बर्चीनृत्य – एक निखळ आनंद
आज अनंत चतुर्दशी, आपल्या लाडक्या बाप्पाला
निरोप द्यायचा दिवस.. दहा दिवसांपूर्वी गणेशचतुर्थीला “गल्ली ते दिल्ली” अश्या
सर्वच ठिकाणी स्थानापन्न झालेल्या आणि आपल्या घरातील जणू एक सदस्यच बनलेल्या
लाडक्या व्यक्तीची सुखरूप पाठवणी करण्याचा दिवस...एक हवाहवासा पाहुणा म्हणून दहा
दिवस मुक्कामी येणाऱ्या गणरायाच्या आगमनाची निव्वळ चाहूलही आपल्या मराठी मातीत
चैतन्य निर्माण करते. आणि हे चैतन्य सर्वव्यापी असते, अगदी घरगुती ते सार्वजनिक.. सार्वजनिक
मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे जसे वेध लागतात, त्याहूनही जास्त मिरवणुकीचे असतात.
Born and brought up मुंबई असल्याने आणि ते
ही अगदी खास शिवाजीपार्क भागात वाढल्यामुळे मुंबईची अनंत चतुर्दशीची मिरवणूक
नक्कीच खोल स्मरणात आहे. दादर चौपाटी ते गिरगाव चौपाटी असे सगळीकडे आम्ही उनाडक्या
करायचो, अगदी उसंत नसायची. शाळेत असताना दादर चौपाटीवरचे नेहमीचे गणपती झाल्यावर,
उत्सुकता असायची ती नाना पाटेकरच्या गणपतीची. अगदी साध्या वेषात नाना पूर्ण
मिरवणूक दादर चौपाटीवर जाईस्तोवर भेटत असे. आणि त्या मिरवणुकीचे दुसरे वैशिष्ट्य
म्हणजे जुने लालटेनचे पन्नास-साठ दिवे.. बाकी चकाचक दिव्यांच्या रोषणाईत ती
मिरवणूक खूप छान वाटायची. ती झाली की मग दादर स्टेशन गाठायचे आणि लोकल पकडून तडक चर्नीरोड
स्टेशन. मग तिथे गिरगाव बॅकरोड किंवा वल्लभभाई पटेल रोडवर मिळेल ती जागा पकडून
लालबाग आणि गिरगावच्या उंचच उंच, अगदी तीस-पस्तीस फूटी मूर्ती बघायच्या हा शिरस्ता
होता. हल्लीच्या भाषेत, ते शास्त्र होते.
असो... पुण्यात आल्यानंतरचा पहिला
सांस्कृतिक धक्का बसला तो इथेच. मिरवणुकीतल्या गणपतीची मोठी मूर्ती परत मंडपात
जाते, हे झेपलंच नाही. इतक्या वर्षांची मुंबईची सवय!! श्रीगणेशाची मूर्ती कितीही
मोठी असली तरी ती समुद्रातच विसर्जीत केली जाते, हे समीकरण मेंदूत पक्कं बसलेलं. अगदी
नाही म्हणायला महाविद्यालयीन काळात पुण्याची मिरवणूक बघायला आलो होतो, पण तेव्हा
विसर्जनाच्या घाटापर्यंत जायची कधी वेळ आली नव्हती. आता हे सांगणे न लगे, की
अर्थात ह्याला पुण्याची भौगोलिक परिस्थिती कारणीभूत आहे, आणि त्यातही स्थानपरत्वे,
कालौघाने चालत येणाऱ्या बाबी ह्यांची जोड मिळतेच.
नमनाला घडाभर तेल घालून झालं आहे, तेव्हा
मूळ मुद्द्यावर येतो.
ज्ञानप्रबोधिनी आणि ढोल-ताशा-बर्चीनृत्य हे
समीकरण पुणेकरांना नवीन नाहीये. ज्ञानप्रबोधिनीसारखी वेगळी शैक्षणिक चळवळ उभारणारे
माननीय आप्पासाहेब पेंडसे हे सगळ्याचे मूळ प्रेरणास्त्रोत. आज जी काही ढोल-ताशा
पथकांची ख्याती वाढली आहे, ह्याचं निर्विवाद श्रेय ह्या जाणत्यानेणत्या
नेतृत्त्वाला जातं. ढोल-ताशा पथकांच्या उभारणीमागे काय बरं कारण असावं? ह्याचं
नेमकं उत्तर आपल्याला मिळतं. साडेतीन-चार दशकांपूर्वी कदाचित मिरवणुकीच्या दिवशी
चालणारा थिल्लरपणा, बीभत्स हावभावाची नृत्ये, गुलालाची अनिर्बंध उधळण यापेक्षा काही
वेगळे वळण या मिरवणुकीला लावता येणार नाही का? किंवा त्या
निरोपाच्या कातर क्षणांचा आपण असा विचका का करून टाकतो? असे
अस्वस्थ करणारे प्रश्न आप्पा पेंडसे नावाच्या द्रष्टय़ा शिक्षणतज्ञालाच पडू शकतात.
आणि त्यातूनच जन्म झाला एका आगळ्यावेगळ्या प्रयोगाचा! ‘ढोल-ताशा-बर्ची-ध्वजपथक’ हे
त्याचं नाव.. गणपती विसर्जन मिरवणुकीत जोशपूर्ण बर्ची नृत्य करणाऱ्या आणि त्याला
ढोल-ताशाची दमदार साथ देणाऱ्या पथकांची उभारणी आप्पांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आणि
त्याचा सकारात्मक परिपाक म्हणजे गेली अनेक वर्षे नित्यनेमाने युवक-युवतींची अशी
नृत्य-वादक पथके पुण्याच्या मिरवणुकीत सहभागी होत आहेत.
इयत्ता पाचवीमध्ये चिरंजीव
ज्ञानप्रबोधिनीमध्ये प्रवेश करते झाले. आणि ह्यासगळ्या गोष्टी अगदी जवळून अनुभवता
आल्या. किंबहुना तो प्रवास अजूनही चालूच आहे. लहानपणापासून संघसंस्कारात
वाढल्यामुळे शिस्त कधीच नवीन अशी नव्हती. कळत्या वयापासून रा स्व संघाचं विजयादशमी
संचलन हे केवळ परदेशातला आणि परगावातला काही काळ वगळला तर कधीच चुकलं नाहीये. पण
अनंत चतुर्दशीला होणारी प्रबोधिनीची विसर्जन मिरवणूक ही सर्वार्थाने अद्वितीय आहे.
काय नसतं हो ह्या दिवशी? एका ठिकाणी प्रबोधिनीच्या ह्या पथकांसंदर्भात ना फार छान
वाक्य वाचायला मिळालं --
पथक म्हणजे अमाप जोश आणि सळसळता उत्साह.
पथक म्हणजे फुरफुरते बाहु तरीसुद्धा कडक शिस्त.
पथक म्हणजे अतूट मैत्री आणि घट्ट नाती.
पथक म्हणजे सामाजिक हेतू आणि अर्थपूर्ण संघटना!
ह्याचाच अर्थ हे पथक हा निव्वळ माणसांचा समूह
नसून एका ठरविक उद्देशाने एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांचे ते मोहोळ आहे. पाचवीपासून
आजपावेतोवर, अर्थात मधली कोरोनाची दोन वर्षे वगळून, नैमित्तिक काही ना काही वेगळं
चिरंजीवांच्या (आणि पर्यायाने आमच्याही) पदरात पडतच आहे. मागच्या वर्षी बर्चीनृत्य
ह्या प्रकाराची खऱ्या अर्थाने ओळख झाली. मागच्या गणेशोत्सवात चारपाच ठिकाणी चिरंजीवांची
प्रात्यक्षिकेही बघितली. आणि मुख्य म्हणजे प्रबोधिनीची मिरवणूक बघायला गेलो असताना
बर्चीनृत्य खूप जवळून पाहता आले. कडी म्हणजे काहीही येत नसताना अगदी आयत्या वेळेस
दहा पंधरा मिनिटे मुलांबरोबर बर्ची केली सुद्धा होती तेव्हा. कुठला हात,
त्याच्याशी संलग्न कुठला ताल, असे काहीही माहीत नव्हते, तरी करू शकलो आणि तेव्हाच
खूणगाठ बांधली की पुढच्या वर्षी व्यवस्थित शिकून बर्ची करायची.
नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.
विरंगुळा आणि मनोरंजन हे मुख्य हेतू. पण युद्धातील विजय साजरा करणे हे सुद्धा
नृत्याचे एक प्रबळ कारण असूच शकते की .. तर, बर्ची हे एक भाल्यासारखे मात्र लाकडी
मूठ असणारे शिवकालीन शस्त्र आहे. तिचा उपयोग सोळाव्या व सतराव्या शतकात पेशवेकालीन
सैन्यामध्ये केला जात असे. साधारणपणे हल्लीच्या गरबानृत्यात वापरल्या जाणाऱ्या
दांडिया किंवा टिपरीसारखं हे शस्त्र आहे. जोशपूर्ण आणि उत्साहवर्धक असं हे बर्ची सामुहिकनृत्य
लहान-थोर सर्वांना पटकन आकर्षित करून घेतं. ह्या बर्चीनृत्याला ताल द्यायला म्हणून
वाद्यगट (ढोल पथक) सुरु झाले. कालांतराने यातील ढोलवादनाचा ठेका लोकांना जास्त
आकर्षक वाटला, की ढोल-ताशा वादन हेच एक वेगळा प्रकार म्हणून पुढे आलं. पुढे
फक्त "ढोल-ताशा" वाजवणारी अनेक पथकं तयार झाली. आज पुण्यातील
मिरवणुकातून जे लयबद्ध वादन, ध्वज नृत्य व एकत्रित शिस्तबद्ध
नृत्य दिसतं त्याची मुळे ज्ञानप्रबोधिनीच्या "बर्चीनृत्य-वाद्य वादन"
ह्या प्रकारात दडली आहेत. अर्थात, पुढे ढोल ताशा वादन हाच एक
स्वतंत्र गट तयार झाला व हे सामुहिक बर्चीनृत्य मागे पडलं
मला कधीकधी एक ढोबळ गणित मांडावसं वाटतं.
अर्थात हे माझ्यापुरेसं आहे, ह्यावर दुमत नक्कीच असू शकतं... आमच्या वेळचा (म्हणजे
नव्वदीच्या दशकातला) बालमोहन विद्यामंदिर शाळेचा “ब” वर्ग (हुशार मुलांची तुकडी)
(+) रा स्व संघ संस्कार म्हणजे ज्ञानप्रबोधिनी.. हा लेख वाचणारे जे मुंबईकर आहेत,
त्यांना कदाचित हे लक्षात येईल. सुदैवाने मला दोन्ही मिळाले आहे. बालमोहन विद्यामंदिर, दादर ह्या शाळेने
आमच्यावर जे काही उत्तम संस्कार केले, त्यात एक सुंदर संस्कार लेझीमचा केला होता.
आणि अस्मादिक लेझीम खेळण्यात शाळेत असताना बऱ्यापैकी पारंगत होते. सातवीत आणि
आठवीत परदेशी पाहुण्यांसमोर सुद्धा लेझीम खेळल्याचे चांगलं स्मरणात आहे. तेव्हा निवडललेल्या
लांमध्ये मी पण होतो. पुढे रा स्व संघाच्या शाखेत दंडप्रात्यक्षिक,
समताप्रात्यक्षिक करायला लागलो आणि सलग दोनतीन वर्षे शस्त्रपूजनाच्या उत्सवात रा
स्व संघाच्या भागपातळीवर ही प्रात्यक्षिके केली आहेत. पण दोन्ही ठिकाणी थोडा
मर्यादित समूह होता. आणि मुख्य म्हणजे ती प्रात्यक्षिके दुसऱ्या कुठल्या
वाद्याबरोबर एकत्र/संलग्न केली नव्हती. त्यामुळे हा सर्वस्वी वेगळा अनुभव होता आणि
ही संधी दवडायची नाही, ही खूणगाठ पक्की होती. आणि आपण करू शकू हा विश्वास होता. ह्या
सगळ्याच प्रात्यक्षिकांमध्ये जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे , ती म्हणजे संघभावना
आणि तादात्म्य(synchronisation)... कुठलीही क्रिया जेव्हा अनेक जण एकाच वेळेला
करतात, तेव्हा ते किती प्रेक्षणीय असतं ते मी वेगळं सांगायला नको... अर्थात मला हे
नक्कीच नमूद करायला आवडेल की एकूणच सिनेसंगीतातील नाचकाम आणि मी हे अगदी व्यस्त
समीकरण आहे. ऑफिसच्या कुठल्याही पार्टीत मी कधीच त्या गदारोळात पडत नाही. मात्र एक
गोष्ट नक्की, तबल्याची आवड असल्याने, अजूनही तबला वाजवत असल्याने आणि पूर्वी अनेक
वेळा कथ्थकला साथ केल्यामुळे थोडेफार कथ्थक कळते. अर्थात ते सुद्धा चक्रधार,
तुकडे, तोडे एव्हढेच मर्यादित आहे. थोडक्यात, कथ्थकमधला तांत्रिक भाग थोडा कळतो. पण
बाकी ह्या क्षेत्रात शून्य.. परंतु, एकूण बर्चीनृत्याकडे बघण्याचा माझा एक वेगळा
दृष्टिकोनही होता. आणि तो म्हणजे व्यायामाचा. माझा तर्क अगदी स्वच्छ होता.. नृत्य,
graceful नृत्य वगैरे जाऊ देत. कदाचित येतील किंवा न येतील.. पण हा
एक उत्तम सर्वांगसुंदर cardio workout आहे. आणि त्यादृष्टीने
तरी नक्कीच बर्ची नृत्य एकदम फक्कड आहे. बाकी गोष्टी आपसूकच येतील असं मनाशी ठरवून
पालकांच्या गटात नाव समाविष्ट केले.
तर साधारण दीडेक महिना आधी ह्या एकूण
प्रक्रियेला सुरुवात झाली. आणि आमचा मास्तर गणेशदादा डांगी ह्याने गियर टाकला.
सुरुवातीलाच सांगतो की आज आम्ही दीड तास जी काही बर्ची करू शकलो त्याचे सगळे श्रेय
गणेशला आहे. गणेशशी तशी ओळख होतीच. बरेचसे गुण जुळतात हे ही कळले होते, त्यामुळे
तशी अडचण कुठलीच नव्हती, येण्याचं कारणही नव्हतं. किमान बत्तीस जणांचा गट तयार
करायचा ह्या हेतूने गणेशने त्याचे पंख पसरायला सुरुवात केली. त्याच्यापुढे दुहेरी
काम वाढून ठेवले होते. पहिले म्हणजे आम्हा पालकांना अगदी प्रारंभापासून शिकवणे आणि
शक्य तितक्या माजी विद्यार्थ्यांशी संपर्क करून, त्यांना गोळा करून शेवटच्या
मिरवणुकीत अधिक मोठा गट उभा करणे. व्यवस्थित वेळापत्रकाची त्याच्या मेंदूतील
कोष्टके पक्की असणार, त्याशिवाय आजचे हे यश अशक्य होते. बर्चीचा इतिहास/माहिती
इथपासून त्याने आम्हाला एकएक धडा द्यायला सुरुवात केली. साध्या, छोट्या पावलांच्या
हालचालीपासून ते निरनिराळे हात, हा प्रवास आम्हा नवख्या मंडळींसाठीही विस्मयकारक
होता. आता मागे वळून पाहता कळते की किती आपसूक तो केला गेला. फार आणि वेगळे कष्ट न
उचलताही इथवर दीड महिन्यात सर्वांनी पोहचणे हे खूप समाधानकारक आहे. प्रबोधिनीच्या
गच्चीवर एकएक हात घोटत होतो आणि पर्यायाने हाता-पायात बसवत होतो.
एक, दोन, तीन, चार .. एक, $$ दोन, $$
आठवड्यातून चार तास भेटत होतो आणि नवनवीन
काही शिकत होतो. एकूण सात हात करायचे ठरले आणि ते नीट शिकून घेतले. आता दोन
गोष्टींवर काम सुरू झाले. शिकलेले हात पक्के करणे आणि मुख्य म्हणजे शरीरक्षमता
तयार करणे. वयोमानानुसार शारीरिक हालचाली कमी होणे, दम लागणे हे नैसर्गिक आहे.
त्यावर मात करायची होती. मुलांशी आपली तुलना करायची नाहीच, ते होणे केवळ अशक्य
आहे. परंतु उगीचच कसलाही न्यूनगंड बाळगायचा नाही, हे ही ठरवले होते. चूक होणे
स्वाभाविक आहे, त्यावर पांघरूण न घालता सुधारणा कशी होईल, हेच बघावे नाही का?
आपल्या चुकीमुळे एकूण गटाला नामुष्की येऊ नये, हीच खूणगाठ बांधली होती. आणि तोच
उद्देशही होता. हा सरावाचा प्रवास हळूहळू वाद्यगटाबरोबर करायच्या टप्प्यावर येऊन
पोहोचला आणि तिथेच खरी परीक्षा घेतली गेली. चुकणाऱ्या मंडळींना धीर देणे आणि
बऱ्यापैकी करू शकणाऱ्या मंडळींना अधिक उभारी देणे अशी दुहेरी वाट गणेशपुढे आली.
मजल दरमजल करत ह्या निर्णयापर्यंत गट येऊन ठेपला की एक प्रात्यक्षिक आणि अर्थातच
अनंत चतुर्दशीची मिरवणूक ही दोन्ही लक्ष्ये तडीपार न्यायचीच हे पक्कं ठरलं आणि
प्रत्यक्षातही उतरलं. जी एस टी कॉलनी इथे मुलांच्या गटाबरोबर अर्ध्या तासाची दोन
आवर्तने पूर्ण करू शकलो. आणि आजची पूर्ण मिरवणूक.
"पहिला हात नक्की कुठल्या पायाने सुरू
करायचा? डावा पाय–उजवा पायबदल करताना अजूनही थोडा गोंधळ होतोय रे.. आणि पहिला हात
संथ लयीतच घेणार आहेत ना? "
"मिलिंद, तू पहिल्या ओळीत आहेस, तुझे
बघून मी करणार. तू चुकलास तर अख्खी रांग चुकेल"
"अरे, ते बर्च्या ठेवलेलं पोतं
कुठे आहे?" .... "मी ते स्वप्नीलदादाला दिलं?
... "अरे यार, ते आपलं होतं, बघ कुठे आहे ते"
“दहाव्या हाताला आधी डावीकडे का उजवीकडे?”
“किती हातांना सहा टाळ्या आहेत रे?””
"फोटो काढुयात की सगळेच आले आहेत तर"..
"इथे नको, कुमठेकर रस्त्यावर काढू"
"दोघादोघांनी करून ते पोतं उचला
रे"... “सांभाळून, कमरेवर जास्त वजन नको, पुढे बर्ची आहे अजून”
"चला की अरे, किती ती
टंगळमंगळ?"
एकीकडे ही शेवटची घोकंपट्टी आमच्या
आजूबाजूला चालू होती. दुसरीकडे ‘उपा’मध्ये श्रीगणेशाची आरती चालू होती. ती संपताच
गाड्यावर गणेशाला स्थानापन्न करायचे होते, ती धावपळ सुरू झाली.
विश्रामबाग वाड्यापासून अगदी दोन चौक अलीकडे
पर्यंत फक्त गुलाबी आणि आकाशी रंगाचे वास्तव्य होते.
"सावधान" ची सूचना मिळताच अवघं ते
गणवेशाचे अवकाश स्तब्ध उभे राहिले. "ध्वजनमस्ते" झाल्यानंतर ताशा वाजू
लागला, क्षणार्धात त्याला ढोलाची खणखणीत साथ मिळाली आणि मग अवघ्या कुमठेकर
रस्त्यावर कलाकारांचा "कल्ला" सुरू झाला. निरनिराळ्या गटांमध्ये
शिट्टीच्या संकेतांवर
बर्ची सुरू जाहली, ध्वज
उंचावू लागले. आणि म्हणताम्हणता तीन आवर्तने पार पडली सुद्धा.. आज मिरवणूक यशस्वी
पूर्ण केल्यानंतर, मुख्य म्हणजे अर्ध्या तासाची तीन आवर्तने सलग केल्यानंतर जे
काही मानसिक समाधान आहे, ते काही और आहे, शब्दातीत आहे, आत्मविश्वास वाढवणारे आहे.
शरीरक्षमता अजूनही ठीकठाक असल्याचे हे द्योतक आहे. त्याखेरीज काही दाने आपसूकच
पदरात पडली; नवीन मित्र मिळाले, प्रबोधिनीत थोडी अजून कळली वगैरे. गेल्या काही
दिवसांत कदाचित आम्ही आमचे बाल्य, तारुण्य पुन्हा शोधले आणि काही अंशी नक्कीच
मिळाले सुद्धा. अतिशय खेळीमेळीच्या आणि अनौपचारिक वातावरणात हा सराव पार पडला.
परस्परसंवाद नव्याने वाढला.
इतका की मिरवणूक संपल्यावर गणेश आम्हाला
उद्देशून विचारता झालं, की पुढच्या वर्षी निईजणापासून सगळेच आपण करुयात का? ही
नक्कीच पोचपावती होती. किंबहुना, “ह्याचसाठी केला होता अट्टाहास” ..
दोन वेगळ्या गोष्टी सांगतो आणि हा
लेखनप्रपंच आवरता घेतो.
१.
तीन आठवड्यांपूर्वी सातारा हिल हाफ मॅरथॉन पूर्ण केली. अगदी
खरं सांगायचं तर काहीही फार कष्ट न घेता केवळ बर्चीच्या सरावाच्या जोरावर एक ठरावीक
वेळ ठेवून पूर्ण करू शकलो. आणि तो आत्मविशास आल्याने तीन आवर्तने करता येतील ही
भावना सुदृढ झाली.
२.
माननीय पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आज शंभराव्या ‘मन की
बात’ मध्ये प्रबोधिनीच्या तीन कामांचा उल्लेख केला. त्यात बर्ची नृत्य आणि
त्यामुळे झालेला बदल , ह्याचा आवर्जून उल्लेख केला होता.
|| गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या ||
Ü मिलिंद फडके (२८ सप्टेंबर २०२३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा