रंगा येई वो
काळीशार मुलायम माती
पांढुर अंकुर माना धरती ।
हिरवे गोंदण अंगोपांगी
उमटत जाई दिवसा-राती ।।
मेघ सानुले सावळकांती
निळ्या नभातून लगबग येती ।
शुभ्र तुषारफुले रिमझिमती
हसत खिदळती ओली पाती ।।
रविकर केशर घेऊन येती
भिजल्या राना ऊर्जा देती ।
ऊन हळदीचे मात्रा-वळसे
धरी बाळसे हिरवाई ती ।।
मधुकर माशी पतंग पक्षी
रंगीत किलबिल अवतीभवती ।
गुपित गुलाबी बहरून येता
नवकुसुमे ती पुलकित होती ।।
मोहोरते फळ भरली ओटी
कणि मोत्याची ओंब्या डुलती ।
सोनसाजिरे वसन लेऊनी
तृप्तीने गाभुळते धरती ।।
ऋतुचक्रे नेमाने येती
शत रंगांची उधळण करती ।
गगन धरा ही रंगबावरी
नित्य नव्या रंगात नहाती ।।
मनुजाची जननी ही सृष्टी
होऊ लाडकी तिची संतती ।
रंगाचा बेरंग न व्हावा
अशी करू या शाश्वत प्रगती ।।
-- आसावरी गोखले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा