गर्जा महाराष्ट्र
"श्री गणरायाच्या आशीर्वादाने ज्ञानप्रबोधिनी पालक अभिव्यक्ती संघ सादर करत आहे 'गर्जा महाराष्ट्र'..."
अशी दमदार सुरुवात, सोमवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी, गणेशोत्सवाच्या ७ व्या दिवशी, इयत्ता ५ वी ते ७ वीच्या मुलांसमोर, खालच्या उपासना मंदिरात झाली.
त्याआधी, “प्रबोधिनीत यायचे समर्थ व्हावया, समर्थ मायभूमिला जगी कारवाया” हे पद्य विद्यार्थिनींनी सुरेख सादर केले. देह आणि देव यांच्यामध्ये असणाऱ्या देशासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर संघटित व्हायला हवे. पालक अभिव्यक्ती संघाद्वारे ह्याच कार्याची आपण रुजवात करत आहोत...
अशी संघभावना मनात आळवत असतानाच, अध्यापिका मनीषाताई कामटीकर ह्यांनी सर्व अभिव्यक्ती प्रमुखांची ओळख करून दिली तसेच आपापली कामे सांभाळून अभिव्यक्तीचा आनंद घेणार्या-देणार्या पालकांच्या पाठीवर कौतुकाची थाप ही दिली.
कौतुकाचा रंग लेवून आणि जबाबदारीची जाणीव ठेवत, सर्वप्रथम विघ्नेश्वर गणरायाची स्तुती “पंचतुंड नररुंड मालधर” ह्या नांदीतून सादर झाली. गायन, नृत्य आणि वादन अभिव्यक्तींची सुरेख गुंफण सगळ्यांना अनुभवता आली. पडद्यावर आनंददादांच्या चित्रकलेच्या अभिव्यक्तीतून एक कलाकृती आकारास येऊ पाहत होती. कुंचल्यातून ते रूप साकार होत असतानाच “बुध्दी दे शक्ती दे आमुच्या मना” ह्या आसावरीताईंनी लिहिलेल्या नाटिकेचे अभिवाचन रंगत गेले. बुद्धी आणि शक्ती दोन्हीचे महत्त्व गणपती आणि मारुती ह्यांच्या काल्पनिक पण मनोरंजक संवादातून उलगडले. आपल्या ज्ञानप्रबोधिनीचे कौतुक बाप्पा आणि मारुतीराया करतात, हे ऐकून तर मुलांना खूपच आनंद झाला. नाटिकेतला बिट्टू, ताई, आई अगदी आपण आणि आपल्या घरचेच जणू आहोत, असेच त्यांना वाटून गेले. ह्या सगळ्या पात्रांना निवेदिकेने रंगतदारपणे खुलवले. अभिवाचन ऐकताना मुलांचे चेहरे खऱ्याखुऱ्या प्रतिक्रिया देत होते. कधी हसून, एकमेकांना खाणाखुणा करत तर कधी आपले गुपित उघडकीस आले असे आविर्भाव होते. हे आम्हाला भावले, पटले आणि समजलेसुद्धा, अशी पोचपावती ह्या निरागस मनाच्या हुश्शार चेहऱ्यांनी दिली.
बॅकस्टेजची जबाबदारी सांभाळणार्या गिरीशदादांनी प्रशालेतील अनिकेतदादा व सहकार्यांच्या मदतीने पटापट नेपथ्य बदलले.
हेमांगिनीताईंनी लिहिलेल्या ओघवत्या निवेदनाने मुलांना बिट्टूच्या दुनियेतून अलगद बाहेर काढत मानवसंस्कृतीच्या जीवनधारांकडे वळवले. इये मराठीचिये नगरीत, शक्ती आणि भक्तीची सांगड कशी घालायची हे आपल्याला शिकवले ते निसर्गाने आणि संतांनी. निसर्गात नद्यांचे महत्त्व काय, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वेगवेगळ्या भौगोलिक रचनेनुसार नद्यासुद्धा किती रूपे धारण करतात ह्याचा सुरेख प्रत्यय ऋचाताईंनी लिहिलेल्या ह्या कवितांमधून आला. सायलीताई, दीपालीताई ह्यांनी ह्या कवितांना तितकाच मोहक स्वरसाज चढवला आहे.
“भीमा मुळा मुठाई नीरा सीना इंद्रायणी“ ह्या नद्या भावभक्तीने पंढरीची वाट धरतात. त्यांचा प्रवास गायन गटाने गीतातून आळवला आणि त्यावर श्रद्धाताईंनी बसवलेल्या नृत्याचे सुंदर सादरीकरण नृत्यगटाने केले.
भक्तीच्या प्रवाहात तल्लीन होऊन पुढे जात असताना एका वळणावर साक्षात् विठुरायाच भेटला... "उभा विटेवर हात कटिवर जो संतांच्या साथीने, तो परब्रह्म मी सगुण रूप मज दिले मराठी मातीने..." असे रेवतीताईंनी लिहिलेल्या शब्दांमधून बोलत त्याने आपल्या संत परंपरेची ओळख करून दिली. स्मिताताई आणि रेवतीताईंनी हे काव्यवाचन केले. ओवी, भजन, अभंग, गवळण, भारुड अशा संतरचना गाऊन गायनगटाने विठोबा-रखुमाईला साद घातली.
भक्ती आणि संतवाणी, ह्यामध्ये लीन होत हा प्रवाह आता परशुरामभूमीत म्हणजेच कोकणात उतरण्यास सज्ज झाला. परशुरामांच्या तेजाचा अंश इथल्या कणाकणात आहे. त्यामुळे इथल्या नद्याही अगदी बिनधोक सह्यकड्यावरून स्वतःला झोकून देत हा परिसर चैतन्यमय करतात. हाच कोकणातील नद्यांचा प्रवास आणि सळसळता उत्साह “उसळत उधळत “ ह्या नृत्यनाटिकेत दिसला. वादनगटाची समर्पक साथ आणि पडद्यावर साकारणारी चित्रे ह्यामुळे तिची खुमारी अधिकच वाढली.
मुलांशी संवाद साधत हा प्रवास घडवून आणणार्या मुग्धाताईंनी आता त्यांना पराक्रमाच्या तेजस्वी, ओजस्वी गाथेकडे वळवले. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वातंत्रवीर सावरकरलिखित आरती सादर झाली. सर्वार्थाने भक्ती, शक्ती आणि बुद्धी हा त्रिवेणी संगम ह्या दोन्ही व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. आरती सादर होत असताना अभिमानाने ऊर भरून येतो. आपल्या तेजाचा एक कण तरी आम्हाला लाभो, हीच तवचरणी प्रार्थना.
हाच अभिमान अगदी शब्दाशब्दातून आपल्या “जय जय महाराष्ट्र माझा” ह्या आपल्या राज्यगीतातून जागतो. मात्र हे गीत मराठीत सादर न करता, डॉ. श्रीहरी गोकर्णकर अनुवादित संस्कृत गीतातून तो तेवढ्याच ताकदीने सर्वांपर्यंत पोहचवला. प्रांजल दादाच्या साथीने म्हणजेच मूळ गायकाच्या उपस्थितीत सादर करताना एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत होती.
आता सादरीकरणाच्या शेवटी आसावरीताईंनी सूत्रे आपल्या हातात घेत, प्रत्येक अभिव्यक्ती प्रमुखांना आपापल्या गटातील सहभागी पालकांची थोडक्यात ओळख करून देण्यास सांगितले. हाच धागा पकडत मिलिंददादांनी अभिव्यक्ती समन्वयकांची म्हणजेच आसावरीताई आणि अमितदादा ह्यांची ओळख करून दिली.
अमितदादांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी पेलली. मुलांनी हा सगळा कार्यक्रम अगदी मन लावून ऐकला, बघितला आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला ह्याबद्दल दादांनी मुलांचे कौतुक केले. तसेच प्रशालेने ही संधी पालकांना उपलब्ध करून दिली ह्याबद्दल आम्ही पालक सदैव ऋणी आहोत, ही आम्हा सर्वांची भावना व्यक्त केली.
ह्यानंतर निकाल.. मुलांचे चेहरे सांगतच होते त्यांना कार्यक्रम आवडला म्हणून पण अध्यापक..त्यांना आवडला का कार्यक्रम.. ह्याचे उत्तर आता मुकुलिका ताईंच्या प्रतिक्रियेतून कळणार होते.
ताईंना कार्यक्रम खूप आवडला. त्यांनी सर्व सहभागी पालकांचे अभिनंदन केले. प्रशालेच्या उपक्रमात पालक अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात, ह्याचे त्यांनी खास कौतुक केले. अजून असे नवनवीन उपक्रम राबवत सगळ्यांनी एकत्र उन्नत होऊया, या विचाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
ह्या सर्व कार्यक्रमांचे लेखन, गायन, नृत्य, संगीत, वादन, चित्ररेखाटन आणि संयोजन हे सगळे आपल्या पालकांनी अगदी लीलया पार पाडले.
अपवाद फक्त काही पारंपरिक गीतांचा, कारण ती घेतल्याशिवाय हा प्रवास अपूर्ण होता.
परत भेटूया एका नवीन उपक्रमासहित..लवकरच… 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद!
पालक अभिव्यक्ती नियोजन गट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा