|| जय गणेश ||
नाव – वेगळपण
शाळा सुटते
शाळेच्या बाहेर मुलं आणि मुली
सौरभ – काय यार, गौरांग.. आता अजून एक प्रोजेक्ट करायचा का .. आहे तेच काही नीट नाही होत माझं आणि त्यात अजून एक .. (पूर्ण वैतागलेला)
गौरंग – अरे सौऱ्या.. हे बघ करायला तर लागणारच..
सौरभ – हे अभ्यासू बाळा, आपलं सगळं पूर्ण असतं आणि प्रोजेक्ट म्हटल्यावर अगदी संचारतच रे तुला.
गौरांग – आणि खेळायच म्हटल्यावर जसं तुझ्या अंगात भिनत तसचं.. चल आई आली..
सौरभ – काकू, बघा ना आता अजून एक उपक्रम सांगितलंय करायला..
G आई – आता कुठे जायचे आहे तुम्हाला..
गौरांग – आई, तू नको टेन्शन घेऊ नको.. आम्ही करतो सगळं.. ये तू उद्या घरी..सुट्टीचा सदुपयोग करूया
सौरभ – ए मी जास्त वेळ नाही बसणार.. आताच सांगतो…
इकडे काही मुली
श्वेता – ए तू घरी पोहचली की लगेच आई शी बोलून वेळ सांग
प्राची – हो नक्की, पण तू सुरुवात कर. मी ही आता घरी जाऊन काही सुचतय का बघते.
श्वेता – अग सुरुवात करावीच लागेल. वाटतो तितका सोपा नाही हा उपक्रम.
गौरांग चे घर
सौरभ – चल रे पटकन आवरत घेऊ या म्हणजे थोड तरी खेळता येईल.
गौरांग – बस.. हा तर आपला विषय आहे की “दलाच वेगळेपण”
सौरभ – हे बघ मी काही मुद्दे काढले आहेत
१. आपलं दल हे सांघिक आहे म्हणजेच आपण वैयक्तिक खेळ शक्यतो खेळत नाही.
२. शाळेबरोबर दलाची उपस्थिती सुद्धा तितकीच महत्वाची आहे
३. आपल्या प्रशालेतील मोठे दादाच दल घेतात त्यामुळे दलात काय अडचणी येऊ शकतात किंवा अजून काय सुधारणा हव्यात हे त्यांना नियोजन करायला सोपं जातं
४. सांघिक खेळ खेळताना कोण कोणता खेळ चांगला खेळतोय हे हेरून स्पर्धेसाठी त्यांना उतरवणं.
५. दलात मोठ्या दादांचं नियोजन बद्ध काम बघून आपणही त्याच शिस्तीचं आणि नियमांच पालन अगदी सहजपणे करतो.
६. आपल्या दलात इतर शाळेतील मुलं सुद्धा सहभागी होऊ शकतात.
७. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दलासाठी कोणतीही फी आकारली जात नाही
गौराग – अबब्ब .. अरे यार.. तू तर सिक्सर च मारलास आणि म्हणे मला बॅट पण नीट धरता येत नाही..
सौरभ – दल आपला आवडीचा विषय.. खेळ आणि मी.. बास बाकी काही नको. पण तू अजून काही वेगळे मुद्दे काढले का
गौरांग – तू जे सांगितले ते अगदी खरं आहे पण आपले प्राचार्य आणि दादा ह्यांच्या बोलण्यात काही गोष्टी ऐकल्या आहेत .. ऐक
१. वैयक्तिक खेळापेक्षा सांघिक खेळात शारिरीक क्षमता बरोबर मानसिक आणि वैचारिक क्षमतांचा कस लागतो.
२. मातीत रगडून खेळल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
३. प्रत्येकाला सामावून घेऊन पुढे जायचं हे मनावर बिंबल जात
४. तसेच वेगवेगळ्या मुलांशी खेळताना आणि भांडताना क्षणभराचा राग आणि आयुष्यभराची मैत्री करायची हे शिकतो..
सौरभ – एक नंबर.. अगदी मनातल बोललास.. झाला आपला उपक्रम.. हेच नीट सादर करूया.
गौरांगची आई – वाह.. खरचं खूप छान मुद्दे काढले आहेत तुम्ही.. दलाची ही बाजू पालक म्हणून माझ्या सुद्धा कधी लक्षात नाही आली. आम्हाला आपल दल म्हणजे मातीने भरलेले कपडे आणि बूट.. त्यामुळे आमचा वाढणारा धोबीघाट एवढच वाटायचं आम्हाला.. छान मांडलं आहे तुम्ही आणि हे सगळं तुम्हाला जाणवलं हे खर दलाचं श्रेय.. चला आता खा थोड..
इकडे प्राचीचं घर
प्राची – आई, बघ ना अजून श्वेता आली नाही..कधी सुरू करणार .. कधी संपणार. मला आज सुट्टी आहे तर तिच्याबरोबर मस्त वेळ घालवायचा आहे.
प्राचिची आई – अग जरा धीर धर.. येईल ती. तोपर्यंत तू सुरुवात कर. ती तिच्या आईबरोबर निघाली आहे.
प्राची – उपक्रम – “प्रबोधिनीच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण”
बेल वाजते
प्राचीचि आई – प्राची, आली ग तुझी मैत्रिण
प्राची – ए आई, तू थांब. मी उघडते. Hi.. श्र्वेता किती वेळ ग.. मावशी ये ना आत. आई मावशी पण आली आहे. मी श्वेताला माझ्या खोलीत नेते. बस ग इथे.
प्राची ची आई – प्राची हे घे पाणी आणि खाऊ. आता पटापट करा काय करायचं आहे ते करा. तोपर्यंत मी आणि मावशी बोलतो. हो आणि मावशीला पुढे काम आहे. त्यामुळं लवकर करा..
प्राची – बरं.. मोठ्याने .. ए चल ग श्र्वेता.
श्वेता – चल .. हे बघ मी ही माहिती लिहली आहे.. तू पण लिहली आहेस ना
प्राची – हो.. तू आलीस तेव्हा तेच करत होते..
१. प्रबोधिनीच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण हे मूर्ती प्रतिष्ठापना ते विसर्जन मिरवणूक ह्यातील प्रत्येक गोष्टीत आहे.
२. वेळेचं नियोजन, कार्यक्रमाची आखणी, खास मुलांसाठी वैयक्तिक, सांघिक, शारीरिक आणि मानसिक उपक्रमांची रेलचेल.
३. प्रत्येकाला सामावून घेताना वेळेत सुरू होणारा कार्यक्रम वेळेतच संपन्न होईल ह्याच काटेकोर नियोजन
४. पथकं, त्यांचा सराव, त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची जमवाजमव करणं, ही जबाबदारी प्रयेकाने घेणं.
५. गणपतीपुढे मंडळात किंवा घरी जाऊन अथर्वशीर्ष सादर करणे.
श्र्वेत – प्राची तुला आठवतंय का आपण अथर्वशीर्ष सादर करताना त्या घरातील किंवा मंडळातील कार्यकर्ते तसेच रस्त्यावर येणारे जाणारे लोक थांबून आपल्या बरोबर म्हणायचे. तसेच जाताना रोज या ह..प्रसन्न वाटतं असा प्रेमळ आग्रह करायचे.
प्राची – हो अगदी बरोबर . कसलं छान वाटायचं तेव्हा. आणि कोणी जर प्रसाद दिला किंवा सत्कार करणार म्हणाले तर आपण शांतपणे शक्यतो नको असं म्हटलं की त्या सगळ्यांना अजून आश्चर्य वाटायचं.
श्वेता - हो ना आता माझी माहिती ऐक बरं का
१. आपले संस्थापक अप्पासाहेब ह्यांनी ढोल वादनाची परंपरा सुरू करून पुण्याच्या गणेशोत्सवाला पारंपरिक ओळख दिली.
२. गणेशोत्सव साजरा करताना कोणालाही कसलाही त्रास होणार नाही ह्याची पूर्ण खबरदारी घेणं आणि त्याच पद्धतीने नियोजन करणं.
३. विशेषतः विसर्जन मिरवणूक ही वेळेत सुरू करून वेळेतच पार पाडणे.
४. गणेशोत्सवात मुलांबरोबर काही उपक्रमांमध्ये पालकांना सुद्धा सहभागी करून घेणं. त्यांना सुद्धा एक मंच उपलब्ध करून देणे.
प्राची – अगदी खरं आहे.. यावर्षी तर अभीव्यक्ती सादर करण्या बरोबरच आपले आई आणि बाबा पालक बर्ची सुद्धा खेळणार आहेत.
श्वेता – आपले आई बाबा आहेतच की त्यात. मज्जा येणार आहे.
प्राची – म्हणजेच काय तर उत्सव साजरा करताना, आपल्याला सामाजिक भान खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच बरोबर प्रत्येकाला त्यात सामावून घेऊन आनंद वाढवता येणं गरजेचं आहे.
श्वेता – आणि हेच आपल्या गणेशोत्सवाचे वेगळेपण आहे.. कळलं का..
प्राचीची आई – कळलं बरं का.. आता थोड खाऊन घ्या. कारण तुम्हाला खायची आठवण करणं आणि वेळेत सोडण हेच आमचं काम झालं आहे आता. चला चला .
मुलांचे उपक्रम शाळेत वाचताना ताई किंवा आप्पांच आत्मकथन
“सुंदर रेखाटलं आहे मुलांनी.. एरवी सतत मस्ती, मजा आणि भांडाभांड करणारी ही खोडकर, काहीशी बंडखोर मुलं निरीक्षण मात्र अचूक करत आहेत. खरंच ज्ञानाचे अजून थोडे पैलू पाडले की त्यांच्या मनाला, बुद्धीला, शरीराला आणि विचारांना एक वेगळंच तेज येईल. आणि ह्या सगळ्यातून जो तेजस्वी हिरा तयार होईल तो येणाऱ्या उज्ज्वल भविष्याचा माग घेणारा आपला प्रबोधक असेल ह्यात शंका नाही.”
शुभं भवंतु 🙏🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा