लेबल

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

बुद्धी दे शक्ती दे आमुच्या मना

 

बुद्धी दे शक्ती दे आमुच्या मना

 

बिट्टू – ताsई, ए ताई, तुला माहितीये का.. गणपतीची मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत बाबांनी माझं नाव घातलंय. रविवारी जायचंय..

ताई – अरे म्हणजे उद्याच..

बिट्टू – अरे हो उद्याच की! कसली मज्जा येईल ना.. अवनी आणि अर्णव पण येणारेत. जाम एक्सायटेड आहे मी..

ताई – ओ हो! म्हणजे या वर्षीची उत्सवमूर्ती तुमच्यासारख्या उत्साहमूर्तींच्या हस्ते साकार होणार तर...

बिट्टू – तायडे उगीच चिडवू नकोस हं मला

ताई – अरे चिडवत नाही, उलट कौतुकच करतेय..

बिट्टू – अगं, मग जरा कळेल अशा भाषेत कर ना!

ताई – बरं बरं! ए, पण नीट लक्ष द्या हं आणि छान मूर्ती तयार करा... नाहीतर असं होईल “करायला गेलो गणपती आणि झाला मारुती!”

बिट्टू – हे काय आता नवीन! गणपतीचा अन् मारुतीचा काय संबंध? किती वेगळेयत ते दोघं..

ताई – नवीन काही नाही रे! अशी म्हण आहे, तुला नाही कळणार.. जाऊ दे, मी जाते झोपायला, मला उद्या ट्रेकला जायचंय. तूही झोप आता नाहीतर आई ओरडेल..

बिट्टू – (चालीत) करायला गेलो गणपती आणि झाला मारुती..

तर बिट्टूबुवा झोपले. मनात गणपतीचे विचार होतेच, त्यात मारुतीची भर पडली. मग काय? मनी वसे तेss स्वप्नी दिसे. अरेच्चा! हा बिट्टू का पळत सुटलाय आणि त्याच्या मागे कोण लागलंय? साक्षात् हनुमान?

बिट्टू – (पळता पळता) मनोजवं मारुतततुतु... वक्रतुंड महाकाय सूर्य.. सम..सम.... गजानना गजानना, तूच वाचव रे बाबा..

आजी काय काय म्हणते ते आठवून बिट्टू कसंतरी म्हणण्याचा प्रयत्न करत होता.. आणि काय आश्चर्य! गणेश प्रत्यक्ष प्रकट झाला, पण त्याचं हे रूप नेहमीसारखं नव्हतं. मोठ्या आवेशात होता तो. त्याला बघून जीव भांड्यात पडायचा तर उलट जराशी भीतीच वाटली बिट्टूला. मारुती मागे लागलेला आणि गजानन पुढे उभा ठाकला. इकडे आड आणि तिकडे विहीर. तो बिचारा जागीच खिळून राहिला.

मारुती – बरा सापडलास पोरट्या! तुम्ही माणसं, त्यातही तुम्ही पुणेकर काय समजता रे स्वतःला? मला नावं ठेवता? डुल्या काय उंटाड्या काय.. बटाट्या भांग्या भिकारदास.. काय वाटेल ते म्हणाल काय रे? आणि आत्ता काय म्हणत होतास... करायला गेलो गणपती आणि झाला मारुती.. ? लंबोदराशी माझी तुलना?  माझे सिक्स पॅक  ॲब्ज बघितलेस का? नाहीतर तो तुंदिलतनु.. मूषकावर बसतो.. मोदकच काय खात सुटतो, पोट फुटलं तर नागाची दोरी करून बांधतो आणि चंद्र त्याला हसला तर उलट त्यालाच शाप देतो..

गणपती – हं.. ऐकतोय बरं का मी हनुमंता! तू तर जन्मतःच सूर्याकडे झेपावलास आणि वज्राचा मार खाऊन हनुवटी सुजवून घेतलीस! हा हा! बरी अद्दल घडली! अरे, आपण केवढे, सूर्य केवढा.. काही विचार? नुसती शक्ती असून चालत नाही बाबा, बुद्धीसुद्धा लागते!

मारुती – (हनुवटी चोळत) हं... ते जरा चुकलंच माझं..

गणपती – ठीके रे. दोष सगळ्यांमधे असतात आणि चुकाही प्रत्येकाकडून होतात. मीही रागाच्या भरात चंद्राला शाप दिला, नंतर वाईट वाटलं मला, मग उःशाप दिला... पण त्यामुळेच चंद्राच्या कलांचं सौंदर्य बघायला मिळतं की नाही?

मारुती – हूंss.. तू काय बोलण्यात हार जाणार आहेस का? तू तर सकल विद्यांचा अधिपती... अरे, पृथ्वीप्रदक्षिणेच्या वेळी कसली आयडिया लढवलीस तू.. शोभतोस खरा बुद्धिदाता!

गणपती – आणि तू शक्तिदाता!

बिट्टू – (निःश्वास टाकत स्वतःशीच) चला! दोघांचा राग शांत झालेला दिसतोय. हुश्श.

गणपती – (मिश्कीलपणे) अंजनेया, तुला तर बुद्धिमतां वरिष्ठम्... असंही म्हणतात ना.. अरे, मग ती बुद्धी वापरत जा की अधूनमधून.

मारुती – वक्रतुंडा! तू आता मला परत राग आणतोएस हं..

बिट्टू – ( घाबरून स्वतःशीच) अरे देवा! आता काय वाढून ठेवलंय पुढे..

गणपती – असं चिडू नये रे वज्रांगा.. चांगलं नसतं! एक साधी म्हण ऐकून इतका रागावलास? अरे, मथितार्थ समजून घ्यायचा.. म्हणजे, एखादी गोष्ट इतकी बिघडणं की दुरुस्तीच्या पलीकडे.. म्हणींमधे अतिशयोक्ती असतेच. त्यामुळेच तर त्या मजेदार होतात आणि पटतात एकदम.

मारुती – म्हणजे अपील होतात!

गणपती – आज अचानक इंग्रजी? अपील काय, आयडिया काय!

मारुती – विनायका, तू १० दिवस पृथ्वीवर राहून आलास की अगम्य भाषेत बोलतोस आणि आम्हाला कॉम्प्लेक्स आणतोस. म्हणून जरा माहिती काढली आणि शिकलो ही भाषा.

गणपती – न्यूनगंड वाटण्याचं काहीच कारण नाही, आपली देववाणी काही कमीये का? हं.. मात्र नवनव्या विद्या, कला आत्मसात करणं चांगलंच. ए, पण खरं सांगू का? मलाही आता न्यूनगंड आलाय हं तुझी शरीरयष्टी, तुझं चापल्य, सामर्थ्य... अरे, द्रोणागिरी पर्वत लीलया वाहून आणलास... मीही आजच व्यायाम सुरू करतो ..आणि यावेळी भक्तांकडे जाईन ना, तेव्हा कडक आहारनियमन. रोज आपले २१..नको नको ११च मोदक खाईन. हो, शास्त्र असतं ते!

मारुती – हा हा, जोक्स अपार्ट! ..पण खरंच आहे हं, सगळ्या गोष्टी प्रमाणात हव्यात. एकाच गोष्टीचा अतिरेक नको. बुद्धी आणि शक्ती दोन्हीचं संतुलन साधायला हवं.

(इतका वेळ भेदरून उभ्या असलेल्या बिट्टूकडे दोघांचं लक्ष जातं.)

गणपती – बिट्टू, तू घाबरलास की काय? अरे, आमच्यामधे असे वाद होतच असतात. वादे वादे जायते तत्त्वबोधः .. पवनपुत्रा, तुला माहितीये का, आपल्या बिट्टूच्या शाळेत बुद्धिसंवर्धनाबरोबरच बलोपासनेलाही महत्त्व देतात. मुलांचं सर्वांगपरिपूर्ण व्यक्तिमत्व घडवून समाजाच्या, देशाच्या, अखिल विश्वाच्या कल्याणासाठी झटून काम करण्याची प्रेरणा देतात.

मारुती – अरे म्हणजे आपल्या गुरुकुलासारखंच! हं.. आत्ता आठवलं, त्या दिवशी आकाशमार्गे भ्रमण करत असताना सहज खाली बघितलं, तर या शाळेतली मुलंच नव्हे तर त्यांचे पालकसुद्धा सांघिक नृत्याचा सराव करत होते. तल्लीन होऊन पाहातच राहिलो मी!

गणपती – त्याला बरचीनृत्य म्हणतात. अरे, मी तर वाटच बघत असतो ज्ञानप्रबोधिनीत येण्याची. उत्सवात रोज विचारप्रवर्तक कार्यक्रम आणि आगळेवेगळे उपक्रम...

मारुती – इथली मुलं घरोघरी जाऊन अथर्वशीर्ष म्हणतात ना? माझ्या कानावर आलंय तसं..

गणपती – हो तर आणि मला निरोप देतानाची त्यांची मिरवणूक.. सुनियोजित, शिस्तबद्धपणे पार पडणारी.. ते भारलेलं वातावरण.. अंतःकरण भरून येतं माझं...

मारुती – तू इतकं वर्णन करतोएस तर या वर्षी मीही प्रबोधिनीतच मुक्काम ठोकतो तुझ्याबरोबर. खूप उत्सुकता निर्माण झालीये.. आणि अधूनमधून जी निराशा दाटून येते ना, या माणसांचं वर्तन बघून, तिच्यातून आशेचा किरण दिसायला लागलाय.. अशा समाजहिताच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या, संघभावनेने काम करणाऱ्या संस्था असतील, तर भवितव्य उज्ज्वल आहे, असं म्हणायला हरकत नाही.

बिट्टूने आपले कपडे जरा झटकले, केस नीट केले आणि कॉलर ताठ करत पुढे आला-

-तेवढ्यात...

आई- बिट्टू, अरे गादीवरून खाली कसा आलास? ऊठ आता, कार्यशाळेला जायचंय ना?

...आईच्या हाका कानावर आल्या. बिट्टू डोळे चोळत उठला. मघाच्या धुमश्चक्रीत आपण बिछान्यावरून खाली पडल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने आपले कपडे जरा झटकले, केस नीट केले, कॉलर ताठ करत उभा राहिला आणि खोलीबाहेर पळाला. कारण हे सगळं कधी एकदा ताईला सांगतोय असं त्याला झालं होतं.

 

© आसावरी गोखले

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा