स्थान –
विम्बल्डन शहरातील सेंटर कोर्ट
तारीख-वार –
रविवार, १६ जुलै २०२३
वेळ – साधारण
रात्रीचे सव्वाअकरा (हिंदुस्थान प्रमाणवेळ)
प्रसंग –
कार्लोस अल्काराझ हातातील जेतेपदाचा कप उंचावतोय
पुलंनी अजरामर केलेली एक “रविवार
सकाळ” होती. आणि काल साहेबाच्या देशात एक “रविवार संध्याकाळ” घडली. कालचा रविवार
सत्कारणी लागला हे नक्कीच! काल विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर जे काही नाट्य घडले,
ती केवळ द्रुत लयीतली अविस्मरणीय भैरवी होती. कदाचित बऱ्याच वर्षानंतर अशी लढत
झाली असेल .. विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरील लुसलुशीत गवतावर जे काही घडलं ते बरचसं
शब्दातीत होतं, काहीसं अकल्पित होतं, काहीसं भूतकाळात नेणारं होतं. सेंटर
कोर्टच्या हिरव्याकंच गालिच्यावर एका दीर्घ नाटकाचा जणू “पंचअंकी” प्रयोगच रंगला होता. त्यात एखाद्या
उत्तम नाट्यसंहितेचे सगळे मानदंड पुरेपूर होते. गतीमानता, उत्कंठा, थरार असं सारं
काही त्यात होतं. पंचपक्वान्नांनी सजलेलं ताट ह्या पंचअंकी प्रयोगात (पाच सेटर सामना) अगदीच शोभून दिसावं असंच काहीसं !!
चिरंतन स्मरणात राहील असाच हा प्रयोग होता..
कदाचित त्यात अनेक विरोधाभास
असतील. वयाचा फरक, खेळण्याच्या पद्धतीतील
फरक, पदनव्यास आणि ताकदीतील तफावत, असं बरंच काही सांगता येईल. पण ही अंतिम लढत
केवळ पर्वणी ठरली. अगदी फुटबॉल फायनलच्या तोडीस तोड !!
प्रत्येक कालखंडात एखादा खेळाडू आपला
हिरो असतो, त्याप्रमाणे फेडेक्स महाशय कायमच आमच्या लिस्टमध्ये नंबर एकवर विराजमान
होते. मग अगदी सुरुवातीच्या काळातील खडूस सॅम्प्रस किंवा लंब्या केसांचा आगासी असो किंवा नंतर
राफा आणि जोको. ह्या मंडळींच्या फेडेक्सबरोबरच्या लढती कायम उच्चच श्रेणीत गणल्या
जातील आणि तो कुठलाही सामना हा गुणवत्तेच्या बाबतीत समसमानच असायचा. पण झुकतं माप
मात्र कायमच रॉजरच्या बाजूने राहिलं. थोडा गमतीचा भाग म्हणजे, चुकून फेडेक्स एखादा
सेट हरला तर आपली खेळ बघण्याची जागा बदलण्यापर्यंत सुद्धा आमची मजल जात होती, इतके
अस्मादिक त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते.
का कुणास ठाऊक, पण सेंटर कोर्टची
हिरवळ हेच खरं टेनिस असे समीकरण अगदी लहान वयापासून मनात घट्ट बसले होते. बेसलाईनच्या
रॅलीज ही जरी रॉलँड गॅरोसची खासियत असली तर सर्व्ह आणि व्हॉली इथेच टेनिस संपतं
अशीच धारणा!! ह्याचा अर्थ रॉलँड गॅरोसच्या क्ले कोर्टला किंवा अमेरिकन ओपन/ऑस्ट्रेलियन ओपनच्या हार्ड कोर्टला कमी लेखायचं मुळीच नाहीये. पण
विंबल्डनच्या हिरवळीची मजा त्यात नाही. अर्थातच हे वैयक्तिक मत झाले, आणि किंबहुना
त्यामुळेच ग्रास कोर्टची दिग्गज मंडळी कायमच आमच्या गळ्यातले ताईत बनून राहिली.
कळत्या वयातील आठवणी कॉनर्स आणि
मॅकेन्रोच्या आहेत. भांडकुदळ मॅकेन्रो आणि तितकाच शांत कॉनर्स. मग पुढे मनावर
राज्य केलं ते बेकर आणि एडबर्गच्या जोडगोळीने. खोल सर्व्हिस करून नेट जवळ
व्हॉलीसाठी धावत येणारा, अगदी भुवयासुद्धा पांढऱ्या असणारा अष्टादश वर्षीय बोरिस. एडबर्गचा खोल
क्रॉसकोर्ट एखाद्या बुलेटच्या वेगाने परत येतोय, बेकर अगदी नेटजवळ आहे, आणि जवळपास
त्याच्या दोन-तीन फुटांवरून एडबर्गची बुलेट जात्ये, गेलाच गुण असं वाटतानाच, अचानक डोळ्याचे
पाते लवते न लवते इतक्या वेळात बेकर अक्षरश: झेप टाकून ती बुलेट परतवतो. आणि तमाम
सेंटर कोर्ट बेभान करून सोडतो. आणि इतकं सगळं घडूनही गेम एडबर्गच जिंकतो. असं कितीतरी
वेळा घडलं आहे ! जीव ओवाळून टाकावा असा बेकर आणि तितकाच संयमी, शांत एडबर्ग. किंवा केवळ चार
गुणांमध्ये निव्वळ सर्व्हिसच्या जोरावर गेम खाणारा, पण तितकेच डबल फॉल्ट करणारा इवानिसेविच.
विचित्र पद्धतीने, जीभ बाहेर काढून दम खाणारा पण अतिशय खडूस पीट सॅम्प्रस,
ग्रासकोर्ट असूनही फार कमी वेळा सर्व्ह-व्हॉली खेळणारा, बेसलाइनचा दादा माणूस
अँड्रे आगासी, अतिशय चिवट इव्हान लेंडल (विम्बल्डन ने त्याला कायमच
हुलकावणी दिली) .. ही सगळीच मंडळी फार जवळची.
पुढे मात्र रॉजर फेडरर आल्यावर बाकी
सगळेच अंधुक दिसायला लागले. केसांना बॅंडाना बांधणारा फेडरर, त्याला मात्र सगळंच
माफ होतं. ड्रॉप शॉट टाकावा तर केवळ त्यानेच. जोरदार फोरहँड क्रॉस कोर्ट फटका
मारण्याचा आविर्भाव घेऊन अलगद ड्रॉप टाकणारा फेडरर हा उत्तम अभिनेताच होता. बिनतोड
सर्व्हिस हा त्याचा असेट कधीच नव्हता, पण फर्स्ट फॉल्ट होऊन सुद्धा हवेतल्या हवेत
सर्व्हिस वळवण्याची त्याची कला अगम्य होती. आपण नेट जवळ असताना समोरून आलेला एखादा
बेसलाइनकडे जाणारा हाय लॉब, फेडरर जेव्हा एखाद्या अॅथलीटप्रमाणे मागे धावत जाऊन
जवळपास ब्लाइंडपणे दोन पायांच्या मधून उलटा क्रॉस कोर्ट मारायचा, तेव्हा हृदयाचे
ठोके थांबलेले असायचे. आणि त्यानंतरचे ते निरागस हसू, अर्रर्रर्र , म्हणजे किती
वेळा जीव ओवाळायचा राव?
तिकडे महिलांमध्ये तर कायमच एका
नावाशिवाय पर्यायच नव्हता. अगदी विलियम्स भगिनींच्या आगमनापर्यंत. आणि ते नाव
म्हणजे वर्षानुवर्षे मनावर अधिराज्य गाजवणारी स्टेफनी ग्राफ... छान उंची- एखाद्या मॉडेलसारखीच, उजळ रंग, एकदम धारदार नाक, चेहेऱ्यावर मंद हसू, प्रेक्षकांमधून एकदा भर सामन्यात लग्नाची मागणी झाल्यावर
तितकेच हजरजबाबी उत्तर देणारी, कितीही गंभीर झाली तरी तिचं ते हसू मावळायचं नाही कधीच ! स्टेफीची सर्व्हिस हा
एक वेगळा संशोधनाचा विषय ठरावा.. डाव्या हातात बॉल... उजव्या हातात रॅकेट....
किंचित तिरकी उभी असलेली स्टेफी... सर्व्हिस करायला केलेला उंच लॉब, एखाद्या
गरुडासारखी भेदक नजर. १०० मैलांच्या वेगाने तो बॉल सर्व्हिसरूपात समोर जातो. आणि
पलीकडे तो बॉल टोलावणाऱ्या पण तितक्याच थोर विभूती. कधी गॅबी (गॅब्रीयेला सबाटिनी- आणि ती सुद्धा तितकीच आकर्षक), कधी मार्टिना नव्हरातिलोवा, कधी मोनिका सेलेस (एखाद्याच्या
खेळाचा असा दुर्दैवी अंत होऊ नये), कधी अॅरांक्सा सँचेज आणि नंतर
विलियम्स भगिनी. आणि मग पलीकडून तितकाच जोरदार बॅकहँड व्हॉली येतो. इथे साटकन समोरचीला
काही कळायच्या आत, अतर्क्य कोटीतला ड्रॉप शॉट किंवा स्मॅश मारून तो बॉल स्टेफीला
पहिला पॉईंट मिळवून देतो, स्वत:ला धन्य मानतो ...फिफ्टीन लव्ह....
हिंदुस्तानात क्रिकेट हा एकमेव मैदानी
खेळ मानला जातो. ह्यात दुमत नक्कीच नाहीये की, टेनिससारखे खेळ मध्यमवर्गाच्या
खिशाला कात्री लावणारे आहेत, किंबहुना पूर्वी तरी नक्कीच होते. मी प्रथम टेनिस
कोर्टवर खेळलो ते महाविद्यालयीन काळात. कारण मुळात टेनिस कोर्ट्सच कमी असायची, आणि
त्याकाळी तसा महाग खेळ म्हणूनच त्याची गणती होत असे. पण म्हणून मिळेल त्या जागी
तळहाताचा रॅकेटसारखा वापर करून शालेय जीवनात टेनिस खेळण्याची हौस नक्कीच भागवून
घेतली आहे. एक रमेश कृष्णन आणि आनंद आणि विजय असे अमृतराज बंधू; जे मुख्यत्वे
दुहेरी खेळायचे, एव्हढीच भारतीय टेनिसची माहिती होती. आगामी काळात लिएंडर पेस
नावाचा तारा झळकू लागला आणि हिंदुस्तानसारखा खंडप्राय देश टेनिसच्या क्षितिजावर
दिसू लागला. पण पूर्वीच्या दूरदर्शनवर पुरुष आणि महिला अश्या दोन्हीचे अंतिम सामने
दाखवले जायचे. आणि वर उल्लेख केलेल्या अनेक खेळाडूंनी तेव्हाच जे गारुड करायला सुरुवात केली, त्याचा परिणाम अगदी आजतागायतही तेव्हढाच आहे. पुढे नोकरीच्या
निमित्ताने युरोपात जाणे झाले आणि मग तिथल्या ह्या अनेक पंढरींना भेट देणे झाले. जो भाव Lords स्टेडियम बघताना होता, त्याच्या तसूभरही कमी
विम्बल्डन किंवा रॉलँड गॅरोस बघताना नव्हता.
असो. तर कालच्या युध्दप्रसंगाविषयी
थोडेसे
जोकोच्या जवळपास निम्म्या वयाचा
कार्लोस अल्काराझ. अगदीच पोरवय. पण काय ती ताकद ! शेवटच्या सेटमध्ये सुद्धा जवळपास सव्वाशे मैलांनी सर्व्हिस टाकणारा तो.. पहिला सेट मोठ्या फरकाने हरून सुद्धा दूसरा सेट
टायब्रेकर मध्ये जिंकून लढाईत “हम भी कुछ कम नही” असे ठामपणे म्हणणारा तो, एखादा अटीतटीचा गुण मिळाल्यानंतर, कोवळ्या वयातील
शोभून दिसणारा उत्साह कुठेही न दडवणारा तो... जिंकल्यावर काहीसा भांबावून जाणारा
तो, बेभान होऊन प्रेक्षकांत उडी मारून आपल्या जवळच्या मंडळींना हर्षॉल्हासाने
भेटणारा तो.. अडखळत, आपल्या तोडक्यामोडक्या इंग्रजीत भावना व्यक्त करणारा तो .. किती वर्णन करावे
ह्या जगज्जेत्याचे !!
आणि त्याच्या समोरचा प्रतिस्पर्धी, नोव्हाक जोकोविच.. सद्यस्थितीतील टेनिसचा अनभिषिक्त सम्राट. कुठल्याही कोर्टवर
तितकाच प्रबळ. कडवा प्रतिस्पर्धी आणि तुल्यबळ खेळाडू. आमच्या लाडक्या फेडेक्सचा
विम्बल्डन विक्रम मोडू पाहण्याची अपेक्षा धरूनच, नव्हे तसा चंग बांधूनच ह्या
वर्षीची सुरुवात केली होती पठ्ठयाने. रॉलँड गॅरोसवर दोनच आठवड्यांपूर्वी कॅस्पर
रुडचा तीन सरळ सेट्स मध्ये फडशा पाडून मोठ्या दिमाखात फ्रेंच ओपन जिंकल्यामुळे
द्विगुणित झालेला आत्मविश्वास. सेरेना विलियम्सच्या 23 ग्रँडस्लॅम्सची बरोबरी करण्याची
संधी. अश्या सगळ्याच गोष्टी पथ्यावर पडलेला जोको. मोठ्या धमक्यात त्याची स्पर्धेची
सुरुवातही झाली.
थोडक्यात एखादा तरुण सिंह जंगलात एखाद्या
कळपावर कब्जा मिळवण्यासाठी त्या कळपाच्या बुजुर्ग राजाला आव्हान देतो आणि झुंज
देतो, थोडासा तसाच प्रकार. फक्त रणांगण वेगळे..
कुठेतरी जोको जिंकावा असे वाटत नक्कीच
होते. पूर्वीचा आक्रसताळेपणा करणारा जोको गेल्या काही वर्षांत चांगलाच शांत झालं
आहे. आणि त्याची हजरजबाबी आणि नर्मविनोदाने नटलेल्या त्याच्या मुलाखती, हे ऐकायला खरंच मजा येते. एका घासात दोन
विक्रम त्याच्या पदरात पडणार होते.
त्यामुळे नकळत का होईना, पण लोलक नक्कीच त्याच्या बाजूने झुकलेला होता.
त्यात पुन्हा चिरंजीवांचे माप अल्काराझच्या पारड्यात.
म्हटलं, व्वा .. अंतिम लढत सर्व अर्थाने संस्मरणीय होणार अश्या खात्रीनेच ठाण
मांडून बसलो. पहिला सेट जोकोने ज्या पध्दतीने घेतला, किंचितशी का होईना, पण मनात
शंकेची पाल चुकचुकली, फ्रेंच ओपनची पुनरावृत्ती तर नाही ? पण नियतीच्या मनात वेगळाच
खेळ चालू असावा. दुसरा सेट टायब्रेकर मध्ये जाऊनही जोकोकडून ज्या काही चुका
झाल्या, त्या केवळ अनाकलनीय होत्या, इतक्या unforced errors? तो सेट अल्काराझने खाल्ला. 27-28 ड्यूस होणारे दोन-तीन गेम्स तर केवळ अप्रतिम! काहीच्या काही क्षमतेचं
प्रदर्शन दोघांनीही केलं. अनुभव आणि ताकद ह्यातलं द्वंद्व पुरेपूर मनोरंजन करून
गेलं. काय ते पदलालित्य, काय ती चपळाई, काही सेकंद अगोदरच समोरच्याचा अंदाज
घेण्याइतकी तल्लख बुध्द्धी, योजलेला फटका क्षणार्धात बदलण्याची चतुराई, सगळंच आवाक्याबाहेरचं. परंतु, त्यानंतर जोकोचं काहीतरी बिनसलंच. तिसरा सेट तर त्याने सरळ आंदण म्हणूनच जणू
देऊन टाकला. दोन वेळा सर्व्हिस भेदली गेली, एकूणच काही झेपण्यासारखं नव्हतंच त्या
सेटमध्ये , इतकं एकतर्फी मामला झाला. चौथा सेट पण असाच जातो का असं वाटत असतानाच
दोन वेळा अल्काराझची सर्व्हिस भेदून तिसऱ्या सेटचं सगळं उट्ट काढलं.
चला, दोन सेट्स ऑल..
ह्या घडीस्तोवर केव्हाच साडेतीन तास
उलटून वेळ पुढे गेल्याचं कोपऱ्यातील आयबीएमचे ते ऐतिहासिक घडयाळ दाखवत होते. पाचवा
आणि अंतिम सेट. जणू फुटबॉल वर्ल्ड कपची पुनरावृत्तीच. तिथेही पेनल्टी शूटआउट
पर्यंत वेळ आलीच की. जोको मोठ्या निर्धाराने सर्व्हिस करायला सज्ज झाला. एका उत्तम
खोलवर केलेल्या सर्व्हिसमुळे पहिला गुण खिशात. त्यानंतर काय झालं, कळलंच नाही, परत
इतक्या unforced errors त्याच्याकडून झाल्या की जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू तो हाच का ह्याची जणू शंकाच
यावी. जवळपास नांगीच टाकली जोकोने. म्हणजे नक्की क्रेडिट कुणाला द्यावं असा प्रश्न
पडला. अल्काराझच्या उत्तम खेळाला की जोकोच्या धसमुसळेपणाला ? पण परिणाम मात्र
अपेक्षित तोच झाला. अंतिम आणि निर्णायक सेटमध्ये जोको मागे पडला. सर्व्हिस भेदली
गेली. तिथेच जणू सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. आणि अखेरीस जवळपास साडेचार
तासांच्या कडव्या लढाईनंतर जोकोने मान टाकली.
टेनिसच्या जगतात एका वीस वर्षीय
झंझावाताचा प्रवेश मोठ्या दिमाखात झाला होता. फेडेक्स आणि जोको ह्या दोघांनीच
मुख्यत: गेले दशकभर त्या हिरवळीवर मनसोक्त राज्य केलं होतं. हे दोघे त्या राज्याचे
अनभिषिक्त सम्राट होते. पण त्या साम्राज्यावर अखेर घाव पडलाच, आणि तो ही एका
नवख्या, कोवळ्या सरदाराने घातला. जिथे इतर बरेच सीडेड खेळाडू पहिल्या दोन-तीन फेऱ्यात फेऱ्यांत धारातीर्थी पडत होते, तिथे हा
जवान आपली मुळे घट्ट रोवून उभा होता. आणि अशक्यप्राय उद्दिष्टाकडे वाटचाल करत होता.
इंग्लिशमध्ये एक वाक्य सर्रास वापरलं जातं He had nothing to lose (त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं). पण इतका क्षुल्लक दृष्टिकोन न
ठेवल्यामुळेच कार्लोस अल्काराझ जिंकला.
आणि जोको हरल्यामुळे सेंटर कोर्टचे
गवतही तसेच राहिले, नाहीतर नेहमीप्रमाणे जिंकल्यावर थोडेसे गवत त्याने पोटात
नक्कीच ढकलले असते. कुणाचे काय आणि कुणाचे काय?
असं म्हणतात की , Change is the only
constant in life. ह्यामुळेच तर खेळ आणि खेळाडू; आणि
पर्यायाने प्रेक्षक असे सगळेच परिपक्व होत असतात.
Ü मिलिंद फडके
(१७ जुलै २०२३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा