#रंग
बाळपणीचे रंग मनोहर,
कॅन्व्हास तयांना भिंतींचा;
उभ्या-आडव्या रेघोट्यांतून,
अट्टाहास बोबड्या चित्रांचा...
कौमार्याचे रंग कोवळे,
आनंदाचे सडे चहूकडे;
जिज्ञासेच्या कुंचल्यातूनी,
प्रश्नांचे फटकार उडे....
भुलवी किशोरा, रंग अबोली,
भवताल टिपी, टीपकागदापरी;
गडद-फिक्याच्या छटा साधूनी,
निसर्गनक्षी चितारी पटलावरी....
मार्गे क्रमिता त्या खुणवी निळाई,
विस्तीर्ण नभे अन् सागर-गहराई;
स्वत्व शोधण्या पंख पसरूनी,
अवकाशा कवेत घेऊ पाही....
स्थिरावलेल्या मना कधी मग,
भुलवी गुलाबी, रंग प्रितीचा;
निळ्या-पिवळ्याचे सोयर होता,
सृजनगंध दरवळे हिरव्या मातीचा....
दोन ध्रुवांवर, फिरूनी बाळपण,
रंग सात तरी धवलची वास्तव;
न्हाते पूर्वा अरूणिमेने तर,
शांत पश्चिमा क्षितीजी अरुणास्तास्तव....
@अर्चना खिस्ती-गोरकर.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा