लेबल

रविवार, १० सप्टेंबर, २०२३

अंताक्षरी

 

हम तो गीत गा चुके है , अब तेरी है बारी |

जो तू ना गा पाया , तो तेरी टीम है हारी ||

 

या ओळी वाचल्या किंवा ऐकल्या, की आपण थेट नव्वदीच्या दशकात जातो. आणि “अंत्याक्षरी” कार्यक्रमाची आठवण आल्यावाचून राहत नाही आणि त्याबरोबरच आठवतात ते सर्वच “गोंडस” चेहरे..  रेणुका शहाणे, दुर्गा जसराज, राजेश्वरी सचदेव आणि वन अँड ओन्ली अन्नू कपूर..            वर्षानुवर्षे चालत आलेल्या ‘गाण्यांच्या भेंड्या’ ह्या घरगुती खेळाला ह्या मंडळींनी काय भारदस्तपणा आणला होता ना तेव्हा ...  हे बदललेले स्वरूप योग्य की अयोग्य हे ज्याचे त्याने ठरवावे, पण या कार्यक्रमाची यशस्वितता वादातीत यावर नक्कीच दुमत नसावे !!

हं .. तर मी हे म्हणतोय, त्याचा खुलासा करावा नाही का?

ज्ञानप्रबोधिनीच्या पालक अभिव्यक्ती गटातर्फे परवा, शनिवारी १२ नोव्हेंबर रोजी, पालकांसाठी अंत्याक्षरी स्पर्धा घेतली, खरंतर खेळली गेली असंच म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. प्रशालेने सुचवलेल्या संकेतांना अनुसरून “देशभक्तीपर गाणी आणि भक्तिगीते” हा विषय दिला होता.

यावेळी आयोजक मंडळाचे ‘प्रमोशन’ झाले होते, कारण आयोगाच्या चमूला दोन खणखणीत म्होरक्या मिळाल्या होत्या. दोन ‘जोशी’ एकत्र आल्यावर एखादा कार्यक्रम अयशस्वी होणे हे सांस्कृतिक जगात अमान्य तत्व आहे. सांगायचे तर काय, सायली जोशी आणि दीपाली जोशी या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली बाकीचे निर्धास्त होते. नाही म्हणायला “देखल्या देवा दंडवत” म्हणून बाकीच्यांनी हातभार लावला हेही खरेच.. परंतु, मुख्य संकल्पना, त्याचा गृहपाठ, अंमलबजावणी आणि सर्व प्रकारची रसद पुरवणे.. असं सगळंच ह्या दोन कर्णधारांनीच केलं... मग स्पर्धेच्या फेऱ्या तयार करण्यापासून किरकोळ व्यवस्थेपर्यंत सर्व काही त्यात आले. आता बाकीचे म्हणजे, खारीचा वाटा (मोठा खारीचा मोठा वाटा) उचलणारे थोर लोक. अमेय जोशी असे अजून एक ‘जोशी’ , आणि त्यातही बोलते जोशी छे! छे! छे!..  आशुतोष नाईक हे गृहस्थ सर्वगुणसंपन्न आहेत. गौरी पटवर्धन, योगिनी शुक्ल आणि मिलिंद फडके .. आणि हो, पडद्यामागचे सूत्रधार, प्रसाद मेहेंदळे आणि दुहिता जोशी

तर आता शनिवारचा आंखो देखा हाल हो जाये ..

अश्या प्रकारचा पहिलाच प्रयत्न असल्याने आणि अंत्याक्षरी ही विशिष्ट विषयाला धरून असल्यामुळे किती स्पर्धक येतील याची धाकधूक होतीच.  परंतु त्यापुढे काळजीपूर्वक दुर्लक्ष करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेकडे लक्ष दिले आणि अंती तेच योग्यही ठरले.

एका बाजूला संस्थेचे कळस धीरगंभीरतेची जाणीव करून देत होते. त्यावर चमकणारी सरत्या उन्हाची किरणे आणि दुसऱ्या बाजूला सहस्त्ररश्मी त्याचा पसारा आवरून मावळतीकडे झुकू लागला होता. अश्या वेळेस मला पंडित जसराज किंवा पंडित वसंतरावांचा ‘मारवा’ किंवा ‘श्री’ आठवतो आणि अंगावर सरसरून काटा येतो.

साडेचार वाजता तिसरी घंटा देऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली. एकूण आठ स्पर्धक, पण आपण खेळाडू म्हणूयात. दोन-दोनचे चार संघ केले. सायंकालीन रागांची नावे त्याला दिली गेली. पूर्वी, भीमपलास, मुलतानी आणि कल्याण.. तर हे संघ पूर्ण तयारीनिशी शड्डू ठोकून शिट्टीची वाटच पाहतच होते. एकूण सहा फेरा ठरवल्या गेल्या आणि प्रत्येक फेरीमध्ये दोन उपफेऱ्या असा खेळाचा साधारण ढाचा होता

१.      साधी अंताक्षरी

२.      शब्दांवरून गाणी ओळखणे

३.      अंतरा मुखडा फेरी

४.      वर्णनात्मक/गुणगान करणारी फेरी

५.      दिलेल्या शब्दांवरून जास्तीत जास्त गाणी ओळखणे

६.      धून फेरी - गाण्याच्या सुरुवातीचे संगीत ऐकून गाणे ओळखणे

मी कायमच ह्याला खेळ म्हणत आलोय. कारण साधारण चार तास जो काही कल्ला झाला/केला, त्याला स्पर्धा म्हणून थोडे असंयुक्तिक आणि अधिक अपमानास्पद वाटेल... आणि याचे मुख्य कारण म्हणजे सगळ्या खेळाडूंमधील परस्परसंवाद,आपापसातील इंटरॅक्शन्स आणि आयोजक-खेळाडू ह्यातील धमालमस्ती, असं जे काही रसायन तयार झालं, त्याला स्पर्धा नक्कीच म्हणता येणार नाही. अतिशय खेळीमेळीच्या आणि अनौपचारिक वातावरणात एकमेकांची थट्टा मस्करी करण्यात, सरत्या सूर्याला साक्षी ठेवून, चहाचे कप रिकामे करण्यात वेळ कसा गेला ते कळलं सुद्धा नाही..

काय पडले नाही त्या दिवशी पदरात?

जवळपास सर्वांनीच आपापले विसरलेले बाल्य त्या दिवशी पुन्हा शोधले आणि सापडले सुद्धा.  अशा खेळात हार जीत कधीच महत्त्वाची नसते, मात्र लटकी भांडणे मात्र जरूर व्हायला हवीत. त्यानिमित्ताने स्वतःच्या भूतकाळात डोकावणे झाले, जुन्या अंत्याक्षरी स्पर्धा आणि त्याची तयारी आठवली गेली.  Icing on the cake म्हणजे आयत्या वेळेस लाभलेले मिलिंद संत सरांचे मार्गदर्शन. संत सरांकडे प्रबोधिनीच्या अभिव्यक्ती गटाची मुख्य जबाबदारी आहे त्यामुळे त्यांची उपस्थिती अगदीच पथ्यावर पडली असेच म्हणावे लागेल.

 

खेळ खेळाडूंविषयी आसावरी आणि पल्लवी ; नंदिनी आणि शिल्पा ; श्रीकांत आणि वंदना ; राकेश आणि गौरी.. असे चार संघ..

प्रशालेकडून मुख्य उल्लेख करायला हवा तो मुख्याध्यापक वाचस्पती मिलिंद नाईक सरांचा. त्यांनी प्रशालेची गच्ची अगदी लगेचच उपलब्ध करून दिली. सचिनदादा, ओंकारदादाच्या स्वरूपात मिळालेले सहाय्य, इतर गोष्टींची आणि विजेची उपलब्धता याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ओंकारदादा असला की बाकी काहीच चिंता नसते हे समीकरण परत सिद्ध झाले आणि सचिनदादाने बरेच काम आधीच करून ठेवलं होतं..  थोडक्यात काय तर .. काही “जोशी” आणि काही “मिलिंद”....  

एकूण काय? आमचा ‘अंत्याक्षरी’नामक अध्याय अगदी विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण आला नसला तरी पहिल्या वर्गात नक्कीच उत्तीर्ण झाला. पण आम्ही आता आताच खूणगाठ बांधली आहे की पुढची अंत्याक्षरी विशेष योग्यता श्रेणीतच उत्तीर्ण होणार आहे. आणि ह्याचे मुख्य कारण आम्हाला ठावूक  आहे, आणि ते म्हणजे पुढच्या वेळेस अधिक संख्येने पालक ह्यात भाग घेणार आहेत...

Yet another feather in the cap असं म्हटलं तर ती स्वस्तुती नक्कीच ठरू नये

 

Ü मिलिंद फडके (१४ नोव्हेंबर २०२२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा