लेबल

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

रंग

 शिशिर घेऊन गेला,

नकोसे झालेले सारे..

वसंत आला पाझरत

नव चैतन्या चे झरे..


पळसाचे घोस सोनेरी

चहुकडे आता फुलतील,,

निष्पर्ण चाफ्याचा दरवळ

जीवाला लावेल आस अनामिक


गुलमोहोर ही येईल आता

रक्तवर्णी तेज लेवून,

वसंत आणिक घेऊन येईल

नीलमोहोराचे शांत निळे पण


स्थित प्रज्ञ त्या पिंपळाला ही,

पालवी फुटेल नव निर्मितीची

बालपर्णिका सळसळणाऱ्या

घेऊन येतील  निरागस शैशव..


हिरवे, पिवळे, निळे जांभळे

लाल गुलाबी, अन् पांढरे

रंगपंचमी निसर्गाची,

घेऊन आली नवे जीवन..


फुटावी नवी पालवी 

नात्यांना ही आता नव्याने,

दुःखद, उदास सारे झडून द्यावे

प्रेम आणि आपुलकीचे उधळीत रंग.


 -रुपाली सागडे कुलकर्णी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा