हो? मला स्वत:ला मात्र ह्या लढाईला कुणी पराभव म्हटलं की प्रचंड राग येतो.
आता अजय आणि विजय सुन्न झाले आहेत
शनिवारवाडा ते जाणतो , आणि एकदम म्हणतो .. मृणाल कुलकर्णी आता पुण्यात राहते की मुंबईत ?
अजय आणि विजय एकदम भानावर येतात आणि एकदम म्हणतात .. क्या बात !! ती कधी पुण्यात असते , तर कधी मुंबईत, पण एकदम हा गियर कुठे बदलला? ती कुठे आली इथे म्हणे?
विजय – अरे काय अज्या ! मृणाल म्हणजे रमाबाई ... लागली का लिंक ?
अजय – अरे म्हणजे स्वामी कादंबरी आणि मालिका.. म्हणजेच .......
दोघे एकदम – माधवराव पेशवे
शनिवारवाडा (आता एक वेगळंच तेज आहे चेहऱ्यावर आणि अतिशय आनंदाने) – माधवराव म्हणजे माझा अतिशय लाडका पेशवा ... काय तो रुबाब, काय ते दिसणं, काय ती देहयष्टी, सगळंच न्यारं राव ह्या माणसाचं !
अजय – स्वामी कादंबरी इतकी आत खोलवर आहे अजूनही, की काय आणि किती सांगू रे विज्या !!
विजय – कसं बोललास मित्रा, आणि तो राघोबादादा म्हणजे नॉनसेन्स .. (सिंघम पिक्चरमध्ये अनंत जोग म्हणतो तसं)
दोघेही मोठ्याने हसतात
शनिवारवाडा – लय भारी , तर ह्या पेशव्याने माझा माथा परत उंच केला आणि मी अभिमानाचा मुकुट परत धारण केला.. कुठला तो निजाम, चार वेळा हरला आमच्या श्रीमंतांपुढे .. (थोड्या कुचकट स्वरात) पण आमचे थोर राघोबाकाका, त्यांनी सोडला त्याला, तीच गत हैदरची, त्याच्याही पार नाकी नऊ आणले होते आमच्या माधवाने. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पेशवेपदाची धुरा सांभाळणारा आमचा माधव. पण जेमतेम अकरा वर्षात आमच्या माधवाने जे काही केले ते केवळ अतुलनीय आहे. असा पेशवा पुन्हा न होणे. हार मानेल तो माधव कसला. मराठा साम्राज्याचा पुन्हा दरारा वाढवला. अखिल हिंदुस्थानात परत जबर जरब बसवली आमच्या माधवाने. परंतु, गृहकलय त्याच्या जणू पाचवीलाच पूजला होता हे किती दुर्दैव ! या सगळ्यातून माधव सुटला नाही, आणि म्हणूनच वाईट एकच वाटतं की आमचे श्रीमंत माधवराव फक्त अठ्ठावीस वर्षे जगले.
शनिवारवाडा – असो.. (शनिवारवाडा एक मोठ्ठा उसासा सोडतो, त्यात दु:ख निराशा, उद्विग्नता , सर्व काही आहे)
शनिवारवाडा (दोनच सेकंदात एकदम टोन बदलतो , आता तो आनंदात आहे ) – पण मुलांनो, अगदी खरं सांगतो, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुम्हाला हेरीटेज वॉकला यावसं वाटलं, ह्यातच अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. आणि तुम्हाला बरीच माहितीही आहे. एकच सांगतो, कुठलाही हा इतिहास पाठ्यपुस्तकं, कादंबऱ्या किंवा चित्रपटांपुरता मर्यादित ठेवू नका रे. मला माहित्ये , तुम्हा दोघांकडे खूप पुस्तके आहेत. त्यावरची धूळ झटका. खूप वाचा आणि मुख्य म्हणजे त्यावर विचार करायला शिका. खूप काही शिकायला मिळतं त्यातून. तुमचा तो गूगल बाबा आहे ना, त्यालाही विचारा, तुम्ही लेको एक्स्पर्ट आहात. त्यामधूनही बरंच काही समजेल तुम्हाला. म्हणजे पुढच्यावेळी याल तेंव्हा अधिक चर्चा करू शकाल माझ्याशी. आणि पुढचा इतिहास ही आपसूकच बोलू लागेल तुमच्याशी पण तितक्याच मोकळेपणाने. उत्तर पेशवाई इट्सेल्फ इज अॅन एपिसोड..
- मिलिंद फडके (१८-फेब्रुवारी-२०२३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा