लेबल

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

बालसरस्वती

     बालसरस्वती


वासंती नेहमी प्रमाणे आजही आजी आबां बरोबर व्हिडिओ कॉल मध्ये होती. पण नेहमी प्रसन्न, आनंदी खेळकर आणि हसरी असणारी आजी-आबांची जोडगोळी आज नाराज आहे हे तिच्या चाणाक्ष नजरेनं पुरतं हेरलं. हाच अनुभव तीला परत दोन – तीन वेळा आला. यांचं काहीतरी बिनसलंय याची तिला पक्की खात्री झाली आता. पण तिने त्या दोघांना तसं जाणवू दिले नाही. तिच्या परीने आजी-आबांना खुलवण्याचा प्रयत्न करत राहिली पण दोघेही हवे तेवढे खुलले नाहीत. या गोष्टीमुळे वासंती पुरती बेचैन होती आज. कशातच लक्ष लागत नव्हतं तिचं. आणि का लागावं ? तिचं आणि आजी-आबांचे बॉण्डिंगच तसं होतं.  बडीज् होते ते एकमेकांचे. एकमेकांच्या आयुष्यातील पोकळी भरून काढणारे.. !! 

         वासंतीची बेचैनी तिच्या आईने अचूक हेरली. रात्री आईने विचारल्यावर वासंती ढसाढसा रडायलाच लागली. रात्रभर आई समजावत होती तिला. एव्हाना वासंतीलाही सगळ्या परिस्थितीची जाणीव झाली होती.

          मार्चचा महिना, मुलांना परीक्षेचे वेध लागलेले. आई-बाबांना मुलांचा अभ्यास, घर व ऑफिसचे काम आणि येणाऱ्या सुट्ट्यांचं नियोजन अशी तारेवरची कसरत करावी लागत होती. तसं दरवर्षी पहिले पंधरा - - वीस दिवस आजोळाचा बेत ठरलेला असायचा नेहमी. नातवंडे आणि आजी-आबांसाठी नवसंजीवनीच असायची ती जणू !! आणि तेवढाच आईबाबांनाही निवांत वेळ मिळायचा.

एके संध्याकाळी सर्वजण एकत्र बातम्या बघत असता अचानक “करोना” आणि परिणामी ल्ऑकडाऊन अशी बातमी आली. सुरुवातीला एवढं गांभीर्य जाणवले नाही त्याचे. मज्जाच वाटली मुलांना. सुट्ट्याच सुट्ट्या आणि शिवाय परीक्षाही रद्द म्हणजे सोने पे सुहागाच !! 24 तास यंत्रवत घड्याळाच्या काट्यांवर सतत धावणारया आई-बाबांनाही हा बदल हवाहवासा वाटला. गावी असलेल्या आजी-आबांच्या तर गावीही नव्हतं हे कांहीं. त्यांना वाटलं, ही काय पुण्या-मुंबईची थेरं. आपल्यापर्यंत थोडेच येणार आहे. शिवाय मुलं आणि नातवंडांबरो ऑनलाइन गप्पा-टप्पा सुरूच असणारच आहेत.

पण जसजसे या “कोरोना” प्रकरणाने हातपाय पसरायला सुरुवात केली, तसतसं सगळं कठीण होत गेलं. रोजच्या बातम्या काळजाचं पाणी पाणी करत होत्या. आता आजी-आबाही खूप धास्तावले होते. ते म्हणे रिस्क झोनमध्ये होते खूप….

    वासंतीला समजावताना, या सगळ्या गोष्टींमुळे आलेला ताण, भीती, सामाजिक आयुष्यावर आलेली बंधनं, मानसिक आरोग्य हे आणि ते असं बरंच कांही सांगितलं होतं आईने तीला. वासंतीच्या मात्र सगळं डोक्यावरून जात होतं. तिचं वयच नव्हतं ते सगळं समजण्याचं. चौथ्या इयत्तेत शिकणारी पोरं ती ! आईने सांगितलेल्या एकाच गोष्टीनं पक्कं घर केलं होतं तिच्या मनात. “आजी कशामध्ये तरी गुंतून राहिली तर सहज पार करू शकेल ती हे अग्निदिव्य.  आणि आजी खूष तर आभासी खूष !! “  पण कसं आणि कशामधे  बरं गुंतवायचा आजीला?, या एकाच विचाराने तिला पछाडलं होतं. तिला रात्रभर नीट झोपही लागली नाही. काय करावं बरं ? सारखा विचार करत होती.  पहाटे कुठे डोळा लागला तीचा. तरीही अगदी ताजीतवानी होऊन उठली ती सकाळी, जणू जादूची कांडीच हाती लागली होती तीच्या !! 

आजीला मराठी साहित्त्यात खूप रस आहे, खूप लिहायची ती आधी असं आई पुष्कळ वेळा सांगायची वासंती आणि तीच्या दादाला. तिच्यातलाच तो गुण म्हणे आई आणि मामा मध्ये आला होता थोडा थोडा. तेव्हा बालसुलभ वृत्तीने आईला विचारलं होतं वासंतीने, “तुमच्यामध्ये आला म्हणजे आजीतला कमी झाला का गं? आता का नाही लिहित ती मग? यावर खदखदून हसून आई बोलली होती,  “असं काही नसतं गं वेडाबाई !! उलट वयोपरत्वे ज्ञान वाढतंच ! अनुभवांची शिदोरी वाढत जाते ना !! आणि आत्ता आजीला साहित्त्यात रमायला वेळच कुठे आहे ?  तिची चालती-बोलती साहित्त्य पंढरीच आहात ना तुम्ही नातवंडं म्हणजे !!”

पण हल्ली मामाही परदेशी असतो आणि वर ही परिस्थिती.. आजी बद्दल आईला वाटणारी काळजी वासंतीला ठावूक होती. या सगळ्या साखरझोपेच्या साक्षात्कारातून शेवटी तिला तिचे उत्तर मिळाले. आणि सुरू झाली तिची गुप्त मसलत. आजीकडे स्मार्टफोन तर होताच पण त्याचा वापर फक्त व्हिडिओकॉल साठीच करत होती आजी. शिवाय मामाचा लॅपटॉप तसाच पडलेला कपाटात. ऑनलाईन शाळेमुळे बरीच टेक्नोस्याव्ही झाली होती वासंती हल्लीच. तिच्या डोक्यात चक्रं फिरली आणि तिचा निर्णय पक्का झाला. दुसरया दिवशी आजी-आबांनाही सामील करून घेतलं तिनं. त्यांचं सामील होणं गरजेचंच होतं नाहीतर सगळंच मुसळ केरात !! सुरुवातीला वाटलं त्यांना आपल्याला जमणार नाही पण थोडं समजावल्यावर प्रयत्न करायला तयार झाले ते. मग काय रोज एक-दोन तास घालवू लागली वासंती आजी-आजोबांसोबत, तिच्या खोलीत, दार बंद करून, कोणाला काहीच न कळू देता. नाही म्हणलं तरी दादाला सामील करून घेतलं होतं वासंतीने. त्याची मदत लागणार होती ना हिला कुठे काही अडलं तर !!…

      आईला जाणवत होतं काहीतरी कुसूर कुसूर चाललंय आजी-आजोबा आणि नातवंडांमध्ये. पण तिने मुद्दाम दुर्लक्ष केलं. खूप कामं होती तीलाही या लऑकडाऊन च्या काळात, सगळ्या मावश्या सुट्टीवर होत्या ना ! पण हल्ली आजी-आजोबांच्या वागण्यातला फरक आईला स्पष्ट जाणवत होता. चांगलाच होता तो ! खूप फ्रेश दिसत होती दोघंजणं. भरभरून बोलत होती अगदी पुर्वीसारखं. आनंदी दिसत होती. आईही सुखावली मनोमन हा बदल पाहून. शेवटी न राहुन आईने आजीला विचारलंच, “ मला फार छान वाटतंय हो तुम्हा दोघांना असं भरभरून जगताना पाहून या परिस्थितीतही. मला वेडीला फार काळजी वाटायची. पण आता नाही. काय जादू झाली गं अशी ? तुमचं आणि वसंता-वासंतीचं कांहीतरी गुपचूप गुपचूप सूरू आहे याचा फक्त अंदाज आलाय मला. मलाही घ्या ना तुमच्या गटात सामील करून !!”

तशी आजी बोलती झाली, “ याचं सगळं श्रेय वासंतीचं बरंका गं आणि थोडं वसंताचंही त्याच्या तज्ञ सल्ल्यांसाठी…” आमच्या भकास वाळवंटी जीवनामध्ये वसंतपालवी होऊन आली हो नातवंडं आमची आणि आयुष्याला कसं हिरवीगार, ताजंतवाणं अन् टवटवीत केलं बघ !!” “वासंती तर बालसरस्वतीचं रूपंच जणू !” “ऑफ द ट्रॅक गेलेल्या आम्हाला, बोटाला धरून अगदी सांभाळून ट्रॅकवर आणलं बघ तीनं, ते ही ऑनलाईन !!” खूप भरभरून बोलत होती आजी आईशी तीच्या या प्रवासाबद्दल, ऑनलाईन मित्रमैत्रिणींबद्दल, नवीन समाजमाध्यमांबद्दल, त्यांच्या उपयुक्ततेबद्दल, तीच्या नविन लेखनप्रवासाबद्दल वगैरे, वगैरे…. 

आईलाही भरून आलं अन् आनंदाने मीठीच मारली तीने, तीला गवसलेल्या नवदुर्गेला – तीच्या लाडक्या लेकीला.

त्यांचा हा आनंदोत्सव ऑनलाईन टिपतच होते सर्वजण तोवर आजीच्या मोबाईल वर बिप बिप वाजलं..

तीच्या ब्लाॅगला पहिलं बक्षिस मिळालं होतं आणि वासंतीला तीची गुरूदक्षिणा !!

@अर्चना खिस्ती-गोरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा